Blogroll

सूक्ष्मजीवांचे विशाल जग

सूक्ष्मजीवांचे विशाल जग



डोळ्यांनाही दिसू न शकणारे अनेक जीव वातावरणात असतात. त्यांचेही एक जीवनचक्र असते. तसेच त्यांच्याकडून अनेक गोष्टीही होत असतात. हे जीव सूक्ष्म असले तरी त्यांचे जग मात्र विशाल आहे. 

क्ष्मजीव म्हणजे असे जीव की जे आपणांस उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. असे हे लहान जीव सर्वत्रच आढळतात. जमिनीवर, हवेत आणि पाण्यातही त्यांचे अस्तित्व असते. एवढेच नव्हे, तर त्यांच्यापैकी काही खारट वातावरणात, थंड व अतिउष्ण तापमानात आम्लयुक्त व आम्लारीयुक्त ठिकाणी आढळले आहेत. अगदी प्राणवायू म्हटल्या जाणार्‍या ऑक्सिजनशिवायही काही सूक्ष्मजीव जगतात अशी नोंद झालेली आहे.
निसर्गाशी जोडलेले असतात : म्ाुख्यत: त्यांचे वर्गीकरण जीवाणू, विषाणू, बुरशी (कवक), शैवाल आणि आदिजीवी असे केले आहे. हे जीव वेगवेगळ्या मार्गांनी निसर्गाशी जोडलेले आहेत. ते जैव-भू-रसायन चक्रात सक्रियरूपाने कार्यरत आहेत. ते आपणासाठी उपयुक्तही आहेत आणि हानिकारकही आहेत. या दोन्ही प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा विविध माध्यमांतून मानवाशी संबंध येतच असतो. 
मानवाला उपयुक्त सूक्ष्मजीव : आप्ाणांस फायदेशीर ठरणारे अनेक सूक्ष्मजीव आहेत. लॅक्टोबॅसिलस जातीचे जीव दुग्धजन्य पदार्थांत आढळतात, दुधाचे दह्यात रूपांतर करण्यास ते मदत करतात, तसेच चीज, पनीर तयार करण्यासही यांचा उपयोग होतो. दुधावर अशी प्रक्रिया करण्यासाठी या जीवाणूंचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जात असतो. 
प्रोबायोटिक्स नावाचे सूक्ष्मजीवरूपी औषध पोटाच्या व पचनाच्या तक्रारींसाठी गुणकारी ठरले आहे. सॅखेरो मायसेस नावाच्या जातीचे सूक्ष्म जीव वाईन तयार करण्यासाठी तसेच खाण्याचा ब्रेड तयार करण्यासाठी वापरतात. याच तंत्रज्ञानाला फर्मेंटेंशन असे म्हणतात. 
याशिवाय अनेक सूक्ष्मजीव प्रतिजैविके व लस तयार करण्यासाठी वापरतात. पेनिसिलिन नावाचे अँटीबायोटिक पेनिसिलियम नावाच्या बुरशीपासून तयार केले गेले आहे. सूक्ष्मजीव पर्यावरणाच्या पुन:प्रस्थापिकरणात व स्वच्छतेतही कार्यरत असतात. कचर्‍याचे तसेच मृत अवशेषांचे विघटन सूक्ष्म जीवांपासूनच होत असते. यातून नैसर्गिकपणे स्वच्छता होत असते. रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेत सक्रिय असल्याने त्यांचा जैविक खत म्हणून वापर केला जातो. ट्रायकोडर्मा जातीची बुरशी जैविक बुरशीनाशक म्हणून वापरली जाते.
हानिकारक सूक्ष्मजीव : हान्िाकारक सूक्ष्मजीवांची यादीही फार मोठी आहे. त्यातील काही तर मानवाला मृत्युमुखीही नेतात. विविध प्रकारच्या रोगास कारणीभूत असणारेही सूक्ष्मजीव आहेत. मायक्रोबॅक्टेरियम हा सूक्ष्मजीव टीबीच्या (क्षय) आजारास कारणीभूत आहे. ह्युमन इम्युनो डेफिशियन्स व्हायरसमुळे एड्स होतो. काही प्रकारचे सूक्ष्मजीव प्राणी व वनस्पतींनाही संक्रमित करू शकतात. काही जीव अन्नपदार्थ व औषधे दूषित करण्याचे काम करतात. अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार यामुळेच घडत असतात.
अशा प्रकारे जैव तंत्रज्ञानाचा वापर करून अँटिबायोटिक्स, ऑरगॅनिक अँसिड्स, जीवनसत्त्वे, एकलकोशिका प्रथिने, बायोप्लास्टिक, बायोपिग्मेंट्स, बायोगॅस, जैविक खते, कीटकनाशके, विविध औषधे असे अनेक पदार्थ सूक्ष्मजीवांपासून तयार केलेले आहेत आणि म्हणूनच यांचा आकार जरी लहान असला, तरी कार्य मात्र मोठे आहे. अशा या अँनिमल क्यूल्सचे अद्भुत विश्‍व अजूनही एक गुपितच आहे.

शक्तिकेंद्र किल्ले

शिवशाहीत शक्तिकेंद्र किल्ले 



शिवशाहीत व त्यापूर्वीही राज्यकर्त्यांसाठी किल्ले हे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळेच त्यांच्या रचनेपासून सर्वच गोष्टींचा फार बारकाईने विचार केला जात असे. या विचारांना रामचंद्र अमात्य यांनी शब्दबद्ध करून ग्रंथरूप दिले. त्यातून किल्ल्यांची शास्त्रशुद्ध रचना प्रत्ययास येते. 

मचंद्रपंत अमात्य या शिवकालीन व्यक्तिमत्त्वाचा जन्म १६५0 सालचा. इ.स. १६७४ साली शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. त्यांनी केवळ २४ वर्षांच्या या तरुणास अमात्यपदासारखे क्रमांक दोनचे पद द्यावे. यातच या व्यक्तीच्या उत्तुंग बुद्धिमत्तेची साक्ष पटते. आपल्या अखेरच्या काळात इ.स. १७१६ च्या सुमारास, रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्र लिहिले. जेमतेम सात प्रकरणे आहेत यात. मात्र प्रत्येक प्रकरण अनेक प्रबंधांचा विषय ठरावा अशा असामान्य योग्यतेचे आहे. यातील भाषा, वाक्ये असामान्य आहेत. आज्ञापत्र म्हणजे शिवछत्रपतींसारख्या अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तिमत्त्वाची शब्दबद्ध झालेली मानसिकता आहे. 
रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्राच्या 'दुर्ग' या विषयावरील प्रकरणात म्हटले आहे, ''संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग! दुर्ग असता मोकळा देश प्रजाभग्न होऊन उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झाल्यावर राज्य तरी कोणास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे झाले, त्यांनी आधी देशामध्ये दुर्गे बांधून तो देश शाश्‍वत करून घेतला. आले संकट त्या दुर्गाश्रयी परिहार केले.''
शिवछत्रपतींनीसुद्धा हे राज्य गडांचा योग्य असा उपयोग करूनच शुन्यातून निर्माण केले. जो जो भाग स्वत:च्या अधिपत्याखाली येत नव्हता, त्या त्या ठिकाणी त्यांनी नेमक्या जागा निवडल्या अन् गिरीदुर्ग वा जलदुर्ग बांधून ते ते भाग स्वत:च्या अधिपत्याखाली रुजू करून घेतले. याच पद्धतीचा अवलंब करत त्यांनी नाशिकच्या उत्तर सीमेवर असलेल्या साल्हेर व अहिवंतगडापासून दक्षिणेस कावेरीच्या तीरावर वसलेल्या जिंजीपर्यंत स्वायत्त स्वराज्याची प्रतिष्ठापना केली.
दुर्ग हे शक्तिकेंद्र अशी कल्पना करून त्या भोवताली विणलेले हे राज्य सर्वच दृष्टीने इतके बलिष्ठ अन् त्याचसवे चिवटही ठरले, की उत्तरकाळात औरंग्यासारख्या सर्वशक्तिमान अशा पातशहाने आपल्या संपूर्ण ताकदीनिशी दक्षिणेवर आक्रमण केले. इदलशाही, कुतुबशाहीसारखी साम्राज्यं एका फटकार्‍यानिशी त्याने धुळीस मिळविली. त्याच्या लेखी अतक्र्य, अशक्य असे काहीच नव्हते, मात्र शिवछत्रपतींनी रचलेल्या या दुर्गांच्या जाळ्यात तो पुरता अडकला. पूर्ण पंचवीस वर्षे तो मुघल सम्राट या जाळ्यातून सुटण्यासाठी तडफडत राहिला. पण ते त्यास त्याच्या मृत्यूपर्यंत शक्य झाले नाही. शिवछत्रपतींच्या राज्यात दुर्ग होते म्हणूनच हे राज्य शिल्लक राहिले. त्या वादळातून नव्या जोमाने उठून उभे राहिले! म्हणून स्वये शिवछत्रपतींचे व त्यांच्या पदरीच्या विचारवंत मुत्सद्यांचे मत असे, की राज्यकर्त्याने सदोदित मनी बाळगायला हवे, की दुर्ग म्हणजेच राज्य, दुर्ग म्हणजे राज्याचा पाया, दुर्ग म्हणजेच राज्याची अर्थव्यवस्था, दुर्ग म्हणजे राज्यलक्ष्मी, दुर्गम्हणजेच सैन्याचे बळ, दुर्ग हीच आपली आश्रयस्थाने, दुर्ग हेच सुखनिद्रागार, किंबहुना दुर्ग हेच स्वत:च्या व राज्याच्या प्राणसंरक्षणाचे एकमेव साधन आहे. म्हणून मग याविषयी कुणाच्याही भरवशावर विसंबून राहू नये. आहेत त्या दुर्गांच्या निगराणीचा अन् संरक्षणाचा व नवीन दुर्गाच्या निर्मितीचा ध्यास राजाने स्वत:च बाळगावा. कुणावरही विश्‍वास न ठेवता या बाबी स्वत:च्या अखत्यारित ठेवाव्यात. शिवछत्रपतींची त्यांच्या दुर्गांकडे वा दुर्गांच्या राज्य उभारणीतील सहभागाकडे पाहण्याची दृष्टी ही अशी होती. दृष्टी नव्हेच ती द्रष्टी नजर म्हणायचे तिला. याच नजरेने, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अक्षरश: शुन्यामधून मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या पराक्रमाचा डिंडिम दशदिशांत गर्जविला.
अशा अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दुर्गांची व्यवस्था सुद्धा शिवकाळात अतिशय नेटकी अन् आखीवरेखीव होती. दुर्गांचा वेगळा विभाग नव्हता कारण तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता! 

पाणी, मासे आणि माणूस

पाणी, मासे आणि माणूस

स्पाँजमधील विहार करणारे छोटे आकर्षक रंगाचे मासे ते शार्कसारखे महाकाय मासे असे माशांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाची शरीररचना वेगळी, रंग वेगळे, खाण्याच्या सवयी वेगळ्या, विणीचे हंगाम आणि अधिवास वेगळे. तसेच, पालकत्वाची भूमिका निभावण्याची पद्धतीसुद्धा वेगळी.
पृथ्वीवर खारे पाणी आहे. तसेच, अगदी अल्प प्रमाणात गोडे पाणी आहे. या गोड्या पाण्याचे स्रोत नैसर्गिक आहेत. नद्या, नाले, तलाव, विहिरी, तळी, कॅनॉल, पाट अगदी डोंगर-दर्‍यांतून झिरपणारे झरे, छोटे ओहोळ ते महाकाय नद्या या सर्वांवर आपले जीवन अवलंबून आहे. गोड पाणी पिण्यासाठी वापरले जाते. तसेच, ते औद्योगीकरणासाठी, शेतीसाठी, वीजनिर्मितीसाठी, घरच्या दैनंदिन वापरासाठीही वापरतात.
या कारखान्यातून निघणारे सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे अलीकडे आपल्या नद्या, नद्या न राहता सांडपाण्याच्या वाहक झाल्या आहेत. या सर्व नद्या सरतेशेवटी समुद्रात जाऊन मिळतात. भारतासारख्या विकसनशील देशाला लाभलेला समुद्रकिनारा आणि समुद्रात जाऊन मिळणार्‍या नद्या ही मोठी देणगी आहे. या दोन्ही ठिकाणी मासेमारी केली जाते. मासेमारीतून रोजगार निर्मिती होते, त्याबरोबरच परकीय चलन मिळण्यासाठीसुद्धा उपयोग होत असतो.
प्रगत तंत्रज्ञानामुळे, संशोधनामुळे औद्योगीकरण झाले, मात्र त्यातूनच प्रदूषणही वाढले. हवा, पाणी यांचे प्रदूषण होत आहे. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी बाजारात खूप प्रकारची कीटकनाशके, रासायनिक खतांचा वापर केला जातो. यातील काही अंश पिकांमध्ये साठून राहतो, काही जमिनीवर पडतो.
जमिनीवरील ही रसायने पावसात पाण्याबरोबर नदीत आणि पुढे समुद्रात येतात. कागद बनविण्याचा कारखाना, कातडी कमाविण्याचा कारखाना, रंग बनविणारे कारखाने, फटाके बनविणारे कारखाने, वाहने धुणे त्यातील ऑईल, लाँड्रीमधून येणारे सांडपाणी, अणुभट्टीमधून निघणारे सांडपाणी, किंबहुना कोणत्याही उत्पादनाचे सांडपाणी हे दूषित असते. या पाण्यामध्ये रोग पसरविणार्‍या अतिसूक्ष्म विषाणूंबरोबरच अत्यंत धोकादायक 'हेवी मेटल' (घन पदार्थ) असतात.
देशातील मोठय़ा बहुतांशी नद्या म्हणजे गटारगंगा आहेत. यामध्ये खूप प्रमाणात हेवी मेटल्स आहेत. काही हेवी मेटल्स पाण्यामध्ये विरघळतात किंवा पाण्यातील एखाद्या दुसर्‍या पदार्थांबरोबर बांधले जातात आणि जलचर प्राण्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. यांना झेनाबायोटिक्स असे म्हणतात. जलचर प्राण्यांमध्ये मेटाबायोथोन हे प्रथिन असते. ते हेवी मेटल्सबरोबर बांधले जाते आणि शरीरात साठवले जाते. त्यातील काही हेवी त्रासदायक ठरत असतात. उदा. कॅडमियम, अर्सेनिक, शिसे, मक्यरुरी, क्रोमिअम, कॉपर इत्यादी.
माशांचे कल्ले, किडनी, लिव्हर आणि मासपेशीमध्ये हेवी मेटल्स साठत राहतात; तेव्हा माशांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम दिसून येतो. शरीरावर जखमांसारखे व्रण दिसतात, कल्ल्यांवर श्‍वसनासाठीची असणारी जागा कमी होते. पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रक्त घटकांवर परिणाम होऊन मासे मरतात.
माणसांमध्ये हेवी मेटल्स अन्न-साखळीतून जात असतात. हवेतील अतिसूक्ष्म कणांमध्येसुद्धा हेवी मेटल्स असतात. ते प्रथमत: फुफ्फुसामध्ये जाऊन श्‍वसन संस्थेवर त्याचा परिणाम होतो. काही हेवी मेटल्समुळे कॅन्सर होऊ शकतो.
प्रत्येक हेवी मेटल्सचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम किंवा लक्षणेही वेगळी आहेत. कॅडमिअममुळे किडनी खराब होते. शरीराची हाडे ठिसूळ होतात, दुखावतात, असह्य वेदना होतात. हा प्रकार प्रथम जपानमध्ये दिसून आला. या रोगाला 'इटाई इटाई', असे म्हणतात. शिसे किंवा लिडमुळे अशक्तपणा, किडनी खराब होणे, रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजार होतात.
आर्सेनिकसारख्या हेवी मेटल्समुळे पचनाचे आजार, रक्ताभिसरण संस्थेचा रोग किंबहुना मृत्यूसुद्धा होतो. मक्यरुरीसारख्या हेवी मेटल्समुळे होणारा आणि मुख्यत्वे करून मक्यरुरीने प्रदूषित झालेल्या पाण्यातील माशांचे सेवन केल्यामुळे माशातील साठलेल्या मक्यरुरीने मानवी शरीरात जाऊन झालेले आजार म्हणजे 'मिनामाटा डीसीज.' या रोगामध्ये दिसणारी लक्षणे म्हणजे अस्वस्थपणा, निद्रानाश, चिडचिडेपणा, डिप्रेशन, मानसिक ताण, स्मरणशक्ती कमी होणे, अंधुक दिसणे, डोकेदुखी, श्रवण क्षमतेवर परिणाम होणे, किडनी खराब होणे इत्यादी. १९५0 मध्ये जपानमध्ये या रोगाने तेथील लोकांमध्ये भीती निर्माण केली होती.
थोडक्यात, आपण विकासाच्या नावाखाली खूप प्रदूषण करीत आहोत. 

सावध ऐका, निसर्गाच्या हाका

सावध ऐका, निसर्गाच्या हाका


५ जून - दर वर्षी नियमितपणे साजरा होणारा 'पर्यावरण दिन.' या दिवसापुरतंच पर्यावरणाचं महत्त्व, उरलेले तीनशे चौसष्ट दिवस पर्यावरण 'दीन'च! या दीन अनाथाचा वाली कोण? कारण, एक अनोखी लढाई सध्या सुरू आहे. मानव जात विरुद्ध निसर्ग असा लढा सुरू आहे. कारखाने, गृहसंकुल, रस्ते, महामार्ग, धरणं, विद्युतप्रकल्प, शेती, खेरीज अण्वस्त्र ही सगळी आयुधं वापरून आपण पर्यावरणाचा पाडाव करायला सज्ज झालो आहोत. आपण त्याला जवळ-जवळ संपवतच आणलं आहे.
पर्यावरण म्हणजे हवा, पाणी, जमीन-माती, खनिजं, जंगलं आणि जंगलातले सर्व प्राणीसुद्धा. आपले हे नैसर्गिक स्रोत, आपण वापरतो; पण नुसता वापरच करत गेलो, तर ही नैसर्गिक साधनसंपत्ती संपेल. आज ज्या वेगाने तिचा उपयोग होत आहे, त्या गतीनं केवळ काही शतकंच ती पुरू शकेल.
आपण जर निसर्गातून काही घेतलं, तर त्याबद्दल मोबदला द्यायला नको का? पण, आपण जे परत करतो, ते अनेकदा अनैसर्गिक घटक असतात. प्लॅस्टिक आणि तद्जन्य वस्तू, अनेक रसायनं शेतीसाठी लागणारी, आपल्या चैनीसाठी, क्वचितच गरजेसाठी लागणारी उपकरणं या सगळ्यांपासून आपण निसर्गाला जे परत करतो, ते त्याला पचत नाही. म्हणजे ग्राहक म्हणून निसर्गापासून काही घेतो, त्याबद्दल त्याला 'खोटे पैसे' एका अर्थी देतो. म्हणजे जर जमा-खर्च मांडला, तर निसर्ग तोट्यात आहे. यात ग्राहक-विक्रेता असं नातंही खरं तर मांडता येणार नाही. कारण, निसर्गाची शुद्ध लूटच चालू आहे.
आपले पूर्वज पर्यावरणस्नेही होते. मुळात ते पर्यावरणाचा र्मयादित वापर करत होते आणि निसर्गाला जे परत करत होते, ते विघटनशील घटक होते. त्यांची संख्या म्हणजे पूर्वजांची आणि जो परतावा निसर्गाला दिला जात होता, त्याची मात्राही अल्प होती.
आज औद्योगिक क्रांती आणि वैद्यकीय क्षेत्रात लागलेले जीवनरक्षक शोध यांमुळे लोकसंख्या अर्मयाद वाढली आहे. त्यामुळेही पर्यावरणावर ताण आहेच. 

आखूड शिंगी Giraffe

आखूड शिंगी Giraffe

लांब मान्या, लंबू टांग जिराफ. मोकळा फिरताना सारखी मान वेळावत कुठे तरी दूरवर न्याहळत असतो. त्याचे कुतूहलपूर्वक पाहणारे डोळे जमिनीपासून ५ ते ६ मीटर उंचीवरून परिसराचा वेध घेतात. मान चारही दिशांना फिरते. त्यामुळे त्याच्या दृश्य क्षेत्राचा विस्तार खूपच मोठा असतो. त्याची उंची भरते ५ ते ६ मीटर. नर जास्त उंच असतात. नराचं वजन सुमारे २000 किलो आणि मादीचं १000 किलोपर्यंत असतं. मान सोडून उरलं शरीर आखूड असतं. जिराफाची श्रवणक्षमता खूप असते. त्याचप्रमाणे घ्राणेंद्रियंही संवेदनक्षम असतात. जिराफाला दीर्घ काळ नाकपुड्या बंद करता येतात. त्यामुळे गरम वाळूची वादळं आणि मुंग्यांसारखे उपद्रवी कीटक यांच्यापासून रक्षण करता येतं. जीभ खूप लांब असते. ती उंच काटेरी फांद्यांवरचा पाला खाताना छोट्या फांद्यांना विळखा घालू शकते. नाक साफ करायला तिचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे अंग स्वच्छ करायलाही ती उपयोगी पडते. जिभेचा रंग गर्द तपकिरी काळपट असतो. त्यामुळे सूर्य तपासून तिचं रक्षण होऊ शकतं.
जिभेप्रमाणेच वरचा ओठ थोडा लांब व खूप लवचिक असल्याने तो पाला तोडायला मदत करतो. शिवाय, जिभेवर, ओठात आणि तोंडाच्या त्वचेवर निबर उंचवटे असतात. त्यामुळे झाडांच्या टोकदार काट्यांपासून संरक्षण मिळतं.
मोठाले नारिंगी, तपकिरी किंवा काळपट ठिपके आणि त्याभोवतालचे फिके पिवळे आणि पांढरे मऊ केस यांमुळे जिराफ खूप आकर्षक दिसतो. ठिपक्यांखालच्या त्वचेत रक्तवाहिन्यांचं दाट जाळं असतं. त्यामुळे शारीरिक तापमान संतुलित ठेवता येतं. मोठय़ा धर्मग्रंथीही त्यासाठी मदत करतात. अंगाच्या विशिष्ट तीव्र वासामुळे कृमिकीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. त्वचेतून एकूण अकरा रासायनिक द्रव स्रवतात. त्यात इंडोल व इ-मेथिलींडोल यांचा मोठा भाग असतो. नरांचा शरीरगंध जास्त तीव्र असतो. लैंगिक मिलनासाठी तो आकर्षक ठरतो. जिराफाचं शेपूट साधारण एक मीटर लांब असते. त्यामुळे माश्यांसारखे उपद्रवी कीटक मारता येतात. डोक्यावर दोन आखूड शिंगं असतात. लढाईसाठी लांब मांसल दणकट मान खूप उपयोगी पडते. झुंजीत मानेचा जोरदार रेटा महत्त्वाचा ठरतो. त्यात कधी मान दुखावतेसुद्धा. मृत्यूही ओढवतो.
लांबलचक पायांचा उपयोग झेपा घेत वेगाने पळण्यासाठी होतो. पळताना मागचे पाय पुढच्या पायांपुढे आधी टेकतात. मग पुढचे पाय जागा सोडतात. त्या वेळी तोल सांभाळायला लांब मानेचे लयीतले झोके उपयोगी पडतात. धावताना वेग एका क्षणात वाढवता येतो. तासाला साठ कि. मी. अशी गती पकडता येते. घोड्यांप्रमाणेच जिराफ उभ्यानेच झोपू शकतो; पण जमिनीवर लोळण घेऊन तो ४-६ तास झोप काढतो. पाणी पिण्यासाठी त्याला पाणवठय़ाजवळ पाय फाकून, मान वाकवून पाणी प्यावं लागतं. मानेची लांबी दोन मीटर असली, तरी मणक्यांची संख्या आठच असते. मात्र, प्रत्येकाची लांबी सुमारे २८ सेंटिमीटरपर्यंत भरते. मानेची लांबी वाढत्या वयाबरोबर वाढत जाते. मानेसाठी जिराफाला जादाचा आठवा मणकाही लाभलाय.
मान वाकवली, की डोक्यातला रक्तदाब वाढू नये आणि एरवी उंचीवरच्या मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा व्हावा, अशी झडपांची व्यवस्था हे जिराफाचं वैशिष्ट्य आहे. हृदयाचे स्नायूही खूप बळकट असतात. त्यामुळेच लांब मान्या, लंबू टांग जिराफाचा पळतानाही निभाव लागतो. रक्तदाबाचं नियंत्रण होतं.