Blogroll

मानवी शरीरावर किरणांचा घातक परिणाम

 मानवी शरीरावर किरणांचा घातक परिणाम 

Radioactive Chemicals,  मानवी शरीरावर किरणांचा घातक परिणाम

मानवी शरीर असंख्य घटकांचे बनले आहे. त्यातील काही घटक किरणोत्सर्गातही तग धरतात तर काही मात्र त्याला तत्काळ बळी पडतात. कसेही असले तरी अंतिम परिणाम शरीराची हानी होऊन मृत्यू होणार हाच आहे. किरणांच्या अभ्यासातून हेच सिद्ध झाले आहे. व्र किरणांच्या अतिमार्‍याने उशिरा होणार्‍या परिणामांची काही महत्त्वाची स्पष्टीकरणे शास्त्रज्ञांनी प्रयोगांअंती नमूद केली आहेत. हे परिणाम साधारण महिने किंवा वर्षानंतर उद्भवतात. उशिरा होणार्‍या परिणामांच्या अभ्यासात शास्त्रज्ञांना प्राण्यांवर प्रयोग करताना त्यांचे आयुष्य कमी झालेले आढळले. असा परिणाम माणसांवर करणो अशक्य असल्याने, हा परिणाम अस्तित्वात आहे की नाही, यात शास्त्रज्ञांची द्विधा मन:स्थिती आहे. मात्र जास्त किरणांचा मारा मानवाचे आयुष्य कमी करण्यास कारणीभूत असून, यात शास्त्रज्ञांना कुठलीही शंका नाही. जपानमधील अणुबॉम्ब उत्पातात किरणांच्या मार्‍यामुळे रक्ताचा कॅन्सर व इतर कॅन्सरचे प्रमाण आढळून आले होते. याचे प्रमुख कारण म्हणजे किरणोत्सर्गी वर्षावामधील घटकांची अपाय करण्याची तीव्रता व त्यामधून निघणार्‍या न्यूट्रॉन, गॅमा, बीटा या भेदक किरणांमुळे होणारे परिणाम हे होय. या किरणांच्या आरपार भेदून जाण्याच्या शक्तीमुळे ते शरीरातील कोशिकांच्या पेशीतील रेणूंवर आदळून त्यांचा नाश घडवतात.
मानवी रक्तामधील घटकांवर किरणांच्या होणार्‍या परिणामांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी विस्ताराने केल्याचे आढळते. ठळकपणे सांगायचे झाल्यास, लसीका ऊती, अस्थिमज्जा आणि प्लीहा यांसारखे विविध घटक शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये रक्त तयार करतात. संवेदनाक्षम असल्याने या भागांत किरणांची लवकर अभिक्रिया होते. म्हणूनच मानवी शरीरात जठरातील आंतरिक मार्ग, डोळ्यांतील बुबुळे आणि पुनर्निर्मित होणारे इंद्रिय यांसारख्या उतिकांना 'किरण संवेदनाक्षम उतिका' असे म्हणतात. तर परिपक्व असलेल्या स्नायूंच्या पेशी, अस्थी, कास्थी किंवा अस्थिरूप न पावलेले आणि केंद्रस्थानी असलेली चेतासंस्था यांना 'किरणरोधक उतिका' असे म्हणतात. या उतिकांवर अनिष्ट परिणाम होण्यास साधारण जास्त किरणांचा मारा करणो आवश्यक असते. त्वचा, फुप्फुसे, यकृत यांसारखे मानवी शरीरातील अवयव मात्र किरणांना मध्यम स्वरूपात संवेदनाक्षम असतात.
वरील किरणांच्या मार्‍याच्या परिणामांचे वर्णन हे मुख्यत: बाहेरील सर्वच किरणांच्या स्रोतापासून होणारे आहेत. सर्वसाधारण अणुगर्भातून निघणार्‍या किरणांचे जीवशास्त्रीय परिणाम हे विविध किरणोत्सर्ग असलेल्या पदार्थांच्या परिणामांसारखेच असतात. पण, यामध्ये क्वचित प्राप्त परिस्थितीमध्येही शरीरात अतिशय कमी प्रमाणात असलेले वरील स्रोतही भयंकर परिणाम अथवा इजा घडवून आणू शकतात. एखादे किरणोत्सर्गी द्रव्य अथवा अणुकेंद्र विशिष्ट एका पेशीवर किंवा उतिकावर एकाग्र झाले, तर त्या परिणामांची अवस्था बिकट होते. कॅल्शिअम, स्ट्रॉन्शिअम, बेरिअम आणि रेडिअम यांसारखी किरणोत्सर्गी द्रव्ये अस्थींवर जोरदारपणो आक्रमण करतात. ही द्रव्ये मानवी शरीराचा सांगाडा किंवा अस्थिपंजा यावर जाऊन बसतात. प्लुटोनिअम आणि सेरिअम हेसुद्धा अस्थींवर आक्रमण करतात. प्राण्यांवर झालेल्या प्रयोगांच्या परिणामांच्या आधारे शास्त्रज्ञांनी प्लुटोनिअम शरीराच्या यकृतातही सामावला जाऊ शकतो, असा निष्कर्ष काढला. याचाच अर्थ, जर किरणोत्सर्गी द्रव्य हे सूक्ष्म प्रमाणात जरी शरीराच्या आत गेले, तर त्याचे भयंकर परिणाम मानवास भोगायला लागतात. यात प्रामुख्याने ही द्रव्ये संवेदनाक्षम असलेल्या अस्थिमज्जा व रक्त तयार करणार्‍या पेशींवर खोलवर परिणाम अथवा इजा करतात. पुढे जर अस्थीतील उतिकांवर सतत किरणांचा मारा होत राहिला, तर त्याचे रूपांतर ट्यूमरमध्ये होण्यास वेळ लागत नाही. 

No comments:

Post a Comment