Blogroll

अहीर मासा Fish

अहीर मासा Fish 

अहीर मासा पकडला, की त्याच्या त्वचेतून विशिष्ट स्राव निघतो. तो इतका बुळबुळीत असतो, की मासा हातातून कधी सटकतो, ते कळतही नाही. ही निसर्गाने त्यांच्या संरक्षणासाठी केलेली व्यवस्था आहे. र्वी अहीर हा मुळा-मुठा नदीत असल्याची नोंद आहे; परंतु मागच्या १0-१५ वर्षांत अहीर मासा नदीत मिळाल्याविषयी कधी ऐकले नव्हते. म्हणून थोडे जास्तीचे प्रश्न विचारायला लागलो. अहीर हा मासा सापासारखा लांब, जाडसर असतो. तोंड पुढच्या टोकाला, खालचा आणि वरचा ओठ थोडासा जाडसर, नाकाचा भाग अर्धवतरुळाकार, नाकपुड्याच्या दोन जोड्या. पुढील जोडी छोट्या नळीसारखी, तर मागील जोडी म्हणजे एक छोटेसे छिद्र. तोंडामध्ये त्रिकोणी आकाराचे दात एका ओळीत दिसतात. इतर माशांमध्ये जसे वेगवेगळे पर दिसतात, तसे याच्यात एकच पर पाठीपासून चालू होतो. तो शेपटीच्या परापर्यंत असा एकच होऊन जातो. शरीराच्या खालच्या बाजूला खांद्याजवळ छोटे पर असतात. डोक्याच्या खालील बाजूस आणि खांद्याच्या परांच्या पुढील बाजूला एक छोटीसी फट दिसते. श्‍वसनासाठी तोंडावाटे घेतलेले पाणी कल्ल्यावरून जात असताना पाण्यात विरघळलेला (ऑक्सिजन) प्राणवायू घेतला जातो व पाणी या फटीद्वारे बाहेर सोडले जाते.
अहीर माशाची त्वचा अत्यंत मुलायम असते. त्यांच्या अंगावर खवले दिसत नाहीत; परंतु सूक्ष्मदर्शकाखाली छोटे-छोटे खवले त्वचेमध्ये खोलवर असतात. त्वचेतून खूप चिकट स्राव स्रवत असतो. त्यामुळे त्याचे शरीर बुळबुळीत, चकचकीत असते. जिवंत माशाला पकडण्याचा प्रयत्न केल्यास सटकन हातातून सुटून जातो. माशाचा रंग काळपट, पिवळसर डाग शरीरभर असतात. पोटाकडील बाजू पांढरट असते. हा मासा पाण्याच्या बाहेरसुद्धा खूप वेळ जिवंत राहू शकतो. याच्या शरीरात हवेची पिशवी असते. पाण्याच्या बाहेर या पिशवीतील ऑक्सिजनचा वापर तो श्‍वसनासाठी करत असतो. पाण्याबाहेर काढल्यानंतर या माशाच्या त्वचेतून खूप स्राव स्रवत असतो.
आशिया खंडामध्ये हा मासा मोठय़ा प्रमाणात मत्स्यपालनासाठी वापरला जातो. पूर्ण वाढ झालेला मासा १८0 सें.मी. पर्यंत लांब होतो आणि वजनाला १५ ते २0 किलोपर्यंत भरतो. त्याचे आयुष्यमान १0 ते १५ वर्षांचे आहे. पावसाळ्यात त्याचा विणीचा हंगाम असतो. सध्या बर्‍याचशा नद्या, तळी, तलाव यांतून हा मासा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने तो संरक्षित करणे गरजेचे आहे.

2 comments:

  1. Ha masa kuthe milel palnyasathi.. hyachi kudhe breeding keli jate ka..

    ReplyDelete