Blogroll

Low Cost Plastic Battery 2013 | कमी खर्चाची पण सुरक्षित प्लास्टिक बॅटरी

Low Cost Plastic Battery 2013 | कमी खर्चाची पण सुरक्षित प्लास्टिक बॅटरी


बॅटरी हा शब्द उच्चारला की आपल्यासमोर येते लेड-अ‍ॅसिड बॅटरी. छोटय़ा आकाराच्या बॅटऱ्यांसाठी आपण सेल हा शब्द वापरतो. लेड अ‍ॅसिड बॅटरी म्हटली की सर्व बाजूंनी पाघळणारे अ‍ॅसिड; मोठमोठी विद्युत अग्रे आणि काळ्या रंगाने माखलेला जड ठोकळा असे साधारणत: लेड अ‍ॅसिड बॅटरीचे स्वरूप असते. या बॅटरीची देखभाल ही एक फार मोठी कटकटीची गोष्ट आहे. कार बॅटरीची नीट देखभाल ठेवली नाही; तर खिशाला चाट बसलीच म्हणून समजा. पारंपरिक बॅटरीचे हे दुर्गण घालवून तिला हलकी करण्याचे प्रयत्न कित्येक वर्षांपासून चालू होते. त्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. ज्यांना बॅटरीच्या कार्याची थोडीफार माहिती आहे त्यांना बॅटरी आणि प्लास्टिक हे समीकरण जरा विचित्र वाटेल. प्लास्टिक हा पदार्थ विद्युत दुर्वाहक (इन्सील्युटर) आहे. प्लास्टिकचा विद्युत प्रवाहाला इतका विरोध असतो की, त्यामधून विद्युत प्रवाह वाहूच शकत नाही. परंतु विद्युत दुर्वाहकाला सुवाहक (कंडक्टर) बनविण्याच्या युक्तया शास्त्रज्ञांना चांगल्या अवगत आहेत. मूलत: दुर्वाहक असणारा सिलिकॉन सुवाहक केला गेला आहे. सिलिकॉनमध्ये अशुद्धता निर्माण केली की तो सुवाहक होतो. याला 'डोपिंग' म्हणतात. आज सिलिकॉन शिवाय इलेक्ट्रॉनिक्सचे कोणतेही साधन निर्माण होऊ शकत नाही. सिलिकॉन चिप तर संगणकाचे हृदय आहे. प्लास्टिक हा पॉलिमर या सेंद्रिय रसायनाचाच एक प्रकार आहे आणि काही पॉलिमर्स अशी आहेत की, त्यामध्ये अशुद्धता निर्माण केली की ते सुवाहक बनतात. प्लास्टिक बॅटरीच्या निर्मितीसाठी अशाच प्रकारांची अशुद्ध पॉलिमर्स वापरण्याची योजना आहे. इलेक्ट्रॉनिक साधनांचा बॅटरी हा जणूकाही प्राणवायूच आहे. बॅटराशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे जणू काही प्राणांवाचून शरीर होय.
पारंपरिक बॅटऱ्यांमध्ये शिसे, कॅडमियम, लिथियम, अ‍ॅसिड वगैरे गोष्टींचा वापर केला जातो. परंतु हे सर्व पदार्थ मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत. निकामी झालेल्या बॅटऱ्या आणि सेल्स आपण कुठेही टाकून देतो. लेड-अ‍ॅसिड बॅटरीला नेहमीच गळती लागलेली असते. अशा निष्काळजीपणातून पर्यावरणालाही धोका पोहचू शकतो. प्लास्टिक बॅटरीमध्ये कुठलेही घातक पदार्थ असणार नाहीत की ती 'लीक' होणार नाही. हाताळायला ती अतिशय सुरक्षित असेल. लवचिकता हा प्लास्टिक बॅटरीचा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म असणार आहे. प्लॉस्टिक बॅटरी रीचार्ज करून शेकडोवेळा वापरता येईल. तिच्यामधील पदार्थ सडणार नाहीत की दूषित होणार नाहीत; प्लास्टिक बॅटरीमध्ये कोणत्याही द्रवाचा किंवा जडमूलद्रव्याचा वापर केला जाणार नाही. अर्थातच हाताळायला ती अतिशय निर्धोक असणार आहे. प्लास्टिक बॅटरीचा आणखी एक विशेष गुणधर्म असा की ती अतितप्त किंवा अतिथंड हवेत तेवढय़ाच सक्षमतेने कार्य करू शकते. या उलट बाहेर थंडी पडली की, कारमधील लेड-अ‍ॅसिड बॅटरी गारठते आणि कार चालू करण्यासाठी नाकीनऊ येतात.
प्लास्टिक बॅटरीची विद्युत अग्रे अतिशय पातळ असतील आणि अ‍ॅसिडऐवजी त्यामध्ये विशिष्ट 'पॉलिमर गेल' किंवा फिल्म असेल. प्लास्टिक बॅटरीची जाडी, हे तिचे खास वैशिष्टय़ असेल. पोस्टकार्डापेक्षा प्लास्टिक बॅटरी जाड असणार नाही. अर्थात विद्युत प्रवाहाच्या कमी-जास्त आवश्यकतेनुसार तिची जाडी बदलेल. प्लास्टिक हा मूलत:च लवचिक पदार्थ आहे. त्यातून तो पातळ असेल व तो कसाही वाकविता येतो. प्लास्टिक बॅटरीची चटईप्रमाणे गुंडाळी करूनही पाहिजे तिथे ठेवता येईल. अमेरिकेतील डेट्रोईटच्या जवळील 'युनिव्हर्सिटी ऑफ नोटरडेम' येथील एका प्राध्यापकाने घडी घालून नेता येईल असे सोलर पॅनल बनविले आहे. तेव्हा अशा प्रकारची साधी बॅटरी बनविणे अशक्य नाही. अवकाश यानात प्लास्टिक बॅटरीचे खास स्थान असणार आहे. प्लास्टिक बॅटरी सोलर सेलला (पॅनलला) जोडून टाकली की ती आपोआप रीचार्ज होईल. प्लास्टिक बॅटरीच्या निर्मितीसाठी फारसा खर्च येणार नाही. सहज उपलब्ध असणाऱ्या रासायनिक सेंद्रिय संयुगापासून ती बनविली जाईल. विमानतळावरील धातुशोधकाला प्लास्टिक बॅटरीचा वेध घेता यावा म्हणून तिच्यामध्ये अल्प प्रमाणात का होईना धातू मिसळावा लागेल. म्हणजे अतिरेक्यांना लेटर बॉम्बसाठी प्लास्टिक बॅटरीचा बेमालूमपणे वापर करता येणार नाही. प्लास्टिक बॅटरीचा कॅलेंडर म्हणून तसेच दिवाणखान्यातील वॉल पेपर म्हणून वापर करता येईल.

No comments:

Post a Comment