Blogroll

देखणे नारंगी पोवळे

 देखणे नारंगी पोवळे

समुद्र म्हणजे नैसर्गिक गोष्टींचा फार मोठा खजिनाच आहे. काही समुद्री प्राण्यांच्या स्रावापासून पोवळ्यासारखे रत्न तयार होते. अशी काही प्राणिज रत्ने सापडत असल्यामुळेच समुद्राला 'रत्नाकर'ही म्हणत असावेत. वरत्नातील प्रवाळ हे रत्न मोत्याप्रमाणेच सागरी प्राण्यांच्या जीवनप्रक्रियेतून तयार होणारे प्राणिज वर्गातील रत्न आहे. प्रवाळ, पोवळे, पवलम, मंगळ, मुंगा किंवा इंग्रजीत या नावाने ओळखल्या जाणार्‍या या रत्नाचा काठिण्य क्रमांक ३ ते ३.५ आहे. विशिष्ट गुरुत्व २.६ असून, वक्रीभवनांक १.५५ असतो. रासायनिकदृष्ट्या पोवळ्यात मुख्यत: कॅल्शियम काबरेनेट, तसेच अल्प प्रमाणात लोह किंवा मॅग्नेशियम असते. या अल्प प्रमाणातील लोह किंवा मॅग्नेशियममुळेच प्रवाळांना तांबडा, नारिंगी, काळा असे वेगवेगळे रंग येतात. तसे बघायला गेले तर प्रवाळ हे एक नाजूक, नरम व रासायनिक परिणाम सहज होणारे प्राणिजरत्न आहे. पण मोहक लाल, नारिंगी रंग व त्याला असलेली झिलई  घेण्याची क्षमता या त्याच्या अंगच्या गुणांमुळेच त्याचा अंतर्भाव रत्नात केलेला आहे.
उबदार हवामानात, उथळ सागरी पाण्यात वाढणार्‍या सीलेंटेरेटा या प्राणिसंघातील, मुख्यत: अँथोझोआ या वर्गातील प्राण्यांनी स्वत:भोवती स्रवलेल्या सांगाड्यांचे तयार झालेले साठे म्हणजे प्रवाळ. काही वेळा समुद्रात प्रवाळांच्या प्रचंड आकारमानाच्या भित्ती किंवा खडक तयार होतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ग्रेट बॅरिअर रीफ. प्रवाळ भित्तीच्या परिसरातील समुद्रात विपुल जैवविविधता आढळते व त्यामुळेच आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा असतो. इटली, ऑस्ट्रेलिया, जपान, फिलिपाइन्स येथे उच्चप्रतीचे पोवळे मिळते. भारतात मुख्यत: अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात पोवळी आढळतात.
रंग, चमक, घट्टपणा, भरीवपणा इत्यादी गुणांवर पोवळ्याची किंमत अवलंबून असते. तांबड्या रंगाचे पोवळे सगळ्यात महाग असते. पोवळ्यावर कोणताही रंग चढवला जाऊ शकतो, पण अँसिटोनमध्ये बुडवलेला कापूस त्यावर घासल्यास रंग कापसावर लागतो. निकृष्ट पोवळ्याची भुकटी करून त्यापासून मूर्ती बनवतात. प्रवाळाचे मणी बनवून माळा तयार करतात. प्लॅस्टिक, काच, पोर्सेलिन इत्यादी पदार्थापासून प्रवाळाच्या अनुकृतीही बनवल्या जातात.
काष्ठसदृश रचना व पृष्ठभागावर बारीक सुतासारख्या रेषा ही प्रवाळ ओळखण्याची महत्त्वाची खूण आहे. प्रवाळापासून केलेल्या प्रवाळभस्माचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितले आहेत.
जगात प्रवाळांच्या ८00पेक्षा जास्त जाती आहेत. त्यापैकी २५0 पेक्षा जास्त जाती भारतात आढळतात. या मुख्यत: अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात तर थोड्या प्रमाणात लक्षद्वीप, मन्नारचे आखात व कच्छचे आखात या भागात सापडतात. मानवाच्या हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षांत या प्रवाळांच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या धोक्याबद्दल तसेच प्रवाळांचे आर्थिक व परिसरीय महत्त्व याबद्दल समाजात जागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment