Blogroll

बुरशीपासून औषधे

बुरशीपासून औषधे


बुरशी प्रकारांमध्ये प्रामुख्याने मश्रूम किंवा अळिंबी वर्गाचा समावेश होतो. जगभरात ढोबळमानाने ३,000पेक्षा जास्त अळंब्या खाण्यायोग्य मानल्या जातात. बटन, ऑयस्टर, शीताके या काही लोकप्रिय प्रजातींबरोबरच २0 इतर प्रजातींची लागवड मोठय़ा प्रमाणामध्ये करून जगभरातल्या बाजारात विकली जातात. जंगलातल्या खाण्यायोग्य जातीचे ज्ञान असलेल्या काही जमाती त्या गोळा करून विकतात. अळंब्यातील प्रथिने, कबरेदके या पोषकमूल्याचे प्रमाण प्रजातींनुसार बदलत असले, तरी नेहमीच्या पौष्टिक आहाराला जोड म्हणून जेवणामध्ये अळिंबीचा वापर ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. याशिवाय, सूर्यप्रकाशाची मदत घेऊन काही प्रजाती आपल्या शरीराला आवश्यक असणारे ड जीवनसत्त्व निर्माण करतात. महाराष्ट्रात सापडणार्‍या रीषी तसेच फन्सोम्बा या अळंब्यांचे  गरम पाण्यामध्ये केलेले सरबत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधी मानले जाते. या अळंब्यांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळतात. चिनी औषधोपचारांमध्ये रीषी या अळिंबीला फार प्राचीन काळापासून स्थान आहे. अमेरिकेत रीषी या अळिंबीपासून तयार केलेली विविध औषधेही बाजारात उपलब्ध आहेत.
याशिवाय, अस्पर्जिल्लस ओरायझीसारख्या काही बुरशांचा उपयोग जपान, चीन या देशांमध्ये खाद्यपदार्थांच्या निर्मितिप्रक्रियेमध्येही केला जातो. यीस्ट व इतर अनेक बुरशांमधील पेशीचा प्रथिनांचा स्रोत म्हणून वापर करण्याची पद्धत फार पूर्वीपासून रूढ आहे. दुसर्‍या महायुद्धात यीस्टपासून तयार केलेल्या प्रथिनांचा पुरवठा केला गेला. या प्रथिनाचा सर्वांत जास्त वापर आता प्राण्यांच्या खाद्यामध्ये केला जातो. ही प्रथिने शेती, कारखान्यातील टाकाऊ घटकांचा वापर करून आंबवण प्रक्रियेतून तयार होतात. यासाठी गव्हाचे काड, फळे-भाज्या यांचे टाकाऊ भाग इत्यादींचा उपयोग होतो. यातून प्रथिनांच्या निर्मितीबरोबरच विविध उद्योगांमध्ये तयार होणार्‍या टाकाऊ पदार्थांचे चांगले उपयोजन होऊ शकते. यामुळे यीस्ट व यीस्टसारख्या लवकर वाढणार्‍या, पण अपायकारक नसलेल्या बुरशांचा वापर प्रथिनांच्या निर्मितीमध्ये होऊ लागला. याशिवाय, बेकिंग व मद्यनिर्मितीमध्ये यीस्टचा वापर सर्रास केला जातो, हे सर्वज्ञात आहे. 


No comments:

Post a Comment