शिवशाहीत शक्तिकेंद्र किल्ले
शिवशाहीत व त्यापूर्वीही राज्यकर्त्यांसाठी किल्ले हे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळेच त्यांच्या रचनेपासून सर्वच गोष्टींचा फार बारकाईने विचार केला जात असे. या विचारांना रामचंद्र अमात्य यांनी शब्दबद्ध करून ग्रंथरूप दिले. त्यातून किल्ल्यांची शास्त्रशुद्ध रचना प्रत्ययास येते.
मचंद्रपंत अमात्य या शिवकालीन व्यक्तिमत्त्वाचा जन्म १६५0 सालचा. इ.स. १६७४ साली शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. त्यांनी केवळ २४ वर्षांच्या या तरुणास अमात्यपदासारखे क्रमांक दोनचे पद द्यावे. यातच या व्यक्तीच्या उत्तुंग बुद्धिमत्तेची साक्ष पटते. आपल्या अखेरच्या काळात इ.स. १७१६ च्या सुमारास, रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्र लिहिले. जेमतेम सात प्रकरणे आहेत यात. मात्र प्रत्येक प्रकरण अनेक प्रबंधांचा विषय ठरावा अशा असामान्य योग्यतेचे आहे. यातील भाषा, वाक्ये असामान्य आहेत. आज्ञापत्र म्हणजे शिवछत्रपतींसारख्या अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तिमत्त्वाची शब्दबद्ध झालेली मानसिकता आहे.
रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्राच्या 'दुर्ग' या विषयावरील प्रकरणात म्हटले आहे, ''संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग! दुर्ग असता मोकळा देश प्रजाभग्न होऊन उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झाल्यावर राज्य तरी कोणास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे झाले, त्यांनी आधी देशामध्ये दुर्गे बांधून तो देश शाश्वत करून घेतला. आले संकट त्या दुर्गाश्रयी परिहार केले.''
शिवछत्रपतींनीसुद्धा हे राज्य गडांचा योग्य असा उपयोग करूनच शुन्यातून निर्माण केले. जो जो भाग स्वत:च्या अधिपत्याखाली येत नव्हता, त्या त्या ठिकाणी त्यांनी नेमक्या जागा निवडल्या अन् गिरीदुर्ग वा जलदुर्ग बांधून ते ते भाग स्वत:च्या अधिपत्याखाली रुजू करून घेतले. याच पद्धतीचा अवलंब करत त्यांनी नाशिकच्या उत्तर सीमेवर असलेल्या साल्हेर व अहिवंतगडापासून दक्षिणेस कावेरीच्या तीरावर वसलेल्या जिंजीपर्यंत स्वायत्त स्वराज्याची प्रतिष्ठापना केली.
दुर्ग हे शक्तिकेंद्र अशी कल्पना करून त्या भोवताली विणलेले हे राज्य सर्वच दृष्टीने इतके बलिष्ठ अन् त्याचसवे चिवटही ठरले, की उत्तरकाळात औरंग्यासारख्या सर्वशक्तिमान अशा पातशहाने आपल्या संपूर्ण ताकदीनिशी दक्षिणेवर आक्रमण केले. इदलशाही, कुतुबशाहीसारखी साम्राज्यं एका फटकार्यानिशी त्याने धुळीस मिळविली. त्याच्या लेखी अतक्र्य, अशक्य असे काहीच नव्हते, मात्र शिवछत्रपतींनी रचलेल्या या दुर्गांच्या जाळ्यात तो पुरता अडकला. पूर्ण पंचवीस वर्षे तो मुघल सम्राट या जाळ्यातून सुटण्यासाठी तडफडत राहिला. पण ते त्यास त्याच्या मृत्यूपर्यंत शक्य झाले नाही. शिवछत्रपतींच्या राज्यात दुर्ग होते म्हणूनच हे राज्य शिल्लक राहिले. त्या वादळातून नव्या जोमाने उठून उभे राहिले! म्हणून स्वये शिवछत्रपतींचे व त्यांच्या पदरीच्या विचारवंत मुत्सद्यांचे मत असे, की राज्यकर्त्याने सदोदित मनी बाळगायला हवे, की दुर्ग म्हणजेच राज्य, दुर्ग म्हणजे राज्याचा पाया, दुर्ग म्हणजेच राज्याची अर्थव्यवस्था, दुर्ग म्हणजे राज्यलक्ष्मी, दुर्गम्हणजेच सैन्याचे बळ, दुर्ग हीच आपली आश्रयस्थाने, दुर्ग हेच सुखनिद्रागार, किंबहुना दुर्ग हेच स्वत:च्या व राज्याच्या प्राणसंरक्षणाचे एकमेव साधन आहे. म्हणून मग याविषयी कुणाच्याही भरवशावर विसंबून राहू नये. आहेत त्या दुर्गांच्या निगराणीचा अन् संरक्षणाचा व नवीन दुर्गाच्या निर्मितीचा ध्यास राजाने स्वत:च बाळगावा. कुणावरही विश्वास न ठेवता या बाबी स्वत:च्या अखत्यारित ठेवाव्यात. शिवछत्रपतींची त्यांच्या दुर्गांकडे वा दुर्गांच्या राज्य उभारणीतील सहभागाकडे पाहण्याची दृष्टी ही अशी होती. दृष्टी नव्हेच ती द्रष्टी नजर म्हणायचे तिला. याच नजरेने, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अक्षरश: शुन्यामधून मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या पराक्रमाचा डिंडिम दशदिशांत गर्जविला.
अशा अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दुर्गांची व्यवस्था सुद्धा शिवकाळात अतिशय नेटकी अन् आखीवरेखीव होती. दुर्गांचा वेगळा विभाग नव्हता कारण तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता!
No comments:
Post a Comment