Blogroll

बुरशी चे संशोधन सूक्ष्मजीवशास्त्र

बुरशी चे संशोधन सूक्ष्मजीवशास्त्र

बुरशी चे संशोधन सूक्ष्मजीवशास्त्र

अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचा एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लंडनमधील एका हॉस्पिटलमध्ये जीवाणूवर संशोधन करीत असे. एके दिवशी स्टेफायलोकोकस ओरिअस या जीवाणूची बशी (पेट्री प्लेट) स्वच्छ करण्याचे विसरून तो तसाच गावाला गेला. परत आल्यावर, एका हिरव्या-पिवळ्या रंगाच्या बुरशीमुळे या जीवाणूची वाढ खुंटल्याचे त्याला दिसून आले.
ही बुरशी म्हणजेच पेनिसिलिअम नोटटम. या बुरशीतून पेनिसिलिन हे प्रतिजैविक वेगळे करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. मानवाच्या इतिहासातली ही अत्यंत महत्त्वाची घटना ठरली. होवर्ड फ्लोरे आणि अन्स्र्ट चेन या संशोधकांनी या शोधाचे महत्त्व ओळखले. या प्रतिजैविकाचे प्रमाण वाढविण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले.
मानवी जीवनात पावलोपावली उपयोगी पडणार्‍या या संशोधनाबद्दल १९४५ मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्यासोबत होवर्ड फ्लोरे आणि अन्स्र्ट चेन यांना नोबेल परितोषकाने गौरविण्यात आले.
बदलत्या वातावरणामुळे प्रतिजैविकांना दाद न देणार्‍या जीवाणूंच्या हट्टी प्रजाती आता विकसित झाल्या असल्या तरी पेनिसिलिनचा वापर अनेक सुधारणा आणि इतर प्रतिजैविकांची जोड घेऊन आजही वैद्यकशास्त्रात केला जातोच. अलीकडच्या काळात, २00१ मध्ये सॅकारोमायसीस सेरेविसी (बेकिंग यीस्ट) या एकपेशीय बुरशीला नोबेलविजेत्या संशोधनामधे सहभागी होण्याचा मान मिळाला.
एका सजीवातून दुसरा सजीव निर्माण होण्याची साखळी पेशींमुळेच जिवंत राहते. एका पेशीचे विभाजन होऊन नवीन पेशी पायरी-पायरीने निर्माण होतात. अतिसूक्ष्म पातळीवर घडणारे, एका पेशीतून दुसरी पेशी जन्माला येण्याचे हे विकासचक्र सजीवांसाठी फार महत्त्वाचे; परंतु जटील असते.
सॅकारोमायसीस सेरेविसी या बुरशीच्या पेशीविभाजनातील टप्पे, त्यामध्ये सहभागी असणारी प्रथिने व त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणार्‍या लेलंड हार्टवेल, पौल नर्स आणि टीम हंट या शास्त्रज्ञांच्या शोधनिबंधास नोबेल पारितोषिक मिळाले. वनस्पती, प्राणी आणि बुरशा यांच्या पेशीचक्रामध्ये, जराशा बदलामुळे होणार्‍या गुंतागुंतीवर यामुळे उत्तरे मिळणे सोपे जाणार आहे. या संशोधनाचा उपयोग भविष्यात कर्करोगांच्या पेशींचा अभ्यास करताना अभ्यासकांना होणार आहे.

No comments:

Post a Comment