Blogroll

ओरांगउटान बुद्धिमान

ओरांगउटान बुद्धिमान


माणूस बुद्धिमान खरा; पण चिंपांझी, गोरिला आणि ओरांगउटान ही माणसाशी नातं सांगणारी महाकपी मंडळीही बुद्धिमान असतात. त्यांना प्रशिक्षित करता येतं, त्यांच्या बुद्धीचं मापन करता येतं आणि त्यातून दिसतं, की लाखो वर्षांपासून त्यांची बुद्धिमत्ता विकसित होत गेली आहे.
पी वर्गातील एक प्राणी म्हणजे ओरांगउटान. १६ ते १९ दशलक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेत अस्तित्वात आलेलं मूळ पाँगिनी कुळातला हा प्राणी आशिया खंडात पसरला. चार लाख वर्षांपूर्वी त्यातून बोर्निओतली एक आणि सुमात्रामधील एक अशा दोन शाखा निर्माण झाल्या. मात्र, सुमात्रात त्यांचा अधिवास १५00 मीटरपर्यंत तर बोर्नियोत तो १000 मीटर उंचीवरच्या जंगलांपर्यंत सीमित राहिला. मैदानी गवताळ प्रदेश, पाणथळ मैदानी जंगलं, शेतं, बागा आणि उथळ तळी अशा ठिकाणीही त्यांचा वावर आढळतो.
जंगलातल्या उंच झाडांवरच त्यांचा निवास असतो. कधी कधी तर ही मंडळी दाट जंगलातल्या आसपासच्या फांद्यांना लटकत वरच्यावरच मैलोन्मैल प्रवास करतात. झाडात निवास करण्यासाठी फांद्या, पानं यांचा उपयोग करून ऐशआरामी घरट्यांची उभारणी ते दहा मिनिटांतच निष्णातपणे करतात. त्या घरट्यात खाली पानांचा बिछाना तयार करतात, उशा तयार करतात आणि पांघरुणसुद्धा बनवतात. पावसाळ्यात मोठाल्या पानांच्या छत्र्यांसारखा उपयोग करतात. मनुष्यवस्तीजवळच्या मोठाली घमेली, टब्स अशा साहित्याचाही वापर करून त्य खाली ते आश्रय घेतात. ही त्यांच्या बुद्धिमत्तेचीच लक्षणे होत. ही वांदरं थोराड अंगाची, रुंद मानेची आणि शरीराच्या उंचीपेक्षाही जास्त लांबीचे हातपाय असलेली असतात. माणसांसारखेच त्यांच्या हातांना बोटांच्या विरुद्ध बाजूचे, पकड घेता येण्यासारखे अंगठे असतात. शरीर खूप लांब आणि लाल तपकिरी रंगाच्या भरड दाट केसांनी झाकलेलं असतं. कातडी काळपट राखाडी रंगाची असते. डोकं खूप बोजड, मोठं असतं आणि तोंड खूप रुंद आणि मोठं असतं. चेहर्‍यावर केस नसतात; पण गालफडं खूप मोठी असतात. मात्र हे वैशिष्ट्य वयात आलेल्या नरातच दिसतं. त्यांच्या या मांसल गालफडांमुळे त्यांचा चेहरा क्रूर, कुद्ध दिसतो. प्रतिस्पध्र्यांवर किंवा शत्रूवर मात करायला त्यांचा उपयोग होतो. नरांच्या गालातल्या पोकळ पिशव्यांमुळे त्यांना मोठाले आवाज काढता येतात. त्यांच्या आरोळ्या एक दीड किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात. नर थोराड असतात. त्यांचं वजन ११८ किलो भरतं, तर माद्यांचं वजन ४५ ते ५0 किलो असतं. नरांची उंची १७५ सेंमी आणि माद्यांची १२७ सें.मी. भरते. नराच्या हातापायांची लांबी २ मीटरपर्यंत असते. म्हणजे आजानबाहू माणसांचं वर्णनही त्यांच्या बाबतीत कमी पडतं. ही वांदरं बिनशेपटीची असतात.
या वांदरांच्या आहारात मुख्यत: हंगामी फळं ६५ ते ९0 टक्के असतात. फळांचा हंगाम नसेल तेव्हा पानं, झाडांची साल नाहीतर किडे, मध, पक्ष्यांची अंडीसुद्धा असतात. फळांमध्येही रसदार, गर असलेल्या गोड फळांना प्राधान्य मिळतं. त्यामुळे त्यांना दिवसाला ११,000 उष्माकांचा आहार मिळतो. इतर हंगामातल्या आहारातून दररोज २000 उष्मांक मिळतात. आहाराचं प्रजननक्षमतेशीचं नातं निगडित असतं. त्याचप्रमाणे माद्यांची दूधनिर्मितीही त्यावर अवलंबून असते. या प्रकारच्या आहारामुळे बीजप्रसारही मोठय़ा प्रमाणात होतो. गजरेनुसार अनेकदा मातीचाही समावेश आहारात होतो. त्यातून खनिजांची गरज भागते. त्यामुळे त्यांच्या खाण्यात विषारी फळं, किडे असे पदार्थ आल्यास त्यांना विषबाधा होत नाही. याबरोबरच कॉमेलिनासारख्या वनस्पतींची निवड करून पोटाचे विकार आणि अवयवांची सूज वा दु:ख दूर केलं जातं. इतर माकडांप्रमाणे यांच्यात टोळीजीवन नसतं. एकांडेपणा हा त्यांचा स्थायिभाव असतो. नरमादी मीलनापुरते काही काळ एकत्र राहातात. आई मात्र पोराचा सांभाळ पहिल्या दोन वर्षांपर्यंत करते. पहिले चार महिने तर पोराचा प्रवास आईच्या पोटाला चिकटूनच होतो. नर पंधराव्या वर्षी तर मादी ९ व्या वर्षी वयात येते. त्यांचं आयुर्मान ३0 वर्षांचं असतं. दोन वर्षांंत प्रशिक्षित ओरांगउटान ३0 ते ४0 प्रकारची चिन्हं वा वस्तू ओळखू शकतात. त्यांना प्रतिसाद देतात. टचस्क्रीन या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून तरुण ओरांगउटान खेळही खेळू शकतात, असं नव्या प्रयोगातून दिसलं. एकमेकांशी संवाद साधायला, वर्चस्व प्रस्थापित करायला आवाजांच्या भाषेचा उपयोग केला जातो. त्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमणं होऊ लागली. त्यांची विविध कारणांसाठी शिकार झाली म्हणून त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय.

No comments:

Post a Comment