Blogroll

बुरशी आणि वनस्पती

बुरशी आणि वनस्पती



पृथ्वीतलावर अगदी प्रथम स्थापित झालेल्या वनस्पतींच्या मुळांची रचना मातीतील पोषकद्रव्ये शोषून घेण्याइतपत विकसित झाली नसावी. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बुरशीकरवी हे काम करवून घेण्यास वनस्पतींनी सुरुवात केली असावी. ही बुरशी वनस्पतींच्या मुळांबरोबरसुद्धा सहजीवन स्थापित करतात. त्यांना 'मायकोरायझा' असे म्हणतात. काही बुरशींच्या कवकजालाचे धागे वनस्पतींच्या मुळाच्या अंतर्भागात जाऊन पेशीमध्ये प्रवेश करतात, तर काही बुरशींचे बाह्यांगावरच आवरण तयार होते. बुरशीच्या कवकजालाचे धागे लांबपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे हे धागे वनस्पतीची मुळे पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणापर्यंत पोहोचून तेथील पोषकद्रव्ये जमिनीतून शोषून घेऊन त्याचा पुरवठा वनस्पतींच्या मुळांना करतात.
वनस्पतींना आवश्यक असणारी काही खनिजद्रव्ये मातीच्या कणांना घट्ट धरून बसल्याने सहज विरघळू शकत नाहीत व मुळांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशा वेळी बुरशी त्यांच्या मदतीला धावतात. बुरशीद्वारे स्रवल्या जाणार्‍या काही रसायनांमुळे ती विरघळवली जातात. असा खनिजद्रव्यांना सहज शोषून घेऊन त्यांना थेट मुळापर्यंत पोहोचविण्याचे काम बुरशी करते. बुरशीबरोबरच्या या सहजीवनामुळे उपयुक्त गोष्टींचा खजिनाच वनस्पतींना गवसला आहे. बुरशींमुळे वनस्पतींमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असलेल्या किंवा अतिशुष्क जमिनीमध्ये तग धरून राहण्याची क्षमता वाढते. आम्लवर्षा किंवा प्रदूषणयुक्त प्रतिकूल वातावरणावर या वनस्पती मात करू शकतात. शिवाय वेगवेगळ्या रोगाविरुद्धही त्यांची प्रतिकारप्रणाली विकसित होते. या सगळ्यांच्या बदल्यात बुरशींनाही आवश्यक असलेले अन्नघटक मिळतात. काही अभ्यासकांनी हे सहजीवन अस्तित्वास असलेल्या व नसलेल्या रोपांचे निरीक्षण केले असता हे सहजीवन प्रस्थापित झालेली रोपे इतर रोपांपेक्षा जास्त जोमाने वाढत असल्याचे दिसून आले. प्रयोगशाळेत मायकोरायझायुक्त रोपे वाढवून ती शेतकर्‍यांना पुरविण्याचे काम काही व्यावसायिक करतात. गहू, तांदूळ, सोयाबीन व इतर कडधान्ये यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पिकांना याचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. 

No comments:

Post a Comment