Blogroll

शमी चे पाना चे महत्व | shami chi pan

शमी चे पाना चे  महत्व | shami chi pan


शमी आपल्याला माहिती आहे ती पांडवांनी अज्ञातवासात त्यावर ठेवलेल्या शस्त्रांमुळे. दसर्‍याला त्यांनी ती शस्त्रं काढली व कौरवांबरोबर युद्ध पुकारले वगैरे. पण हा वृक्ष तेवढय़ापुरताच प्रसिद्ध नाही, तर त्याचे आणखीही बरेच गुणधर्म आहेत. कमी पाण्याच्या प्रदेशात वाढणारा, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मी, अग्निपादप, सागरी, खेजडी, शंकर अग्निगर्भा पापनाशिनी- ही सर्व शमीची नावं. प्रत्येक नाव अर्थवाही; 'शमयते दोषान' - म्हणजे दोषांचे शमन करणारी, अग्निपादप वा अग्निगर्भा-अर्थात अग्नी धारण करणारी होय, यज्ञीय अग्नी तयार करताना काडी पेटवायची नाही तर लाकडावर लाकूड घासून, मंथन करून अग्नी निर्माण करायची पद्धत होती. त्यात शमी महत्त्वाची. शंकर या नावाची फोड शं-कर म्हणजे शुभकारक, पापनाशिनी असणारी- 'शमयति पापान्' अशी शमी म्हणूनच शं-कर शुभ; सागरी म्हणजे सम्यक् गर असणारी; इतर शेंगा शुष्क असतात; पण शमीची शेंग गरयुक्त म्हणून सागरी. याशिवाय शमी अजप्रियाही आहे. शेळ्या, बकर्‍यांना शमीचा पाला खूप आवडतो. खेजडी हे नाव मात्र स्थानिक म्हणजे राजस्थानात प्रचलित असणारं नाव आहे. 
राजस्थानच्या मरुभूमीत खेजरी म्हणजे शमी, केर आणि रुईची चलती. या जवळजवळ निपाण्या प्रदेशात यांचच साम्राज्य. म्हणून आजही भारतात कुठेही स्थिरावलेल्या राजस्थानी समाजात धार्मिक समारंभात केर अर्थात नेपती आणि सागरे या दोन्ही फळांची उपस्थिती अनिवार्य!
आपल्याला शमीचा परिचय केवळ गणेशप्रिय पत्री म्हणून! मात्र प्रत्यक्षात गणेशचतुर्थीच्या आसपास जी शमी बाजारात उपलब्ध असते, ती अस्सल शमी नसते, तरी ती असतात शमी सारखीच दिसणारी, त्याच कुळातल्या खैराची पानं; बरं आहे, सामान्यांना शमी आणि खैर यातला फरक कळत नाही तेच! कारण पुण्याच्या आसपास शमी तशी दुर्लभच आहे! त्यामुळे खैरानं शमीवर एकप्रकारे खैरच केली आहे. 
शमीचा वृक्ष जवळजवळ दहा ते वीस मीटरपर्यंत उंची गाठतो. मूळचा निपाण्या देशाचा रहिवासी असल्याने त्याची मुळं जमिनीखाली खूप खोलीपर्यंत वाढतात, त्याचं कारण पाण्याचा वेध! खोड काळसर वर्णाचं, कोवळ्या फांद्यांवर बारीक काहीसे वक्र काटे, पानं द्विपिच्छिल, मुख्य पर्णाक्ष सुमारे पाच सेंमी लांबीचं, फिकट पिवळसर हिरवं, त्यावर दुय्यम पर्णाक्षांच्या दोन जोड्या. ही जोड्यांची संख्या शमीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. या दुय्यम पर्णाक्षावर नगण्य आकारमानाच्या राखाडी वर्णाच्या पर्णिकाच्या सात ते बारा जोड्या. पर्णाक्षांवर काही वेळा कीटकांची निवासस्थानं असणारे बारीक बारीक फोड.
शमीच्या मंजिर्‍या आखूड, अंदाजे चार ते पाच सेंमी लांबीच्या. या लोंबत्या मंजिर्‍यात नगण्य आकारमानाची पिवळट रंगाची फुलं, फुलातून बाहेर डोकावणारे पुंकेसरही पिवळे. त्यांची संख्या दहा आणि प्रत्येक पुंकेसराच्या डोक्यावर एका सूक्ष्म ग्रंथीची शिरवा, अर्थात फूलच अतिशय लहान तेव्हा पुंकेसराचं सु-दर्शन केवळ भिंग वापरूनच घेता येईल. शमीची शेंग मात्र भरपूर मोठी, म्हणजे दहा ते वीस सेंमी.पर्यंत. लांब, टपोरी, फुगीर आणि सरळ. शेंगेत तपकिरी रंगाचा पिठुळ गर असतो आणि तो खाण्याजोगा. 

शमीभोवती अनेक कथांची वलयं आहेत. त्यातील सर्वात प्राचीन म्हणजे श्रीमत् भागवतातील कथा, पुरुरवा- ऊर्वशीची! राजाला सोडून जाताना ऊर्वशीनं त्याला एक स्थाली म्हणजे थाळी दिली. 'तुला माझ्या आठवणीचं दु:ख जेव्हा असह्य होईल, तेव्हा या थाळीचं दर्शन घे' असं ऊर्वशीनं राजाला सांगितलं. पुरुरवा-ऊर्वशीचा वियोग झाला तो एका अरण्यात. तिथेच पुरुरव्याने ती थाळी सोडून दिली आणि तो राजधानीत परत आला. जेव्हा पुढे कधी त्याला ऊर्वशीची आठवण झाली तेव्हा तो वनात आला. तेव्हा थाळीच्या जागी एक अश्‍वत्थ आणि शमीवृक्ष एकमेकांत गुरफटून वाढलेले त्याला दिसले. राजाने या दोन वृक्षांची अरणी तयार केली. त्यातून जो अग्नी निर्माण झाला तो 'पुरुरवस' अग्नी. 

No comments:

Post a Comment