बुरशी आणि मुंग्या
मुंग्यांच्या वारूळात बुरशीची शेती असते व ती मुंग्यांनीच जाणीवपूर्वक
केलेली असते. वनस्पतींच्या पानांचे विघटन करून बुरशी कामकरी मुंग्यांना
खाद्य पुरवत असते. त्या बदल्यात मुंग्या बुरशीला सुरक्षित आश्रय देतात.
ष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळणार्या अटाईन नावाच्या मुंग्यांच्या
प्रजातीसुद्धा स्वत:चे खाद्य तयार करण्यासाठी बुरशींचा वापर करून घेतात. या
विशिष्ट मुंग्यांच्या प्रजाती प्रदेशनिष्ठ, म्हणजे ठराविक प्रदेशात सिमीत
असून दक्षिण, मध्य अमेरिका व मेक्सिकोतील काही जंगलांमध्येच आढळतात.
मुंग्यांमधील
पंख असलेली मादी तिच्या तोंडाच्या मागे असणार्या छोटयाशा खिशामध्ये
(इन्फ्राबकल पाऊच) तिला हव्या असलेल्या बुरशींचे बिजाणू साठवते. आपली वसाहत
स्थापन करण्याआधी ती सर्वात अगोदर तिला पोषकद्रव्ये पुरवू शकेल अशी
वनस्पती शोधून काढते. निवडलेल्या वनस्पतींपासून, बुरशीसाठी काही धोका तर
नाही ना हेही तपासून घेते. त्यानंतर मग मुंगीराणी जमिनीखाली तिचे घर
बांधायला सुरुवात करते. या घरातील एक खोली तयार झाली की कामकरी मुंग्यांनी
आणलेले
वनस्पतींच्या पानांचे तुकडे त्यामध्ये पसरते. मग त्यावर होते
बुरशीच्या बिजाणुंचे रोपण. नको असलेल्या बुरशांना अटकाव करण्यासाठी या
मुंग्या स्ट्रिप्टोमायसिस नावाचा प्रतिजैविके निर्माण करणारा बेक्टेरियाही
पदरी बाळगत असल्याची नोंद सापडते. बिजाणुंचे कवकजालामधे रुपांतर व्हायला
लागले की त्यावर मुंगी राणी रोज हजारो अंडी घालते. यातूनच कामकरी
मुंग्यांची पुरेशी सेना तयार होते. काही अंडी ती स्वत: खातेही. मुंग्या
त्यांनी तयार केलेल्या बुरशीच्या शेतीमध्ये वनस्पतींच्या पानांचे तुकडे
ठेवतात. आणि या तुकडयांचे विघटन करून सुरक्षित आश्रयस्थानाच्या बदल्यात
बुरश्या मुंग्यांना तयार खाद्य पुरवतात.
लेपिओटा, झायलेरिया,
ऑरिक्युलारीया या बुरशांचे अटाईन मुंग्यांबरोबर सहजीवन आढळते. मुंग्या या
मुळातच कष्टाळू, शिस्तबद्ध आणि सहकार्याची भावना ठेवून असणार्या समाजशील
प्रजाती आहेत. परंतु बुरशांकडे मात्र प्रथमदर्शनी अपायकारक म्हणूनच पहिले
जाते. एकमेकांना सहाय्य करून प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहाण्याचे शहाणपण
निसर्गत: या दोन सजीवांना मिळत असावे. आणि यामुळे त्यांचे संवर्धन होण्यास
आपोआपच मदत होते.
No comments:
Post a Comment