Blogroll

आंबट असूनही गोड चिंच - tamarind

आंबट असूनही गोड चिंच - tamarind


भुताखेतांचे निवासस्थान म्हणून चिंच भारतीय समाजात बदनाम आहे. मात्र, ही बदनामी विनाकारण आहे. कारण, अनेक भारतीय पदार्थ असे आहेत, की आंबट चिंचेमुळे त्यांची गोडी वाढते. चिंचेचे पाणी नसेल, तर भेळ कशाने ओली करणार? च म्हणजे एक डेरेदार सदाहरित वृक्ष. पान संयुक्त पिच्छाकृती. प्रथम श्रेणीच्या पर्णाक्षावर पर्णिकांच्या १0-१२ जोड्या. पर्णिकांची संख्या सम. रंग काळपट हिरवा. कोवळ्या पर्णिका पोपटी वर्णाच्या आणि चवीला चिंचेइतक्याच आंबट. फांद्यांच्या टोकाशी चिंचेचा मोहर येतो. बोटभर लांबीच्या दांड्यावर, लांब देठावर फुले येतात. फूल काहीसे श्रीखंडी वर्णाचे, नखभर आकारमानाचे. त्याच्या चार निदलांचा एक छोटासा पेला बनतो. काहीशा हिरवट पिवळ्या पेल्यातून तीन पाकळ्या निघतात. पिवळट पाकळ्यांवरच्या लालसर रेषांमुळे आणि लाल शिडकाव्यामुळे चिंचेची फुलं अतिशय देखणी. फुलात फक्त तीन कार्यक्षम पुंकेसर असतात. काहींमध्ये तीन वंध्य पुंकेसरही दृष्टोत्पत्तीस येतात. या पुंकेसरांच्या मध्यातून स्त्रीकेसर फुटतो.
पानाप्रमाणेच फुलंही आंबट चवीची. चिंच शेंगावर्गीय, पण या शेंगेचं वैशिष्ट्य म्हणजे पातळ असली, तरी लाकडासारखी काहीशी टणक साल. आतला गर मुख्यत: फिकट पिवळा आणि लालचुटुकही. गरात लपलेले चिंचोके काहीसे चौकोनी आणि चकचकीत-काळपट लाल वर्णाचे असतात.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आंबट चवीमुळे चिंच एकदम स्वयंपाकघरात शिरली असली, तरी चिंचेचं झाड एक बदनाम वृक्ष आहे. त्याला घराच्या आवारात प्रवेश नाहीच. कारण, या वृक्षावर अमानवी शक्तींचा वास असतो, अशी धारणा आहे. चिंचेच्या बदनामीसाठी ग्रामीण भागात एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी. एका नवविवाहितेचा पती व्यापारासाठी दूरदेशी निघाला. पत्नीनं त्याला सांगितलं, की जाताना रात्रीचा मुक्काम चिंचेखाली करायचा. मात्र, परत येताना कडुनिंबाखाली. नवर्‍यानं बायकोचा सल्ला मानला आणि परिणामी तो आजारी पडला. परतीच्या प्रवासात कडुनिंबाखाली झोपला. घरी येईपर्यंत ठणठणीत बरा! तात्पर्य- चिंचेवरील अमानवी वस्तीला पुरावा मिळाला!
चिंचेवरील भुतांच्या अशा असंख्य कथा ग्रामीण भागात आहेत. मात्र, मुलांना भीती दाखवण्यापलीकडे त्याला अर्थ नाही. चिंच हा दीर्घायुषी, सावली देणारा, चिंचेसह त्यातील चिंचोकेही उपयोगाकरता देणारा वृक्ष आहे, एवढे खरे.

No comments:

Post a Comment