रंग बदलणारे रत्न अँलेक्झांड्राइट
दिवसाच्या नैसर्गिक प्रकाशात एक रंग व रात्रीच्या कृत्रिम प्रकाशात दुसराच रंग दाखवणारे खनिज हा निसर्गात सापडणारा एक दुर्मिळ प्रकार आहे. मात्र यात मोठय़ा आकाराचे खडे क्वचितच सापडतात. र्ण वैडूर्य (क्रायसोबेरिल) या खनिजाचे विशेष प्रकाशीय आविष्कार दाखवणारे दोन अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे नवरत्नात अंतर्भाव असलेला लसण्या (Cat"s eye) जो "Chatoyancy" हा प्रकाश आविष्कार दाखवितो (त्याची माहिती दिलेलीच आहे). दुसरा आहे अँलेक्झांड्राइट, ज्यात नैसर्गिक प्रकाशातील खनिजांचा रंग व कृत्रिम प्रकाशातील खनिजाचा रंग यात फरक असतो.
अलीकडच्या काळातील शोध
या रत्नाबद्दल प्राचीन इतिहास तसेच कोणत्याही दंतकथा उपलब्ध नाहीत. कारण याचा शोधच मुळी १९व्या शतकात लागला. या शोधाची कथा मात्र फारच मनोरंजक आहे. सन १८३0मध्ये रशियातील उरल पर्वतराजीतील एमएल खाणीत नेहमीप्रमाणे कामगार पाचू गोळा करीत होते. एका कामगाराने एके दिवशी गोळा केलेले पाचू आपल्या वस्तीवर नेले. रात्री वस्तीत पेटवलेल्या शेकोटीच्या प्रकाशात कामगारांच्या लक्षात आले, की हे खडे लाल रंगाचे दिसत होते. त्यामुळे सर्वच कामगार अचंबित झाले. परत सकाळी उजाडल्यावर कामगारांच्या लक्षात आले की रात्री शेकोटीच्या प्रकाशात लाल दिसणारे खडे सकाळच्या सूर्यप्रकाशात परत हिरवे दिसत होते. कामगारांना समजले, की आपल्याला एक नवीन, दुबरेध असा खनिजाचा प्रकार सापडला आहे.
रशियाचे राष्ट्रीय खनिज
सन १८४२मध्ये खनिजशास्त्रज्ञ नार्डेनस्काओल याने अँलेक्झांडर दुसरा, जो पुढे रशियाचा झार बनला, त्याच्या गौरवार्थ या नवीन खनिजाला अँलेक्झांड्राइट (Alexandrite) असे नाव दिले. या खनिजाचा दिवसा दिसणारा हिरवा रंग व कृत्रिम प्रकाशात दिसणारा लाल रंग यांचे रशियन राजघराण्याच्या ध्वजावरील रंगाशी साम्य असल्याने अँलेक्झांड्राइट हे राष्ट्रीय खनिज बनले. रासायनिकदृष्ट्या यात बेरिलिअम अँल्युमिनिअम ऑक्साइड व अल्पप्रमाणात क्रोमिअम असते. हे अल्पप्रमाणातील क्रोमिअमच त्याच्या रंगास कारणीभूत असते. याचे स्फटिक समचतुभरूज प्रणालीचे असतात व याचा काठिण्य क्रमांक ८.५ आहे. अँलेक्झांड्राइटचे विशिष्ट गुरुत्व ३.८ व वक्रीभवनांक १.७५ आहे.
रंग बदलाच्या तीव्रतेवर किंमत
याची प्रत किंवा किंमत ठरवताना याच्यातील रंग बदलाच्या तीव्रतेचा (Intensity) विचार केला जातो. या रंग बदलाला 'अँलेक्झांड्राइट परिणाम' असे म्हणतात. हा परिणाम जास्त प्रभावी दिसण्यासाठी या खनिजाचा तुकडा योग्य जाडीचा कापणे आवश्यक असते. अँलेक्झांड्राइटचे पाच कॅरटपेक्षा जास्त वजनाचे फारच थोडे खडे निसर्गात आढळतात. त्यामुळेच दागिन्यात या रत्नाचा वापर फार क्वचितच आढळतो. सुरुवातीला फक्त रशियातच आढळणारे हे रत्न नंतर ब्राझील, टांझानिया, श्रीलंका, भारत या देशांतही आढळले. आपल्या देशात केरळ, तमिळनाडू, ओरिसा, छत्तीसगड या राज्यांत हे रत्न आढळते. जगात अतिपूर्वेकडील देशांत या रत्नाला फार मागणी आहे.