Blogroll

Nano Explosive नॅनो स्फोटके

Nano Explosive  नॅनो स्फोटके  


अतिसूक्ष्म स्फोटकांचा वापर औद्योगिक, वैद्यकीय व कृषी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो, असा विश्‍वास शास्त्रज्ञांना आहे. पण, विघातक म्हणूनच त्याचा वापर होणे अटळ असून, शास्त्रज्ञांसाठीच नाही, तर एकूणच समाजासाठी तीच खरी चिंतेची बाब ठरत आहे. कविसावे शतक हे अतिसूक्ष्म तंत्रज्ञान व पदार्थांचे आहे. हे संशोधन विविध क्षेत्रांत आघाडी घेईल, यात शंका नाही. अतिसूक्ष्म म्हणजे नॅनो (१0-९ मी.) आकारात काही अणू गोळा करून, त्याचे गुणधर्म पडताळले जात आहेत. यात इतर पदार्थांव्यतिरिक्त स्फोटकांविषयीच्या संशोधनाचाही सहभाग आहे. काही पदार्थ अतिसूक्ष्म पातळीवर नेले असता स्फोटक हाच गुणधर्म प्रामुख्याने दर्शवितात. एक-दोन किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त करण्यासाठी कित्येक टन आर. डी. एक्स किंवा टी. एन. टी. या रासायनिक स्फोटकांची गरज भासते. जर का अतिसूक्ष्म स्फोटकांचा शोधघेतला, तर तेवढाच परिसर उद्ध्वस्त करण्यासाठी चिमूटभर अतिसूक्ष्म पदार्थ पुरेसा होईल. १९९0 पासूनच अतिसूक्ष्म आकारातील स्फोटकांच्या शोधाची सुरुवात झालेली आहे. कारण, पारंपरिक रासायनिक स्फोटकांपेक्षा यांची क्रियाशीलता प्रचंड प्रमाणात आहे.
याचा मुख्य हेतू अतिशय शक्तिशाली बाँब तयार करण्याचा आहे. यात प्रामुख्याने अँल्युमिनियम मॉलिब्डेनम, अँल्युमिनियम कॉपर, टिटॅनियम बोरॉन यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. अशा पदार्थांनी बनवलेली अतिसूक्ष्म स्फोटके बोटाच्या नखाखाली दडविणेही शक्य होईल किंवा शल्यचिकित्सा करून त्वचेखालील एखाद्या शिरेमध्येही ही स्फोटके नेणे शक्य होणार आहे. असे संशोधन दहशतवाद्यांच्या हातात पडले, तर समाजात अराजकता माजेल, यात शंका नाही. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात अशा प्रकारची स्फोटके वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणूनच अशा सूक्ष्म पदार्थांचा शोध घेण्यासाठीचे तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न होत आहेत. कुठल्याही स्फोटकात मुख्यत्वे ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश असतो. त्यानुसार ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन-नायट्रोजन, हायड्रोजन-नायट्रोजन यांच्या गुणोत्तरावर स्फोटकाची संभाव्यता प्रमाणित असते.
ही अतिसूक्ष्म स्फोटके शोधणे एक प्रकारचे आव्हानच आहे. त्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू असून, शास्त्रातील विविध तत्त्वांचा अवलंब करण्यात येत आहे. यात न्यूट्रॉन क्रिया प्रवण पृथक्करणाचा उपयोग करण्याचा प्रयत्न आहे. या तंत्रातून अतिसूक्ष्म अशा स्फोटकांचाही शोध घेता येऊ शकेल, अशी आशा शास्त्रज्ञांना वाटते. भविष्यात अशी हातावर नेण्यासारखी फिरती न्यूट्रॉन जनित्र निर्माण करून विमानतळ, मॉल्स, थिएटरसारख्या संवेदनशील ठिकाणी त्याचा वापर करणे सहज शक्य होईल. याशिवाय संवेदनशील अतिसूक्ष्म वायू संवेदकांचाही शोध सुरू आहे. त्यामुळेही अतिसूक्ष्म प्रमाणात असणारी स्फोटके सहज शोधली जातील. 

No comments:

Post a Comment