Blogroll

पाणी, मासे आणि माणूस

पाणी, मासे आणि माणूस

स्पाँजमधील विहार करणारे छोटे आकर्षक रंगाचे मासे ते शार्कसारखे महाकाय मासे असे माशांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाची शरीररचना वेगळी, रंग वेगळे, खाण्याच्या सवयी वेगळ्या, विणीचे हंगाम आणि अधिवास वेगळे. तसेच, पालकत्वाची भूमिका निभावण्याची पद्धतीसुद्धा वेगळी.
पृथ्वीवर खारे पाणी आहे. तसेच, अगदी अल्प प्रमाणात गोडे पाणी आहे. या गोड्या पाण्याचे स्रोत नैसर्गिक आहेत. नद्या, नाले, तलाव, विहिरी, तळी, कॅनॉल, पाट अगदी डोंगर-दर्‍यांतून झिरपणारे झरे, छोटे ओहोळ ते महाकाय नद्या या सर्वांवर आपले जीवन अवलंबून आहे. गोड पाणी पिण्यासाठी वापरले जाते. तसेच, ते औद्योगीकरणासाठी, शेतीसाठी, वीजनिर्मितीसाठी, घरच्या दैनंदिन वापरासाठीही वापरतात.
या कारखान्यातून निघणारे सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे अलीकडे आपल्या नद्या, नद्या न राहता सांडपाण्याच्या वाहक झाल्या आहेत. या सर्व नद्या सरतेशेवटी समुद्रात जाऊन मिळतात. भारतासारख्या विकसनशील देशाला लाभलेला समुद्रकिनारा आणि समुद्रात जाऊन मिळणार्‍या नद्या ही मोठी देणगी आहे. या दोन्ही ठिकाणी मासेमारी केली जाते. मासेमारीतून रोजगार निर्मिती होते, त्याबरोबरच परकीय चलन मिळण्यासाठीसुद्धा उपयोग होत असतो.
प्रगत तंत्रज्ञानामुळे, संशोधनामुळे औद्योगीकरण झाले, मात्र त्यातूनच प्रदूषणही वाढले. हवा, पाणी यांचे प्रदूषण होत आहे. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी बाजारात खूप प्रकारची कीटकनाशके, रासायनिक खतांचा वापर केला जातो. यातील काही अंश पिकांमध्ये साठून राहतो, काही जमिनीवर पडतो.
जमिनीवरील ही रसायने पावसात पाण्याबरोबर नदीत आणि पुढे समुद्रात येतात. कागद बनविण्याचा कारखाना, कातडी कमाविण्याचा कारखाना, रंग बनविणारे कारखाने, फटाके बनविणारे कारखाने, वाहने धुणे त्यातील ऑईल, लाँड्रीमधून येणारे सांडपाणी, अणुभट्टीमधून निघणारे सांडपाणी, किंबहुना कोणत्याही उत्पादनाचे सांडपाणी हे दूषित असते. या पाण्यामध्ये रोग पसरविणार्‍या अतिसूक्ष्म विषाणूंबरोबरच अत्यंत धोकादायक 'हेवी मेटल' (घन पदार्थ) असतात.
देशातील मोठय़ा बहुतांशी नद्या म्हणजे गटारगंगा आहेत. यामध्ये खूप प्रमाणात हेवी मेटल्स आहेत. काही हेवी मेटल्स पाण्यामध्ये विरघळतात किंवा पाण्यातील एखाद्या दुसर्‍या पदार्थांबरोबर बांधले जातात आणि जलचर प्राण्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. यांना झेनाबायोटिक्स असे म्हणतात. जलचर प्राण्यांमध्ये मेटाबायोथोन हे प्रथिन असते. ते हेवी मेटल्सबरोबर बांधले जाते आणि शरीरात साठवले जाते. त्यातील काही हेवी त्रासदायक ठरत असतात. उदा. कॅडमियम, अर्सेनिक, शिसे, मक्यरुरी, क्रोमिअम, कॉपर इत्यादी.
माशांचे कल्ले, किडनी, लिव्हर आणि मासपेशीमध्ये हेवी मेटल्स साठत राहतात; तेव्हा माशांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम दिसून येतो. शरीरावर जखमांसारखे व्रण दिसतात, कल्ल्यांवर श्‍वसनासाठीची असणारी जागा कमी होते. पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रक्त घटकांवर परिणाम होऊन मासे मरतात.
माणसांमध्ये हेवी मेटल्स अन्न-साखळीतून जात असतात. हवेतील अतिसूक्ष्म कणांमध्येसुद्धा हेवी मेटल्स असतात. ते प्रथमत: फुफ्फुसामध्ये जाऊन श्‍वसन संस्थेवर त्याचा परिणाम होतो. काही हेवी मेटल्समुळे कॅन्सर होऊ शकतो.
प्रत्येक हेवी मेटल्सचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम किंवा लक्षणेही वेगळी आहेत. कॅडमिअममुळे किडनी खराब होते. शरीराची हाडे ठिसूळ होतात, दुखावतात, असह्य वेदना होतात. हा प्रकार प्रथम जपानमध्ये दिसून आला. या रोगाला 'इटाई इटाई', असे म्हणतात. शिसे किंवा लिडमुळे अशक्तपणा, किडनी खराब होणे, रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजार होतात.
आर्सेनिकसारख्या हेवी मेटल्समुळे पचनाचे आजार, रक्ताभिसरण संस्थेचा रोग किंबहुना मृत्यूसुद्धा होतो. मक्यरुरीसारख्या हेवी मेटल्समुळे होणारा आणि मुख्यत्वे करून मक्यरुरीने प्रदूषित झालेल्या पाण्यातील माशांचे सेवन केल्यामुळे माशातील साठलेल्या मक्यरुरीने मानवी शरीरात जाऊन झालेले आजार म्हणजे 'मिनामाटा डीसीज.' या रोगामध्ये दिसणारी लक्षणे म्हणजे अस्वस्थपणा, निद्रानाश, चिडचिडेपणा, डिप्रेशन, मानसिक ताण, स्मरणशक्ती कमी होणे, अंधुक दिसणे, डोकेदुखी, श्रवण क्षमतेवर परिणाम होणे, किडनी खराब होणे इत्यादी. १९५0 मध्ये जपानमध्ये या रोगाने तेथील लोकांमध्ये भीती निर्माण केली होती.
थोडक्यात, आपण विकासाच्या नावाखाली खूप प्रदूषण करीत आहोत. 

No comments:

Post a Comment