Blogroll

Horse head nebula - अश्वमुखासारखा मृगातील तेजोमेघ

Horse head nebula - अश्वमुखासारखा मृगातील तेजोमेघ

Horse head nebula - अश्वमुखासारखा मृगातील तेजोमेघ


आकाशात ग्रह, उपग्रह आहेत तसेच तारे आहेत. खुले आणि बंदिस्त तारकागुच्छ आहेत. दीर्घिका (Galaxies) आहेत. या तारकागुच्छांमधील किंवा दीर्घिकांमधील तारे येतात कोठून? तारे कसे तयार होतात? ताऱ्यांचा जन्म कुठे होतो? असे प्रश्न आपल्याला पडतात. त्याचे उत्तर म्हणजे तेजोमेघ. मेघ म्हणजे ढग. ढग म्हटले की आपल्याला पावसाचे ढग आठवतात. पण अंतराळातले म्हणजे आंतरतारकीय अवकाशांतले (space) ढग हे वायू आणि धूळ यांपासून बनलेले असतात आणि हे तेजोमेघच तारकांची जन्मस्थाने आहेत. या ढगातील वायुरूप द्रव्य अतिशय थंड असते. अत्यंत शीत तापमानामुळे त्या वायूंचे अणू-रेणू मंदावतात.
त्यांची इतस्तत: होणारी हालचाल मंदावते. त्यामुळे ते गोळा व्हायला, एकत्र व्हायला सुरुवात होते. गुरुत्वीय बलाचा जय होतो आणि मग वायूच्या एका महान गोळ्यातून असंख्य प्रक्रिया घडून कित्येक हजार किंवा लक्ष वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर तारा जन्माला येतो. अशा तारकांची जन्मस्थाने असलेले तेजोमेघ हे नभांगणाचे एक वैभव आहे. अश्वमुखासारखा दिसणारा मृगातील तेजोमेघ (Horse head nebula) हे नाव अनेक हौशी आकाश निरीक्षकांच्या तोंडी असते. खगोलाच्या भाषेत अनेक लॅटिन शब्दांचाही भरणा आहे. त्यामुळे तेजोमेघाचा समानार्थी लॅटिन शब्द Nebula (नेब्युला) असा आहे.
ढगांचा केर वाऱ्याने झाडून काढला तर आषाढ महिन्यात धनू राशीतील 'लगून नेब्युला' या तेजोमेघाचे दर्शन घेण्यास जास्त कालावधी मिळू शकतो. कारण रात्री नवाच्या सुमारास आषाढा नक्षत्राचे तारे दक्षिण-पूर्व आकाशात चांगले वर आलेले असतात. वृश्चिक-धनूच्या सीमारेषेवर जेथे आकाशगंगेचा खळाळता प्रवाह दिसतो त्या परिसरात 'लगून' तेजोमेघाचे दर्शन नुसत्या डोळ्यांनीही होऊ शकते. धनू राशीतील सिग्मा आणि लॅम्डा या ताऱ्यांना जोडणारी रेषा तशीच वाढविली तर लगून तेजोमेघ खात्रीने दृष्टीस पडेल. 
इ.स. १७४७ मध्ये ली जेंटिल याने हा तेजोमेघ पाहिल्याची नोंद आहे. ८ वर्षांच्या कालावधीनंतर होणाऱ्या लागोपाठच्या शुक्र अधिक्रमणांचे फार आटापिटा करूनही ज्याला त्याचे निरीक्षण करता आले नाही तोच हा जेंटिल. 
पऱ्लेमस्टीड या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञानेही १६८० मध्ये 'लगून नेब्युला'चे दर्शन घेतल्याची नोंद केली आहे. या तेजोमेघाचे अंतर पाच हजार प्रकाशवर्षांच्या आसपास आहे. या तेजोमेघाच्या पोटात एक खुला तारकागुच्छदेखील आहे. फार पूर्वी अशा धूसर दिसणाऱ्या सर्व वस्तू प्रचंड तारकांची वसतिस्थाने म्हणजे दीíघका आहेत, असा समज होता. उलट अशा धूसर वस्तू म्हणजे वायू व धूळ यांचा प्रचंड साठा ही वस्तुस्थिती वर्णपटाच्या अभ्यासामुळे कळू शकली. लगूनसारख्या तेजोमेघातूनच मग असंख्य तारे जन्म घेतात.

No comments:

Post a Comment