Blogroll

रोझालिंड फ्रँकलिन संशोधक

रोझालिंड फ्रँकलिन संशोधक 

इतिहासात असे अनेक संशोधक होऊन गेले की, ज्यांना त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय मिळाले नाही किंबहुना त्यांनी केलेल्या संशोधनाचा फायदा घेऊन इतर संशोधक श्रेय मिळविण्यात यशस्वी झाले. विसाव्या शतकात ज्या विदुषीला श्रेय मिळाले नाही तिचे नाव आहे रोझालिंड फ्रँकलिन. ज्या थोड्या महिला संशोधकांनी विज्ञानात मोलाचे संशोधन दिले, त्यात रोझालिंड यांचे स्थान अव्वल दर्जाचे आहे. त्यांनी जीवभौतिक शास्त्रात संशोधन केले. प्रथिने, न्यूक्लिक आम्ल, विषाणू आणि कोळसा यांच्या रचनेसंबंधी एक्स किरणांचा वापर करून त्यांनी संशोधन केले. भौतिकशास्त्रातील तंत्र आणि उपकरणांचा उपयोग करून जैव रेणूंची रचना शोधण्याचे कार्य त्या काळी सुरू झाले होते. रोझालिंड या एक बुद्धिमान, मनस्वी आणि कष्टाळू महिला होत्या. त्यांचा स्वभाव थोडासा एककल्ली आणि अलिप्त होता.
१९५0च्या दशकात पेशीकेंद्रात असणार्‍या डी. एन. ए. (डीऑक्सिरायबो न्यूक्लिक अँसिड)च्या रचनेविषयी जोरदार संशोधन चालू होते. या न्यूक्लिक आम्लामध्ये कोणत्या प्रकारचे घटक आहेत, हे माहीत झाले होते. मात्र हे घटक एकमेकांना कोणत्या प्रकारे जोडले गेले आहेत, या विषयी एकमत होत नव्हते. शिवाय डीएनएचा आकार कसा असावा, या विषयी अनेक तर्क लढविले जात होते, त्या वेळी वॉटसन हा तरुण संशोधक अमेरिकेहून लंडन येथे संशोधन करण्यासाठी आला. वॉटसन यांना डीएनएच्या रचनेविषयी कुतूहल होते. डीएनएची रचना कशी असेल, या विषयी त्यांनी संशोधन केले. डीएनएच्या स्फटिकांचे एक्स किरणांचा साहय़ाने मिळविलेला किरणांचा आलेख त्यासाठी आवश्यक होता. वॉटसन हे जीवशास्त्राचे अभ्यासक होते, त्यामुळे एक्स किरणांच्या आलेखाचे विश्लेषण करण्यासाठी त्यांनी क्रिक या भौतिकशास्त्रज्ञाची मदत घेतली. त्यांनी एका रचनेची कल्पना मांडली, त्यामध्ये डीएनए हा द्विसर्पिलाकृती (डबल हेलिवल) या स्वरूपात असावा, असा त्यांचा कयास होता. मात्र त्यासाठी लागणारा प्रायोगिक आधार मात्र त्यांच्याकडे नव्हता. ती माहिती रोझालिंड यांच्याकडे होती. मात्र ती माहिती देण्यास त्यांचा विरोध होता. पुरेशी माहिती जमविल्याशिवाय प्रारूप मांडू नये, अशी त्यांची धारणा होती. वॉटसन यांना मात्र तेवढा धीर नव्हता कारण डीएनएची रचना समजल्यामुळे जीवशास्त्रातील अनेक समस्यांना उत्तरे मिळणार होती. शिवाय जीवशास्त्राच्या विकासाला चालना मिळणार होती. असे म्हटले जाते की वॉटसन यांनी रोझालिंड यांच्या परोक्ष ती माहिती मिळविली. ती माहिती एवढी महत्त्वपूर्ण होती की, वॉटसन आणि क्रिक यांना आपले प्रारूप बरोबर असल्याची खात्री पटली. हा शोधनिबंध १९५३मध्ये प्रसिद्ध झाला, त्यासाठी या दोन संशोधकांना १९५८मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. मात्र दुर्दैवाने रोझालिंड यांचा १९५७मध्ये वयाच्या ३७ व्या वर्षी कर्करोगाने मृत्यू झाला. नोबेल पारितोषिक मृत व्यक्तींना दिले जात नाही, त्यामुळे त्यांना हा बहुमान प्राप्त झाला नाही. भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस, एम. जी. रामचंद्रन हेही त्यांना श्रेय मिळण्याच्या बाबतीत असेच दुर्दैवी ठरले.

No comments:

Post a Comment