कडुनिंब
कडुनिंब अस्सल भारतीय वृक्ष. वानसशास्त्रीय नाव अझाडिराक्टा इंडिका. अझाडिराक्टा
या प्रजातीविषयक नामाचं मूळ पार्शियन भाषेतील. या वृक्षाचा एक भाईबंद
पार्शियामध्ये राहतो, त्याचं नाव मेलिया आझाडाराक. मुस्लिम जेव्हा भारतात
आले तेव्हा त्यांनी कडुनिंबाला केलं अझाडिराक्टा. अझाडिराक्टाची फोड अशी,
अझा-डाराक्टा- इ-इंड याचा अर्थ भारताचा मेलिया.
कडुनिंब, कडूलिंब या
नावातूनच त्याचा गुणधर्म प्रकट होतो, कडुचवीचा, 'निंबा'चा लिंब होण्याचं
कारण त्याच्या पिकलेल्या फळांचा-निंबोळ्यांचा, लिंबासारखा पिवळा रंग.
संस्कृत भाषेत कडुनिंबाला अनेक नावं, नव्हे सार्थ नावं आहेत. त्या संबंधीचा
ोक असा.
निम्ब स्यात् पिचुर्मदश्च तिक्तक !
अरिष्ठ : पारिभद्रश्च हिंगुनिर्यास : इत्यापि!
'निम्बति,
सिच्चति स्वास्थ्यम'-म्हणजे स्वास्थ्य रक्षणारा ; पिचुर्मद-पिचुमंद यातील
'पिचु'चा अर्थ कुष्ठ, कुष्ठरोगाचं र्मदन, शमन करणारा. तिक्त अर्थात कडू
चवीचा; संस्कृतात अर्थ पूर्ण विरुद्ध. तिक्त म्हणजे कडू आणि कटूरस म्हणजे
तिखट, अरिष्ट अर्थात अशुभ टाळणारा, सर्व परिवाराचं भलं अर्थात भद्र करणारा
तो परिभद्र; याचा खोडातून हिंगासारखा रस पाझरतो, म्हणून हा हिंगुनिर्यास.
कडुनिंब
हा अतिपरिचित वृक्ष आहे. मध्यम बांध्याचा, फांद्यांच्या टोकाशी एकवटलेली
संयुक्त पानं; पर्णिका पेरभर लांबीच्या, तिरप्या दातेरी कडांच्या, तळाशी
असमान; कडुनिंब खरं तर पानझडीवृत्तीचा, पण त्याची पर्णहीन अवस्था फारच
क्षणिक; चैत्र प्रतिपदेच्या आसपास त्याला पालवी येते आणि मोहरही. नवी कोवळी
पानं तांबूस रंगाची, फु लांचे तुरे आणि कोवळी पानं यांची गुढीच कडुनिंबानं
उभारलेली असते. पावसाळ्याच्या तोंडाशी कडुनिंब फळतो.
कडुनिंबाला निंबोळ्यांचं अमाप पीक येतं.
'निंब निबोळ्या मोडुनी आला!
तरी तो काऊळियासिची सुकाळ झाला
कावळ्यांना
निंबोळ्या रुचकर कशा लागतात, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. कारण
माऊलीनंच असं म्हटलं आहे, 'निंबोळीयेची पीक, वरी गोड आतुं विख.' असं असलं,
तरी निंबोळ्या विषारी असतात, असा संदर्भ कुठेही नाही. कडूपणा असा नष्ट
होणार्यातला नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, की साखरेचं आळं
केलं, तरी निंब आपला कडुपणा सोडणार नाही. मात्र, असं म्हणतात, की शिर्डीला
एक गोड कडुनिंब आहे. अर्थात त्याला हातही लावू देत नाहीत.
कडुनिंब हा
अमृतपुत्र आहे. अमृतकुंभ जरासा हिंदकळला आणि त्यातील दोन थेंब जमिनीवर
पडले. त्यातून कडुनिंबाचे दोन वृक्ष उगवले. एकावर ब्रह्मदेव, तर दुसर्यावर
श्री विष्णू आरूढ झाले. कडुनिंब शीतगुणधर्माचा, महिषासुर वधानंतर देवीनं
याच वृक्षाच्या शीतल छायेत काही काळ विश्रांती घेतली. पुरीच्या मंदिरातील
बलभद्र अर्थात बलराम, जगन्नाथ आणि सुभद्रेच्या प्रतिमा लाकडातूनच तयार
करतात; म्हणून हा काष्ठदेव म्हणजे दारुदेव; हे लाकूड कडुनिंबाचं असतं.
गुढीपाडव्याला कडुनिंबाची डहाळी बांधून
जशी गुढी उभारायची, तशीच कडुनिंबयुक्त चटणीही खायची परंपरा आहे. पंचागात
यातील घटक द्रव्यं दिलेली असतात. कडुनिंबाची कोवळी पानं, फुलं, मिरी, ओवा
चिंच, हिंग, मीठ, साखर आणि चिंचेचा कोळ यापासून तयार होणारं चाटण कफ आणि
पित्त या दोन्ही दोषांना ताळ्यावर आणतं आणि उन्हाळा सुखावह करतं. येणार्या
वर्षप्रतिपदेला अशी चटणी करुन अवश्य खा
No comments:
Post a Comment