Blogroll

बुरशीपासून औषधे

बुरशीपासून औषधे


बुरशी प्रकारांमध्ये प्रामुख्याने मश्रूम किंवा अळिंबी वर्गाचा समावेश होतो. जगभरात ढोबळमानाने ३,000पेक्षा जास्त अळंब्या खाण्यायोग्य मानल्या जातात. बटन, ऑयस्टर, शीताके या काही लोकप्रिय प्रजातींबरोबरच २0 इतर प्रजातींची लागवड मोठय़ा प्रमाणामध्ये करून जगभरातल्या बाजारात विकली जातात. जंगलातल्या खाण्यायोग्य जातीचे ज्ञान असलेल्या काही जमाती त्या गोळा करून विकतात. अळंब्यातील प्रथिने, कबरेदके या पोषकमूल्याचे प्रमाण प्रजातींनुसार बदलत असले, तरी नेहमीच्या पौष्टिक आहाराला जोड म्हणून जेवणामध्ये अळिंबीचा वापर ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. याशिवाय, सूर्यप्रकाशाची मदत घेऊन काही प्रजाती आपल्या शरीराला आवश्यक असणारे ड जीवनसत्त्व निर्माण करतात. महाराष्ट्रात सापडणार्‍या रीषी तसेच फन्सोम्बा या अळंब्यांचे  गरम पाण्यामध्ये केलेले सरबत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधी मानले जाते. या अळंब्यांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळतात. चिनी औषधोपचारांमध्ये रीषी या अळिंबीला फार प्राचीन काळापासून स्थान आहे. अमेरिकेत रीषी या अळिंबीपासून तयार केलेली विविध औषधेही बाजारात उपलब्ध आहेत.
याशिवाय, अस्पर्जिल्लस ओरायझीसारख्या काही बुरशांचा उपयोग जपान, चीन या देशांमध्ये खाद्यपदार्थांच्या निर्मितिप्रक्रियेमध्येही केला जातो. यीस्ट व इतर अनेक बुरशांमधील पेशीचा प्रथिनांचा स्रोत म्हणून वापर करण्याची पद्धत फार पूर्वीपासून रूढ आहे. दुसर्‍या महायुद्धात यीस्टपासून तयार केलेल्या प्रथिनांचा पुरवठा केला गेला. या प्रथिनाचा सर्वांत जास्त वापर आता प्राण्यांच्या खाद्यामध्ये केला जातो. ही प्रथिने शेती, कारखान्यातील टाकाऊ घटकांचा वापर करून आंबवण प्रक्रियेतून तयार होतात. यासाठी गव्हाचे काड, फळे-भाज्या यांचे टाकाऊ भाग इत्यादींचा उपयोग होतो. यातून प्रथिनांच्या निर्मितीबरोबरच विविध उद्योगांमध्ये तयार होणार्‍या टाकाऊ पदार्थांचे चांगले उपयोजन होऊ शकते. यामुळे यीस्ट व यीस्टसारख्या लवकर वाढणार्‍या, पण अपायकारक नसलेल्या बुरशांचा वापर प्रथिनांच्या निर्मितीमध्ये होऊ लागला. याशिवाय, बेकिंग व मद्यनिर्मितीमध्ये यीस्टचा वापर सर्रास केला जातो, हे सर्वज्ञात आहे. 


गांधील माशी

गांधील माशी


गांधील माशी म्हणजे फक्त डंख मारणारी माशी, असे नाही. तिचे अनेक प्रकार आहेत व प्रत्येक प्रकाराचे काही ना काही वैशिष्ट्य आहे.
रळाच्या अंड्यांवर जगणार्‍या, वाढणार्‍या अळ्यांच्या माशीला 'निशाण (ध्वज) माशी' (एनसिग्न) म्हणतात, कारण तिचे उभट-चपटे पोट एखाद्या निशाणासारखे नेहमी फडकत असते.
नर-मादींचे मिलन झाले, की ही माशी झुरळाच्या अंडीधारिणीचा शोध घेऊ लागते. कारण, तिला स्वत:चे अंडे त्यात घालायचे असते. हा शोध लागल्यावर त्यात स्वत:चे अंडे घालताना तिला खूप प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी १५ ते २0 मिनिटे सहज लागतात. झुरळाच्या अंडीधारिणीचे आणि तिच्यातील अंड्यांची कवचे छिद्र पाडण्यास अतिशय कठीण असतात.
त्यामुळे या कवचातील कमी जाडीची, पातळ असणारी जागा शोधून काढणे. अशी जागा शोधण्यासाठी निशाण माशी तिच्या क्षणोक्षणी थरथरत राहणार्‍या स्पश्रांची (अँटेनाची) मदत घेते. ही जागा माशीला सहज मिळत नाही. धारिणीच्या पृष्ठभागाची (एक-एक मिलिमीटर) चाचणी घेतल्याशिवाय ती जागा सापडत नाही व जागा सापडल्याशिवाय तिचे समाधान होत नाही. बराच वेळ तिचा हा प्रयत्न सुरू असतो.
जागा सापडल्यावर ती जरा वेळ थांबते आणि नंतर आपल्या अणकुचीदार अंडी निक्षेपकाच्या साह्याने धारिणीच्या कवचाला भोक पाडते व त्यातील सोयीच्या जागी झुरळाच्या अंड्यावर आपले अंडे घालते आणि भोक बाहेरून बंद करते. निशाण माशीच्या अंड्यातील अळी बाहेर पडल्यावर, रूपांतराच्या (एन्सटार) पाच अवस्थांनंतर कोषावस्थेत जाते आणि प्रौढ माशी होऊन बाहेर पडते. प्रत्येक अवस्था बदलत असताना अळीच्या दातांचे रूपही बदलत जाते. झुरळाच्या अंड्याचे कवच फोडणे हाही जोरकस कार्यक्रम असतो. झुरळाच्या एका अंडीधारिकेत साधारणपणे १६ अंडी असतात. त्यांचे कवच फोडण्यासाठी, अंड्यातील जीव खाण्यासाठी नव्या दातांची योजना निसर्गानेच केलेली असावी. झुरळांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणि संख्या समतोल असणे आवश्यकच असते. त्यामुळे निसर्गानेच ही व्यवस्था केली असावी, असे म्हणता येते. परजीवी, पण परोपजीवी अशी या माशीची ओळख त्यातूनच झाली आहे.

प्रथिने हिरव्या पानांमधली

प्रथिने हिरव्या पानांमधली


मानवी जीवनाला उपयुक्त अशा अनेक गोष्टी निसर्गात आहेत. त्याचा व्यवस्थित शोध घेतला गेला पाहिजे. त्यानंतर त्या आहार स्वरूपात आणण्यासाठी लागणारा खर्चही कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. योग्य शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी बालकांच्या आहारात काही विशिष्ट प्रथिनांची गरज असते. उच्च प्रथिनयुक्त पदार्थ समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या लोकांना परवडत नसल्यामुळे गरीब लोकांना स्वस्तात प्रथिने उपलब्ध करून देणे, ही आधुनिक काळाची गरज बनली.
हिरव्या पानांमध्ये त्यांच्या वजनाच्या ६ ते ८ टक्के प्रमाणात प्रथिने आढळतात. ही प्रथिने म्हणजे प्रकाशसंेषण आणि श्‍वसन या क्रियांना लागणारे वितंचकच असल्याने, ती पाण्यात विरघळणारी आणि पचण्यास हलकी असतात. शिवाय, शरीराला आवश्यक असणारी सर्व अमिनो आम्लेही त्यांच्यात आढळतात. त्यामुळे विकसनशील देशांमधील बालकांच्या आहारातली प्रथिनांची कमतरता हिरव्या पानांद्वारे कमी खर्चात दूर करता येईल, असा एक विचार सुमारे ५0 वर्षांपूर्वी पुढे आला आणि या विषयावर भारतात संशोधनही सुरू झाले. संशोधनाच्या सुरुवातीच्या काळातच हे लक्षात आले, की वनस्पतिभक्षकांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी पानांमध्ये निसर्गत:च फेनॉलिक गटातली काही सरळ सरळ विषारी, तर काही पोषणविरोधी संयुगे असतात आणि पानांमधून प्रथिने काढताना त्यांचा या पदार्थांशी संयोग होऊन ती प्रथिने मानवी आहारासाठी अयोग्य ठरतात.
याच संशोधनात पुढे असेही आढळले, की जनावरे खात असलेल्या हिरव्या चार्‍यात ही फेनॉलिक संयुगे कमी प्रमाणात आढळतात. विशेषत: लसूणघास (ल्यूसर्न) या चारापिकाच्या पानांमध्ये तर त्यांचे प्रमाण खूपच कमी असते. या पाल्यातून उच्च पाच्यता आणि उच्च पोषणमूल्य असणारी आणि मानवी आहारात वापरण्यायोग्य अशी प्रथिने वेगळी काढण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश मिळाले; परंतु ही प्रथिने अजूनही लोकांपर्यंत पोहोचू शकलेली नाहीत. कारण, लसूणघासचा बाजारभाव, प्रक्रियेचा खर्च आणि तयार मालाच्या वितरणाचा खर्च हे सर्व लक्षात घेता ही प्रथिने दुधाइतकीच महाग ठरतात. मात्र, त्यांना सरकारी अनुदान मिळाले, तर लोकांना परवडेल अशा किमतीत ती उपलब्ध होऊ शकतील. पानांमधील क्लोरोफिलमुळे ही प्रथिने हिरव्या रंगाची दिसतात. त्यामुळे अनुदानावर मिळणारी प्रथिने खुल्या बाजारात विकली जाण्याचा संभवही या प्रथिनांबाबत कमी राहील. खालावलेल्या आर्थिक स्तरातील कुटुंबांमधील मुलांना अशी प्रथिनेही देण्याची गरज असून, त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.