Blogroll

तीळ भारतात कधी, कसा आला

तीळ भारतात कधी, कसा आला

अरबस्तानात जन्मलेला तीळ भारतात कधी, कसा आला? थोडा धांडोळा घेतला, तेव्हा असा पुरावा मिळाला, की तीळ भारतातूनच बाहेर गेला. फार प्राचीन काळापासून तिळाचा वापर होत असल्याच्या नोंदी आहेत. थर्ववेदात तिळाचे अनेक उल्लेख सापडतात. उत्खननातील पुरावा सांगतो, की सिंधूच्या खोर्‍यात गहू, मोहरी आणि तिळाची लागवड होत असे. पणि नावाच्या जमातीतील मंडळी व्यापारासाठी टायग्रीस-युफ्राटिसच्या दुआबात गेली, तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर तीळ तिकडे नेला. सुमेरियन लोकांना तिळाचं आकर्षण होतं.
भारतातून तीळ आयात करणं अवघडच होतं. कारण, या प्रवासाला लागणारा वेळ फारच मोठा होता. मग त्या देशातच तिळाची लागवड सुरू झाली. पॅलेस्टाईन आणि लगतच्या प्रदेशांत ख्रिस्तपूर्व ३000च्या आसपास तीळ लागवडीखाली होता. सुमेरियन संस्कृतीच्या लिखाणावर तिळाचा उल्लेख आहे, तो ख्रिस्तपूर्व २३५0चा. पाकिस्तानातील तिळाच्या लागवडीचे संदर्भ याच सुमाराचे. तीळ किती मौल्यवान समजला जाई, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्जाच्या व्यवहारात चांदी आणि तीळ महत्त्वाची गहाणवट समजली जाई.
भारतात तर तिळाची लागवड होतीच. महाराष्ट्रासारख्या अगदी सामान्य दर्जाची उपजाऊ जमीन असलेल्या प्रदेशात इतिहासपूर्व काळातही तिळाची लागवड होतीच. तेव्हा तीळ भारतातूनच बाहेर गेला, असं म्हणता येईल. मात्र, भारतातील तिळाचा वापर धार्मिक प्रथांशी निगडित होता. 'मनुस्मृती'ने कांदा, लसूण बहुधा त्यांच्या उग्र गंधामुळे त्याज्य ठरवले होते. तीळ पवित्र समजला जाई. 'तेषां दत्त्वा तु हस्तेषु सपवित्रं तिलोदकम्,' असं मनूनं म्हटलं आहे. रामायणात अश्‍वमेध यज्ञासाठी लक्ष्मणाने १0,000 गाड्या तीळ आणल्याचा उल्लेख आहे. राज्यारोहणप्रसंगी राजतिलक राजाच्या भालप्रदेशावर लावण्यात येई. हा तिलक शब्दही तिळापासूनच आलेला. 'स्नेहेन तिळवत् सर्वं सर्गचक्रे निपीडयते,' असं महाभारत सांगते. तीळ आणि त्याचं तेल दोन्हीही विध्वंसक शक्ती आणि आत्मे यांना दूर पळवतात, अशीही समजूत. तीळ, दूध आणि तांदूळ यांच्यापासून केलेल्या खिरीचा उल्लेख रामायणात आहे. केशर आणि तीळ यांचा वापर धार्मिक कृत्यांमध्ये केला जाई.
तीळ प्रामुख्याने तेल बी आहे. 'तिलात् इति तैलम्,' अशी तेलाची व्याख्या आहे. म्हणजे तेल प्रथमत: तिळापासून काढलं गेलं. याचा मुख्य गुणधर्म म्हणजे थंड वातावरणातही हे तेल द्रवस्वरूपीच असतं, गोठत नाही. या तेलात असणारे दोन अँटिऑक्सिडंट घटक म्हणजे सिसॅमोलिन आणि सिसॅमिअम. या दोन घटकांमुळे हे तेल लवकर खवट होत नाही. मेथिओनाईन आणि ट्रिप्टोफॅन नावाची दोन अमिनो आम्लेही संरक्षक आहेत. यातील मेथिओनाईन अधिक महत्त्वाचं. कारण, त्यात सल्फर असतो. फिकट पिवळ्या, सोनेरी वर्णाच्या या तेलाला फारच खमंग स्वाद असतो.
आयुर्वेदीय उपचारांत तेल म्हणजे फक्त तिळाचंच. उष्ण गुणधर्मामुळे वातहारक आणि कफशामकही. म्हणून डोकं दुखत असल्यास कपाळावर तेलाचं र्मदन हा एक उत्तम, घरगुती उपाय. काळे तीळ चावून खाल्ल्यास दात बळकट होतात. या तेलाचा दिवा स्वच्छ प्रकाश देतो. त्याला काजळी कमी धरते. म्हणून तर म्हणत असावेत, 'तिळाचं तेल, कापसाची वात, दिवा जळो सारी रात.'

No comments:

Post a Comment