जगातील पहिले छायाचित्र
छायाचित्र कलेचा इतिहास तसा फार प्राचीन नाही. औद्योगिक क्रांतीबरोबरच ही कला विकसित होत गेली. सर्वच क्षेत्रांना त्याचा फार चांगला उपयोग झाला. विज्ञानक्षेत्रही याला अपवाद नव्हते. विज्ञानाशी संबंधित अशा काही छायाचित्रांची ओळख करून देणारे नवे सदर. ळाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इटलीतील पीसा शहरातील फ्रायर लोक काच बनवण्याच्या कलेत निपुण झाले होते. फ्रायर हे ख्रिश्चन भिक्षुक. त्यांनी काचेची पारदर्शक गोलाकार अशी एक वस्तू तयार केली की जिचा मध्यभाग जरा जास्त फुगीर होता. अगदी मसूरच्या दाण्यासारखा. यातून बघितल्यावर आपल्याला जवळची वस्तू मोठी दिसते. मसूरला लेंटिल म्हणतात आणि त्यावरून या वस्तूला लेन्स म्हणण्यात येऊ लागलं.
या एका भिंगाने आपले जीवनच पलटून टाकले. ठराविक वयानंतर ज्यांना लहान अक्षरं वाचणं जमत नव्हतं ते आता या भिंगाच्या मदतीने वाचू शकत होते. मुख्य म्हणजे जे नुसत्या डोळ्यांना दिसणं शक्य नाही तेही आपण बघू लागलो. दुर्बिणीच्या माध्यमातून खूप दूरच्या गोष्टी, तर सूक्ष्मदश्रीच्या माध्यमातून खूप लहान गोष्टी बघणं शक्य झालं. त्यानंतरचा मोठा शोध म्हणजे छायाचित्रणाचा - जे फक्त आपल्यालाच दिसू शकतं, ते आता इतरांनाही दाखवणं शक्य झालं होतं. छायाचित्रणकलेच्या या शोधाने क्रांतीच केली. त्यातील अगदी सुरुवातीची छायाचित्र आजही पाहण्यासारखी आहेत. म्हणूनच यापुढे आपण विज्ञानाशी निगडित अशा काही नैसर्गिक सौंदर्यांच्या आविष्कारांची माहिती घेऊया. आजचं हे छायाचित्र आहे रासायनिक प्रक्रियेतून निसर्गाचं सौंदर्य कैद करणारं. फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ निसेफोअर निप्स यांनी सन १८२६-१८२७ या दरम्यान ते घेतलं होतं. या चित्राला शीर्षक होते 'व्ह्यू फ्रॉम द विंडो एट ले ग्रास.' आपल्या घराच्या एका खिडकीतून त्यांनी हे छायाचित्र घेतलं. हे चित्र घेण्यास त्याला काही तास लागले होते.
त्या वेळी या प्रक्रियेला लाईट पेंटिंग म्हणत असत. त्याला फोटोग्राफी नाव दिलं जॉन हश्रेल यांनी. (युरेनसचा शोध लावणारे विल्यम हश्रेलचे सुपुत्र). फोटोग्राफी हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे - फोटो म्हणजे प्रकाश आणि ग्राफी म्हणजे आलेख. आपल्याकडे या प्रक्रियेला छायाचित्रण असे नाव रुजू झाले. पण, काहींचे म्हणणे होते, की याला प्रकाशचित्रण म्हणायला पाहिजे.
No comments:
Post a Comment