आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यान
आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यान संपूर्ण जगभर एकशिंगी गेंड्याचं प्रमुख वस्तीस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. १९५0 साली अभयारण्य म्हणून स्थापन करण्यात आलेल्या काझिरंगाचं रूपांतर १९७४ साली राष्ट्रीय उद्यानात करण्यात आले.
निसर्गानं असा अप्रतिम सौंदर्याच्या अधिवासाची निर्मिती केली नसती, तर कदाचित मानवाला अशा प्रकारच्या नैसर्गिक विविधता असलेल्या आणि इतक्या विविध प्रजातींना पोषक असलेल्या राष्ट्रीय उद्यानाची निर्मितीच करता आली नसती.
गोलाघाट आणि नागाव जिल्ह्यांतील सुमारे ४३0 चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानात उपविषुवृत्तीय प्रकारचं वन आढळतं. घनदाट जंगल, हत्ती गवत, पाणथळीच्या जागा, उथळ तळी आणि बोरूची झुडपं अशा प्रकारच्या विविध परिसंस्थात, १५ प्रकारचे भारतामधील प्रमुख संकटग्रस्त प्राणी वास्तव्यास आहेत. जगामधील सर्वात मोठी संख्या इथे भारतीय एकशिंगी गेंड्याची या ठिकाणी असून टोपीधारी लंगूर, हुलॉक, गिबन, वाघ, गांगेय डॉल्फिन्स, गवे, सांबर, स्वॅम्प डिअर यासारखे इतर प्राणीही या ठिकाणी दिसतात.
उत्तरेला प्रचंड ब्रम्हपुत्र ही नदी आणि दक्षिणेला काबरे ऑगलॉग टेकड्या यांच्या बेचक्यात काझिरंगा वसलेलं आहे. भारताचा खजिना म्हणून काझिरंगाचं वर्णन केलं जात असलं, तरी १९८५ मध्ये त्याला जागतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आलंय. पूर्व भारतामधील मानवी उपस्थितीचा उपद्रव नसणारं ते बहुधा शेवटचं स्थान असावं. नजीकचे विमानतळ जोरहाट ९६ कि.मी. अंतरावर, तर रेल्वेस्थानक फुर्कटिंग ७५ कि.मी. अंतरावर आहे.
No comments:
Post a Comment