सुनामी
मानवासाठी समुद्र फायदेशीर आहे, तितका धोकादायकही. सुनामीसारखे संकट
त्यातून कधी येईल सांगता येत नाही. सन २00४ च्या सुनामीने हाहाकार उडवला
असला, तरी त्यातून या संकटाचा अभ्यास करता येणे शक्य झाले. रताचा सुनामीशी
फारसा परिचय नव्हता. क्राकाटोआच्या सन १८८३ मधल्या स्फोटक उद्रेकाच्या
वेळी निर्माण झालेली सुनामी नक्कीच भारतीय किनार्यावर थडकली असणार. कारण
तिने पृथ्वी प्रदक्षिणा केली होती. पण त्या वेळी भारताची लोकसंख्या बरीच
कमी होती. त्यामुळे त्या सुनामीने किनार्याला मारलेल्या धडकेने फारसं
नुकसान झालं नसावं. त्या काळात अशा गोष्टी या 'देवाची करणी' या सदरात मोडत
असत. शिवाय अशा घटनांची नोंद करणं हे ब्रिटिशांना ठाऊक होतं; भारतीयांना
मात्र ते नीटपणे अंगवळणी पडलेलं नव्हतं. ज्याअर्थी वृत्तपत्रांनी
क्राकाटोआच्या स्फोटक उद्रेकाची दखल घेताना सुनामीचा उल्लेख केलेला नाही,
त्याअर्थी त्या सुनामीमुळे फारशी मनुष्यहानी झालेली नसावी, असं आपण म्हणू
शकतो.
याउलट २६ डिसेंबर २00४ च्या सुनामीने भारताचा आग्नेय किनारा,
श्रीलंका, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशियात जे थैमान घातलं त्यामुळे ती
गाजली. सध्याच्या युगात बातम्या झपाट्याने पसरतात. त्याची लगेच दखल घेतली
जाते. सागर किनार्याजवळची वस्ती वाढलेली आहे. याशिवाय बरेच पर्यटक हौसेने
सागरकिनारी पुळणीवर, चौपाटीवर जाऊन सुट्टी घालवतात. यामुळे या सुनामीने
नैसर्गिक तांडवाचा एक जबरदस्त फटका या भागाला दिला, असं म्हटलं तर वावगं
होणार नाही. २६ डिसेंबर २00४ च्या सुनामीत किती व्यक्ती वाहून गेल्या, याची
खातरजमा व्हायला एक वर्ष जावं लागलं. वर्षअखेरीस सुमारे सव्वादोन लाख
व्यक्तींचे बळी या सुनामीने घेतले, तर दहा लाख लोकांना या सुनामीने बेघर
केलं, अशी आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्या सुनामीमुळे एक गोष्ट
प्रकर्षाने पुढे आली, ती म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे किनार्यांजवळची
मानवी वस्ती वाढत आहे. त्यामुळे इथून पुढे सुनामींमुळे होणारं नुकसान वाढतच
जाणार आहे, यात शंकाच नाही.
ही सुनामी मानवी इतिहासातील सर्वाधिक
अभ्यास झालेली आणि बारकाव्यांसह जिची छायाचित्रांसह लेखी नोंद झाली अशी
सुनामी ठरली. यामुळे 'सुनामी'चं संकट येतं कसं, त्यात काय घडू शकतं, नक्की
काय घडलं आणि हे संकट कसं टाळता येईल, त्याने होणारं नुकसान कमी करता येईल
याबाबत या सुनामीच्या अभ्यासकांना बरेच दुवे मिळाले. बर्याच पर्यटकांनी
त्यांचा जीव धोक्यात असतानादेखील प्रसंगावधान दाखवून या लाटांचं व्हिडिओ
कॅमेर्याच्या साह्याने चित्रीकरण केलं. काहींनी त्यांचे अनुभव लिहून
काढले. याची शास्त्रज्ञांना खूपच मदत झाली. सर्व सुनामीचं मूळ विशिष्ट
प्रकारच्या भूकंपांशी निगडित असतं. ते कसं हे माहीत करून घेण्यासाठी आधी
भूकवचाच्या रचनेची एका प्रयोगातून थोडी माहिती घेणे गरजेचे आहे. घरात थोडे
दूध तापवायला ठेवा. मध्यम आचेच्या गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं तर दूध भराभरा
ऊतू जात नाही व मोठय़ा ज्वालेवर ते ठेवलं तर लगेचच उतू जातं, हे यातून
लक्षात येईल. पृथ्वीच्या जन्मकाळी खूप मोठय़ा पेटत्या गॅसवर दूध ठेवावं तशी
परिस्थिती होती. आता ती तशी राहिलेली नाही.
ही दुधाच्या तापण्याची
प्रतिमा थोडी अपूर्ण आहे. कारण पृथ्वीमध्ये आधी संपूर्ण पृष्ठभागावर दाट
साय जमा होते. सायीचा थर दाट झाला, की जिथं पातेल्याच्या बुडाला पेटलेला
गॅस तापवत असतो, त्या भागाच्या वर उकळी फुटते आणि सायीचे या उकळीच्या भोवती
जर विस्तव बरोबर मधोमध असेल तर सारखे चार भाग होतात. दूध तसंच तापू दिलं
तर ही साय कडेने खाली जाते, परत वर येते, सांधते, फुटते. काही वेळाने दूध
वर येतं, पातेलं लहान असेल तर उतू जातं. यातल्या सायीचे भाग होऊन ती खाली
जाऊन परत उकळीबरोबर वर येते. या क्रियेप्रमाणे क्रिया भूकवचाच्या बाबतीतही
घडत असते. जिथे पृथ्वीच्या कठीण कवचावर कवचाचा दुसरा तुकडा खाली
भूगर्भाच्या दिशेने दाबला जातो. या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसतात. काही वेळा
भूकवच एखाद्या सागरतळाच्या खोल दरीत जाते. त्या वेळी जे भूकंप घडतात
त्यांच्यामुळे सुनामी उद्भवते. याचं कारण इथे पाणी जोरात हलवलं जातं. अशा
सुनामींनी अनेकवार मानवी इतिहासात हाहाकार घडवून आणल्याच्या नोंदी आहेत.
अशा सुनामींची माहिती आणि सुनामींच्या वेळचं आपत्ती व्यवस्थापन याची माहिती
जाणून घेतल्यामुळे अशा वेळी काय करणं आवश्यक ठरतं, याचं ज्ञान आपल्याला
होतं.