Blogroll

विरघळणार्‍या बॅटर्‍या Soluble Battery

 विरघळणार्‍या बॅटर्‍या Soluble Battery 


बॅटरीची उपयुक्तता आणि सुटसुटीतपणा यांमुळे कोट्यवधी बॅटरी रोज तयार होतात आणि वापरल्या जातात. मात्र, त्या धोकादायक, क्वचित प्रसंगी स्फोटक आणि घातकही असतात. बॅटरीची ही भीती आता यापुढे बाळगावी लागणार नाही. कारण, संपल्या की आपोआप विरघळून जाणार्‍या बॅटर्‍या भविष्यकाळात उपलब्ध होणार आहेत. प्रभाकर खोले जनिर्मिती करणार्‍या बॅटरी म्हणजेच सेलचा वापर आपण अनेक ठिकाणी करत असतो. अगदी मोबाईलपासून खेळण्यांपर्यंत आणि रिमोट कंट्रोलपासून ते थेट वैद्यकीय आरोग्यरक्षक उपकरणापर्यंत. या सेलमध्ये रासायनिक प्रक्रिया करण्यात येऊन वीजनिर्मिती होत असते. त्यासाठीच त्यात अँसिड व इतर घातक रासायनिक द्रव्ये असतात. वापरात नसलेल्या किंवा संपलेल्या बॅटरीचा प्रसंगी स्फोट होऊन इजा होण्याची भीती असते. म्हणूनच वापरून झालेले सेल वेळीच व काळजीपूर्वक नष्ट करावे लागतात आणि लहान मुलांच्या हातांत तर ते मुळीच लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागते.
त्यातच वैद्यकीय उपकरणांसाठी अशा बॅटरीचा वापर जर करायचा असेल किंवा शरीरामध्येच रोपण केल्या जाणार्‍या वैद्यकीय यंत्रासाठी असा सेलही त्यात बसवायचा असेल, तर किती तरी जास्त काळजी घ्यावी लागते. सुरक्षित वेष्टने, निचरा होण्याची निर्धोक व्यवस्था, वेळीच इशारा देणारी यंत्रणा या सर्वांचा वापर करूनही धोका व त्यामुळेच काळजीही शिल्लक राहतेच. विरघळून जाणारी निर्धोक बॅटरी
आता मात्र अशी काळजी घेण्याची गरज उरणार नाही. एका नव्या संशोधनामुळे बॅटरीचा शरीराला होऊ शकणार्‍या अपायाचा धोका जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात येऊ शकेल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे. काम झाल्यावर सुरक्षितपणे विरघळून जाऊ शकणार्‍या बॅटरीचे युग येऊ घातले आहे. कानॅगी मेलन विद्यापीठामधील एका संशोधकांच्या गटाने बायोडिग्रेडेबल अशी विरघळून जाणारी बॅटरी तयार तयार केली आहे. विद्यापीठातील या संशोधन गटाचे प्रमुख प्रा. ख्रिस्तोफर बेटिंजर यांनी नुकतीच अशा प्रकारच्या बॅटरीची यशस्वी चाचणी केली.
आम्लाऐवजी माशाची शाई
सध्या वापरल्या जाणार्‍या बॅटरीमध्ये प्रामुख्याने लिथियन व इतर विषारी विद्युतवाहक घटक असतात. त्यामुळे वीजनिर्मिती चांगली होत असली, तरी हे घटक शरीराला अपायकारक असतात. शरीरामध्ये वापरावयाच्या वैद्यकीय उपकरणांतील संवेदक यंत्रे, पेसमेकर अशांमध्ये या बॅटरींचा वापर धोकादायक ठरू शकतो. आता बेटिंजर यांच्या शास्त्रज्ञगटाने बॅटरीत रासायनिक द्रवांऐवजी 'कटलफिश' नावाच्या माशाच्या शरीरातून सोडल्या जाणार्‍या शाईचा वापर केला आहे. ते पूर्णपणे जोखीममुक्त असते. एवढेच नव्हे, तर कालांतराने कार्यभाग संपल्यावर ते आपोआप विरघळूनही जाते. त्याचा शरीराला कसलाही धोका शिल्लक राहत नाही. साधे सेलही त्यांचा कार्यभाग संपल्यानंतर यामुळे निर्धोक होतात. त्यांच्यापासून काळजी घेण्याचे कारणच उरत नाही.
वारंवार शस्त्रक्रिया नको
पूर्वी शरीरामध्ये रोपण केलेले वैद्यकीय संयंत्र चालविणार्‍या बॅटरीला सुरक्षेसाठी संरक्षक कवच तर घालावे लागेच; परंतु बॅटरीची कालर्मयादा संपल्यानंतर ती पुन्हा बाहेर काढण्यासाठी व नव्याने बसविण्यासाठी परत शस्त्रक्रियाही करावी लागे.
आता ही भीती आणि धोका संपूर्णपणे समाप्त होईल. नव्याने येऊ घातलेली बॅटरी पूर्णपणे कार्यक्षम तर असेलच, पूर्वीच्या बॅटरीपेक्षा तिची कालर्मयादा फार मोठी असेल. शिवाय, शरीरातील यंत्राला वीजपुरवठा करण्याचे काम संपल्यावर ती निर्धोकपणे विरघळून जाईल.

तीळ भारतात कधी, कसा आला

तीळ भारतात कधी, कसा आला

अरबस्तानात जन्मलेला तीळ भारतात कधी, कसा आला? थोडा धांडोळा घेतला, तेव्हा असा पुरावा मिळाला, की तीळ भारतातूनच बाहेर गेला. फार प्राचीन काळापासून तिळाचा वापर होत असल्याच्या नोंदी आहेत. थर्ववेदात तिळाचे अनेक उल्लेख सापडतात. उत्खननातील पुरावा सांगतो, की सिंधूच्या खोर्‍यात गहू, मोहरी आणि तिळाची लागवड होत असे. पणि नावाच्या जमातीतील मंडळी व्यापारासाठी टायग्रीस-युफ्राटिसच्या दुआबात गेली, तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर तीळ तिकडे नेला. सुमेरियन लोकांना तिळाचं आकर्षण होतं.
भारतातून तीळ आयात करणं अवघडच होतं. कारण, या प्रवासाला लागणारा वेळ फारच मोठा होता. मग त्या देशातच तिळाची लागवड सुरू झाली. पॅलेस्टाईन आणि लगतच्या प्रदेशांत ख्रिस्तपूर्व ३000च्या आसपास तीळ लागवडीखाली होता. सुमेरियन संस्कृतीच्या लिखाणावर तिळाचा उल्लेख आहे, तो ख्रिस्तपूर्व २३५0चा. पाकिस्तानातील तिळाच्या लागवडीचे संदर्भ याच सुमाराचे. तीळ किती मौल्यवान समजला जाई, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्जाच्या व्यवहारात चांदी आणि तीळ महत्त्वाची गहाणवट समजली जाई.
भारतात तर तिळाची लागवड होतीच. महाराष्ट्रासारख्या अगदी सामान्य दर्जाची उपजाऊ जमीन असलेल्या प्रदेशात इतिहासपूर्व काळातही तिळाची लागवड होतीच. तेव्हा तीळ भारतातूनच बाहेर गेला, असं म्हणता येईल. मात्र, भारतातील तिळाचा वापर धार्मिक प्रथांशी निगडित होता. 'मनुस्मृती'ने कांदा, लसूण बहुधा त्यांच्या उग्र गंधामुळे त्याज्य ठरवले होते. तीळ पवित्र समजला जाई. 'तेषां दत्त्वा तु हस्तेषु सपवित्रं तिलोदकम्,' असं मनूनं म्हटलं आहे. रामायणात अश्‍वमेध यज्ञासाठी लक्ष्मणाने १0,000 गाड्या तीळ आणल्याचा उल्लेख आहे. राज्यारोहणप्रसंगी राजतिलक राजाच्या भालप्रदेशावर लावण्यात येई. हा तिलक शब्दही तिळापासूनच आलेला. 'स्नेहेन तिळवत् सर्वं सर्गचक्रे निपीडयते,' असं महाभारत सांगते. तीळ आणि त्याचं तेल दोन्हीही विध्वंसक शक्ती आणि आत्मे यांना दूर पळवतात, अशीही समजूत. तीळ, दूध आणि तांदूळ यांच्यापासून केलेल्या खिरीचा उल्लेख रामायणात आहे. केशर आणि तीळ यांचा वापर धार्मिक कृत्यांमध्ये केला जाई.
तीळ प्रामुख्याने तेल बी आहे. 'तिलात् इति तैलम्,' अशी तेलाची व्याख्या आहे. म्हणजे तेल प्रथमत: तिळापासून काढलं गेलं. याचा मुख्य गुणधर्म म्हणजे थंड वातावरणातही हे तेल द्रवस्वरूपीच असतं, गोठत नाही. या तेलात असणारे दोन अँटिऑक्सिडंट घटक म्हणजे सिसॅमोलिन आणि सिसॅमिअम. या दोन घटकांमुळे हे तेल लवकर खवट होत नाही. मेथिओनाईन आणि ट्रिप्टोफॅन नावाची दोन अमिनो आम्लेही संरक्षक आहेत. यातील मेथिओनाईन अधिक महत्त्वाचं. कारण, त्यात सल्फर असतो. फिकट पिवळ्या, सोनेरी वर्णाच्या या तेलाला फारच खमंग स्वाद असतो.
आयुर्वेदीय उपचारांत तेल म्हणजे फक्त तिळाचंच. उष्ण गुणधर्मामुळे वातहारक आणि कफशामकही. म्हणून डोकं दुखत असल्यास कपाळावर तेलाचं र्मदन हा एक उत्तम, घरगुती उपाय. काळे तीळ चावून खाल्ल्यास दात बळकट होतात. या तेलाचा दिवा स्वच्छ प्रकाश देतो. त्याला काजळी कमी धरते. म्हणून तर म्हणत असावेत, 'तिळाचं तेल, कापसाची वात, दिवा जळो सारी रात.'

सर्पविष रहस्य हलाहल पचण्याचे - Snake Poison Digestion Process

रहस्य हलाहल पचण्याचे - Poison Digestion Process

सर्पविष रहस्य हलाहल पचण्याचे - Snake Poison Digestion Process

विष रक्तात मिसळले, तर मृत्यू अटळ आहे. मात्र, तेच विष तोंडावाटे शरीरात गेले, तर पचले जाते. विष म्हणजे प्रोटिन आहे, हे याचे कारण आहे. नमधील एका उत्खननात हवेत उडू शकेल, अशा प्रकारच्या एका विषारी डायनोसॉरचा जीवाश्म सापडला आहे. या डायनोसॉरच्या दातांमध्ये विषारी सर्पांना असतात, अशा प्रकारच्या पोकळ्या आणि त्याच्या कवटीत विषवाहक दातांच्या वरच्या बाजूला विषाची पिशवी बसू शकेल, अशी एक पोकळीही आढळली आहे.
सुदैवाने असले प्राणी सध्याच्या युगात उपलब्ध नाहीत. पण, सापांच्या काही जातींमध्ये मात्र अशा प्रकारचे दात आणि विषग्रंथी आढळतात. सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये सर्पांव्यतिरिक्त अमेरिका खंडात आढळणार्‍या 'हीला मॉन्स्टर' नामक एका सरड्यातही हे अवयव आढळतात. सर्पांमध्येच हा गुण का आढळावा, या प्रश्नाचे उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असे उत्तर आहे, की पाय नसल्याने सापांना जमिनीवरून सरपटत जावे लागते. जमिनीशी होणार्‍या घर्षणाने त्यांचा पळण्याचा वेग अन्य प्राण्यांच्या मानाने कमी असतो. त्यामुळे प्रबल शत्रूपासून पळ काढणे किंवा पळणार्‍या सावजाचा पाठलाग करणे, या दोन्ही क्रियांसाठी लागणारा वेग सापाकडे नसतो. त्यामुळे अन्य प्राण्यांजवळ नसलेले विषारी दात सापाजवळ असतात. म्हणून सापांना जीवनकलहात तगून राहणे शक्य झाले असावे.
जैवरासायनिकदृष्ट्या सर्पविष हे प्रोटिन गटात मोडते. आपल्या रक्तात बाहेरचे कोणतेही प्रथिन गेल्यास त्यापासून आपल्या शरीराला कमी-अधिक प्रमाणात अपायच होतो. एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याला कोणत्याही प्राणिजन्य किंवा वनस्पतिजन्य प्रोटिनच्या काही ग्रॅम मात्रेचे इंजेक्शन दिले, तर ते बर्‍याचदा जीवघेणेही ठरू शकते. पण, हेच प्रोटिन जर तोंडावाटे पोटात गेले, तर त्याचे काहीही दुष्परिणाम न होता ते पचून जाते. सर्पविषालाही हाच नियम लागू होतो. त्यामुळे एखाद्यास साप चावल्यास त्याच्यावर जे प्रथमोपचार तातडीने करावयाचे असतात, त्यांपैकी एक म्हणजे तोंडाने जखमेतील विष शोषून घेणे. अर्थातच, हा उपचार करणार्‍या व्यक्तीच्या ओठांना किंवा तोंडात जखमा असता कामा नयेत. याप्रकारे विष शोषताना ते प्रथमोपचार करणार्‍या व्यक्तीच्या पोटात पचून जाते, त्यामुळे तिला अपाय होत नाही.


आंबट असूनही गोड चिंच - tamarind

आंबट असूनही गोड चिंच - tamarind


भुताखेतांचे निवासस्थान म्हणून चिंच भारतीय समाजात बदनाम आहे. मात्र, ही बदनामी विनाकारण आहे. कारण, अनेक भारतीय पदार्थ असे आहेत, की आंबट चिंचेमुळे त्यांची गोडी वाढते. चिंचेचे पाणी नसेल, तर भेळ कशाने ओली करणार? च म्हणजे एक डेरेदार सदाहरित वृक्ष. पान संयुक्त पिच्छाकृती. प्रथम श्रेणीच्या पर्णाक्षावर पर्णिकांच्या १0-१२ जोड्या. पर्णिकांची संख्या सम. रंग काळपट हिरवा. कोवळ्या पर्णिका पोपटी वर्णाच्या आणि चवीला चिंचेइतक्याच आंबट. फांद्यांच्या टोकाशी चिंचेचा मोहर येतो. बोटभर लांबीच्या दांड्यावर, लांब देठावर फुले येतात. फूल काहीसे श्रीखंडी वर्णाचे, नखभर आकारमानाचे. त्याच्या चार निदलांचा एक छोटासा पेला बनतो. काहीशा हिरवट पिवळ्या पेल्यातून तीन पाकळ्या निघतात. पिवळट पाकळ्यांवरच्या लालसर रेषांमुळे आणि लाल शिडकाव्यामुळे चिंचेची फुलं अतिशय देखणी. फुलात फक्त तीन कार्यक्षम पुंकेसर असतात. काहींमध्ये तीन वंध्य पुंकेसरही दृष्टोत्पत्तीस येतात. या पुंकेसरांच्या मध्यातून स्त्रीकेसर फुटतो.
पानाप्रमाणेच फुलंही आंबट चवीची. चिंच शेंगावर्गीय, पण या शेंगेचं वैशिष्ट्य म्हणजे पातळ असली, तरी लाकडासारखी काहीशी टणक साल. आतला गर मुख्यत: फिकट पिवळा आणि लालचुटुकही. गरात लपलेले चिंचोके काहीसे चौकोनी आणि चकचकीत-काळपट लाल वर्णाचे असतात.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आंबट चवीमुळे चिंच एकदम स्वयंपाकघरात शिरली असली, तरी चिंचेचं झाड एक बदनाम वृक्ष आहे. त्याला घराच्या आवारात प्रवेश नाहीच. कारण, या वृक्षावर अमानवी शक्तींचा वास असतो, अशी धारणा आहे. चिंचेच्या बदनामीसाठी ग्रामीण भागात एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी. एका नवविवाहितेचा पती व्यापारासाठी दूरदेशी निघाला. पत्नीनं त्याला सांगितलं, की जाताना रात्रीचा मुक्काम चिंचेखाली करायचा. मात्र, परत येताना कडुनिंबाखाली. नवर्‍यानं बायकोचा सल्ला मानला आणि परिणामी तो आजारी पडला. परतीच्या प्रवासात कडुनिंबाखाली झोपला. घरी येईपर्यंत ठणठणीत बरा! तात्पर्य- चिंचेवरील अमानवी वस्तीला पुरावा मिळाला!
चिंचेवरील भुतांच्या अशा असंख्य कथा ग्रामीण भागात आहेत. मात्र, मुलांना भीती दाखवण्यापलीकडे त्याला अर्थ नाही. चिंच हा दीर्घायुषी, सावली देणारा, चिंचेसह त्यातील चिंचोकेही उपयोगाकरता देणारा वृक्ष आहे, एवढे खरे.

Nano Explosive नॅनो स्फोटके

Nano Explosive  नॅनो स्फोटके  


अतिसूक्ष्म स्फोटकांचा वापर औद्योगिक, वैद्यकीय व कृषी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो, असा विश्‍वास शास्त्रज्ञांना आहे. पण, विघातक म्हणूनच त्याचा वापर होणे अटळ असून, शास्त्रज्ञांसाठीच नाही, तर एकूणच समाजासाठी तीच खरी चिंतेची बाब ठरत आहे. कविसावे शतक हे अतिसूक्ष्म तंत्रज्ञान व पदार्थांचे आहे. हे संशोधन विविध क्षेत्रांत आघाडी घेईल, यात शंका नाही. अतिसूक्ष्म म्हणजे नॅनो (१0-९ मी.) आकारात काही अणू गोळा करून, त्याचे गुणधर्म पडताळले जात आहेत. यात इतर पदार्थांव्यतिरिक्त स्फोटकांविषयीच्या संशोधनाचाही सहभाग आहे. काही पदार्थ अतिसूक्ष्म पातळीवर नेले असता स्फोटक हाच गुणधर्म प्रामुख्याने दर्शवितात. एक-दोन किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त करण्यासाठी कित्येक टन आर. डी. एक्स किंवा टी. एन. टी. या रासायनिक स्फोटकांची गरज भासते. जर का अतिसूक्ष्म स्फोटकांचा शोधघेतला, तर तेवढाच परिसर उद्ध्वस्त करण्यासाठी चिमूटभर अतिसूक्ष्म पदार्थ पुरेसा होईल. १९९0 पासूनच अतिसूक्ष्म आकारातील स्फोटकांच्या शोधाची सुरुवात झालेली आहे. कारण, पारंपरिक रासायनिक स्फोटकांपेक्षा यांची क्रियाशीलता प्रचंड प्रमाणात आहे.
याचा मुख्य हेतू अतिशय शक्तिशाली बाँब तयार करण्याचा आहे. यात प्रामुख्याने अँल्युमिनियम मॉलिब्डेनम, अँल्युमिनियम कॉपर, टिटॅनियम बोरॉन यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. अशा पदार्थांनी बनवलेली अतिसूक्ष्म स्फोटके बोटाच्या नखाखाली दडविणेही शक्य होईल किंवा शल्यचिकित्सा करून त्वचेखालील एखाद्या शिरेमध्येही ही स्फोटके नेणे शक्य होणार आहे. असे संशोधन दहशतवाद्यांच्या हातात पडले, तर समाजात अराजकता माजेल, यात शंका नाही. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात अशा प्रकारची स्फोटके वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणूनच अशा सूक्ष्म पदार्थांचा शोध घेण्यासाठीचे तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न होत आहेत. कुठल्याही स्फोटकात मुख्यत्वे ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश असतो. त्यानुसार ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन-नायट्रोजन, हायड्रोजन-नायट्रोजन यांच्या गुणोत्तरावर स्फोटकाची संभाव्यता प्रमाणित असते.
ही अतिसूक्ष्म स्फोटके शोधणे एक प्रकारचे आव्हानच आहे. त्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू असून, शास्त्रातील विविध तत्त्वांचा अवलंब करण्यात येत आहे. यात न्यूट्रॉन क्रिया प्रवण पृथक्करणाचा उपयोग करण्याचा प्रयत्न आहे. या तंत्रातून अतिसूक्ष्म अशा स्फोटकांचाही शोध घेता येऊ शकेल, अशी आशा शास्त्रज्ञांना वाटते. भविष्यात अशी हातावर नेण्यासारखी फिरती न्यूट्रॉन जनित्र निर्माण करून विमानतळ, मॉल्स, थिएटरसारख्या संवेदनशील ठिकाणी त्याचा वापर करणे सहज शक्य होईल. याशिवाय संवेदनशील अतिसूक्ष्म वायू संवेदकांचाही शोध सुरू आहे. त्यामुळेही अतिसूक्ष्म प्रमाणात असणारी स्फोटके सहज शोधली जातील. 

Cloud Computing (क्लाऊड कॉम्प्युटिंग)

Cloud Computing (क्लाऊड कॉम्प्युटिंग)


संगणकावरची माहिती (डाटा) जतन करण्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग हा चांगला पर्याय आहे. तो महागडा वाटत असला, तरी डाटा रिकव्हरीची शाश्‍वती व त्याच्या किमतीपेक्षा नक्कीच स्वस्त आहे. त्याचा वापरही सोयीस्कर व सहज करता येण्यासारखा आहे.

क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर कसा करावा?
• महत्त्वाची माहिती कोणती, हे प्रथम ठरवा.
• त्याची ं१्रं'>र्र९ी /ं१्रं'>(आकार) किती आहे, त्यानुसार ही माहिती जतन करण्यास किती जागा लागेल, ते ठरवा.
• काही Google, Microsoft सारख्या कंपन्या ही सेवा मोफत देतात. हा पर्याय आपल्याला योग्य असल्यास त्याचा वापर करावा.
• वेळोवेळी आपण केलेली माहिती जतन होत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. • महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या माहितीचे जतन होते. संगणक किंवा हार्डडिस्क खराब झाल्यास माहिती गेल्याने होणारे नुकसान किंवा डाटा रिकव्हरीचा खर्च वाचतो.
• या माहितीचा वापर आपण इंटरनेट असल्यास कुठूनही करू शकतो.
• अनेकांना ही माहिती वेगवेगळ्या ठिकाणांहून वारंवार वापरता येऊ शकते.
• अनेकांना माहितीचे संकलन एकाच ठिकाणी करायचे असल्यास हा पर्याय चांगला आहे.
• जास्त Size ची किंवा मोठी माहिती जर कोणाला पाठवायची असेल, तर ती ईमेलने पाठवणे शक्य नसते. अशा वेळीही हा पर्याय सोयीस्कर ठरतो.
• माहिती जतन करण्याच्या (Pen drive, Tape Drive, DVD, CD) उपकरणाचा खर्च वाचतो.
• जर जतन करायची माहिती (डाटा) खूप जास्त असेल, तर क्लाऊड कॉम्प्युटिंग खूप महाग पर्याय होऊ शकतो.
• क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या बाबतीत सुरक्षितता ही एक महत्त्वाची बाब आहे. सेवा देणारी कंपनी खात्रीशीर असेल, तरी हॅकर्स (ं१्रं'>ूं'ी१२/ं१्रं'>) चा डोळा अशा कंपनीवर नेहमी असतो.
ऊड कॉम्प्युटिंगची व्याख्या अगदी साध्या आणि सोप्या शब्दांत करायची झाल्यास ती पुढीलप्रमाणे करता येईल. ' इंटरनेटवर आपली माहिती जतन करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग.' दिवसेंदिवस क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर वाढत चालला आहे. ज्याप्रमाणे सध्या आपण ईमेल तंत्रज्ञानाचा वापर पत्र लिहिणे, फोटो किंवा काही माहिती पाठवण्यासाठी नियमित करायला लागलो आहोत. तसेच, भविष्यात क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापरही नियमित होणार आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग कशासाठी?
पूर्वी विशिष्ट वह्यांमध्ये लिखापढी करून माहितीचे जतन करत असत. उदा. हिशोबासाठी रोजमेळ वापरली जात. पत्ते-फोन नंबर खिशातील वहीत (डायरी) लिहून ठेवत असत. फोटोची प्रिंट काढून ठेवत असत. आता या सर्व पद्धतींना वगळून सर्वसामान्य लोकही अशा गोष्टींसाठी संगणकाचा वापर करू लागले आहेत. अशी महत्त्वाची माहिती खराब किंवा नष्ट होऊ नये म्हणून ती दुसरीकडे जतन करणे महत्त्वाचे आहे. हीच महत्त्वाची माहिती दुसरीकडे सहजरीत्या, खात्रीशीर जतन करण्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग हा खूप चांगला पर्याय आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंगचे फायदे व तोटे

अहीर मासा Fish

अहीर मासा Fish 

अहीर मासा पकडला, की त्याच्या त्वचेतून विशिष्ट स्राव निघतो. तो इतका बुळबुळीत असतो, की मासा हातातून कधी सटकतो, ते कळतही नाही. ही निसर्गाने त्यांच्या संरक्षणासाठी केलेली व्यवस्था आहे. र्वी अहीर हा मुळा-मुठा नदीत असल्याची नोंद आहे; परंतु मागच्या १0-१५ वर्षांत अहीर मासा नदीत मिळाल्याविषयी कधी ऐकले नव्हते. म्हणून थोडे जास्तीचे प्रश्न विचारायला लागलो. अहीर हा मासा सापासारखा लांब, जाडसर असतो. तोंड पुढच्या टोकाला, खालचा आणि वरचा ओठ थोडासा जाडसर, नाकाचा भाग अर्धवतरुळाकार, नाकपुड्याच्या दोन जोड्या. पुढील जोडी छोट्या नळीसारखी, तर मागील जोडी म्हणजे एक छोटेसे छिद्र. तोंडामध्ये त्रिकोणी आकाराचे दात एका ओळीत दिसतात. इतर माशांमध्ये जसे वेगवेगळे पर दिसतात, तसे याच्यात एकच पर पाठीपासून चालू होतो. तो शेपटीच्या परापर्यंत असा एकच होऊन जातो. शरीराच्या खालच्या बाजूला खांद्याजवळ छोटे पर असतात. डोक्याच्या खालील बाजूस आणि खांद्याच्या परांच्या पुढील बाजूला एक छोटीसी फट दिसते. श्‍वसनासाठी तोंडावाटे घेतलेले पाणी कल्ल्यावरून जात असताना पाण्यात विरघळलेला (ऑक्सिजन) प्राणवायू घेतला जातो व पाणी या फटीद्वारे बाहेर सोडले जाते.
अहीर माशाची त्वचा अत्यंत मुलायम असते. त्यांच्या अंगावर खवले दिसत नाहीत; परंतु सूक्ष्मदर्शकाखाली छोटे-छोटे खवले त्वचेमध्ये खोलवर असतात. त्वचेतून खूप चिकट स्राव स्रवत असतो. त्यामुळे त्याचे शरीर बुळबुळीत, चकचकीत असते. जिवंत माशाला पकडण्याचा प्रयत्न केल्यास सटकन हातातून सुटून जातो. माशाचा रंग काळपट, पिवळसर डाग शरीरभर असतात. पोटाकडील बाजू पांढरट असते. हा मासा पाण्याच्या बाहेरसुद्धा खूप वेळ जिवंत राहू शकतो. याच्या शरीरात हवेची पिशवी असते. पाण्याच्या बाहेर या पिशवीतील ऑक्सिजनचा वापर तो श्‍वसनासाठी करत असतो. पाण्याबाहेर काढल्यानंतर या माशाच्या त्वचेतून खूप स्राव स्रवत असतो.
आशिया खंडामध्ये हा मासा मोठय़ा प्रमाणात मत्स्यपालनासाठी वापरला जातो. पूर्ण वाढ झालेला मासा १८0 सें.मी. पर्यंत लांब होतो आणि वजनाला १५ ते २0 किलोपर्यंत भरतो. त्याचे आयुष्यमान १0 ते १५ वर्षांचे आहे. पावसाळ्यात त्याचा विणीचा हंगाम असतो. सध्या बर्‍याचशा नद्या, तळी, तलाव यांतून हा मासा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने तो संरक्षित करणे गरजेचे आहे.

बुरशी आणि वनस्पती

 बुरशी आणि वनस्पती


पृथ्वीतलावर अगदी प्रथम स्थापित झालेल्या वनस्पतींच्या मुळांची रचना मातीतील पोषकद्रव्ये शोषून घेण्याइतपत विकसित झाली नसावी. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बुरशीकरवी हे काम करवून घेण्यास वनस्पतींनी सुरुवात केली असावी. ही बुरशी वनस्पतींच्या मुळांबरोबरसुद्धा सहजीवन स्थापित करतात. त्यांना 'मायकोरायझा' असे म्हणतात. काही बुरशींच्या कवकजालाचे धागे वनस्पतींच्या मुळाच्या अंतर्भागात जाऊन पेशीमध्ये प्रवेश करतात, तर काही बुरशींचे बाह्यांगावरच आवरण तयार होते. बुरशीच्या कवकजालाचे धागे लांबपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे हे धागे वनस्पतीची मुळे पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणापर्यंत पोहोचून तेथील पोषकद्रव्ये जमिनीतून शोषून घेऊन त्याचा पुरवठा वनस्पतींच्या मुळांना करतात.
वनस्पतींना आवश्यक असणारी काही खनिजद्रव्ये मातीच्या कणांना घट्ट धरून बसल्याने सहज विरघळू शकत नाहीत व मुळांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशा वेळी बुरशी त्यांच्या मदतीला धावतात. बुरशीद्वारे स्रवल्या जाणार्‍या काही रसायनांमुळे ती विरघळवली जातात. असा खनिजद्रव्यांना सहज शोषून घेऊन त्यांना थेट मुळापर्यंत पोहोचविण्याचे काम बुरशी करते. बुरशीबरोबरच्या या सहजीवनामुळे उपयुक्त गोष्टींचा खजिनाच वनस्पतींना गवसला आहे. बुरशींमुळे वनस्पतींमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असलेल्या किंवा अतिशुष्क जमिनीमध्ये तग धरून राहण्याची क्षमता वाढते. आम्लवर्षा किंवा प्रदूषणयुक्त प्रतिकूल वातावरणावर या वनस्पती मात करू शकतात. शिवाय वेगवेगळ्या रोगाविरुद्धही त्यांची प्रतिकारप्रणाली विकसित होते. या सगळ्यांच्या बदल्यात बुरशींनाही आवश्यक असलेले अन्नघटक मिळतात. काही अभ्यासकांनी हे सहजीवन अस्तित्वास असलेल्या व नसलेल्या रोपांचे निरीक्षण केले असता हे सहजीवन प्रस्थापित झालेली रोपे इतर रोपांपेक्षा जास्त जोमाने वाढत असल्याचे दिसून आले. प्रयोगशाळेत मायकोरायझायुक्त रोपे वाढवून ती शेतकर्‍यांना पुरविण्याचे काम काही व्यावसायिक करतात. गहू, तांदूळ, सोयाबीन व इतर कडधान्ये यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पिकांना याचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे