Blogroll

सावध ऐका, निसर्गाच्या हाका

सावध ऐका, निसर्गाच्या हाका


५ जून - दर वर्षी नियमितपणे साजरा होणारा 'पर्यावरण दिन.' या दिवसापुरतंच पर्यावरणाचं महत्त्व, उरलेले तीनशे चौसष्ट दिवस पर्यावरण 'दीन'च! या दीन अनाथाचा वाली कोण? कारण, एक अनोखी लढाई सध्या सुरू आहे. मानव जात विरुद्ध निसर्ग असा लढा सुरू आहे. कारखाने, गृहसंकुल, रस्ते, महामार्ग, धरणं, विद्युतप्रकल्प, शेती, खेरीज अण्वस्त्र ही सगळी आयुधं वापरून आपण पर्यावरणाचा पाडाव करायला सज्ज झालो आहोत. आपण त्याला जवळ-जवळ संपवतच आणलं आहे.
पर्यावरण म्हणजे हवा, पाणी, जमीन-माती, खनिजं, जंगलं आणि जंगलातले सर्व प्राणीसुद्धा. आपले हे नैसर्गिक स्रोत, आपण वापरतो; पण नुसता वापरच करत गेलो, तर ही नैसर्गिक साधनसंपत्ती संपेल. आज ज्या वेगाने तिचा उपयोग होत आहे, त्या गतीनं केवळ काही शतकंच ती पुरू शकेल.
आपण जर निसर्गातून काही घेतलं, तर त्याबद्दल मोबदला द्यायला नको का? पण, आपण जे परत करतो, ते अनेकदा अनैसर्गिक घटक असतात. प्लॅस्टिक आणि तद्जन्य वस्तू, अनेक रसायनं शेतीसाठी लागणारी, आपल्या चैनीसाठी, क्वचितच गरजेसाठी लागणारी उपकरणं या सगळ्यांपासून आपण निसर्गाला जे परत करतो, ते त्याला पचत नाही. म्हणजे ग्राहक म्हणून निसर्गापासून काही घेतो, त्याबद्दल त्याला 'खोटे पैसे' एका अर्थी देतो. म्हणजे जर जमा-खर्च मांडला, तर निसर्ग तोट्यात आहे. यात ग्राहक-विक्रेता असं नातंही खरं तर मांडता येणार नाही. कारण, निसर्गाची शुद्ध लूटच चालू आहे.
आपले पूर्वज पर्यावरणस्नेही होते. मुळात ते पर्यावरणाचा र्मयादित वापर करत होते आणि निसर्गाला जे परत करत होते, ते विघटनशील घटक होते. त्यांची संख्या म्हणजे पूर्वजांची आणि जो परतावा निसर्गाला दिला जात होता, त्याची मात्राही अल्प होती.
आज औद्योगिक क्रांती आणि वैद्यकीय क्षेत्रात लागलेले जीवनरक्षक शोध यांमुळे लोकसंख्या अर्मयाद वाढली आहे. त्यामुळेही पर्यावरणावर ताण आहेच. 

No comments:

Post a Comment