Blogroll

कडुनिंब


कडुनिंब


कडुनिंब अस्सल भारतीय वृक्ष. वानसशास्त्रीय नाव अझाडिराक्टा इंडिका. अझाडिराक्टा या प्रजातीविषयक नामाचं मूळ पार्शियन भाषेतील. या वृक्षाचा एक भाईबंद पार्शियामध्ये राहतो, त्याचं नाव मेलिया आझाडाराक. मुस्लिम जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी कडुनिंबाला केलं अझाडिराक्टा. अझाडिराक्टाची फोड अशी, अझा-डाराक्टा- इ-इंड याचा अर्थ भारताचा मेलिया. 
कडुनिंब, कडूलिंब या नावातूनच त्याचा गुणधर्म प्रकट होतो, कडुचवीचा, 'निंबा'चा लिंब होण्याचं कारण त्याच्या पिकलेल्या फळांचा-निंबोळ्यांचा, लिंबासारखा पिवळा रंग. संस्कृत भाषेत कडुनिंबाला अनेक नावं, नव्हे सार्थ नावं आहेत. त्या संबंधीचा ोक असा. 
निम्ब स्यात् पिचुर्मदश्‍च तिक्तक ! 
अरिष्ठ : पारिभद्रश्‍च हिंगुनिर्यास : इत्यापि!
'निम्बति, सिच्चति स्वास्थ्यम'-म्हणजे स्वास्थ्य रक्षणारा ; पिचुर्मद-पिचुमंद यातील 'पिचु'चा अर्थ कुष्ठ, कुष्ठरोगाचं र्मदन, शमन करणारा. तिक्त अर्थात कडू चवीचा; संस्कृतात अर्थ पूर्ण विरुद्ध. तिक्त म्हणजे कडू आणि कटूरस म्हणजे तिखट, अरिष्ट अर्थात अशुभ टाळणारा, सर्व परिवाराचं भलं अर्थात भद्र करणारा तो परिभद्र; याचा खोडातून हिंगासारखा रस पाझरतो, म्हणून हा हिंगुनिर्यास. 
कडुनिंब हा अतिपरिचित वृक्ष आहे. मध्यम बांध्याचा, फांद्यांच्या टोकाशी एकवटलेली संयुक्त पानं; पर्णिका पेरभर लांबीच्या, तिरप्या दातेरी कडांच्या, तळाशी असमान; कडुनिंब खरं तर पानझडीवृत्तीचा, पण त्याची पर्णहीन अवस्था फारच क्षणिक; चैत्र प्रतिपदेच्या आसपास त्याला पालवी येते आणि मोहरही. नवी कोवळी पानं तांबूस रंगाची, फु लांचे तुरे आणि कोवळी पानं यांची गुढीच कडुनिंबानं उभारलेली असते. पावसाळ्याच्या तोंडाशी कडुनिंब फळतो. 
कडुनिंबाला निंबोळ्यांचं अमाप पीक येतं. 
'निंब निबोळ्या मोडुनी आला!
तरी तो काऊळियासिची सुकाळ झाला 
कावळ्यांना निंबोळ्या रुचकर कशा लागतात, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. कारण माऊलीनंच असं म्हटलं आहे, 'निंबोळीयेची पीक, वरी गोड आतुं विख.' असं असलं, तरी निंबोळ्या विषारी असतात, असा संदर्भ कुठेही नाही. कडूपणा असा नष्ट होणार्‍यातला नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, की साखरेचं आळं केलं, तरी निंब आपला कडुपणा सोडणार नाही. मात्र, असं म्हणतात, की शिर्डीला एक गोड कडुनिंब आहे. अर्थात त्याला हातही लावू देत नाहीत. 
कडुनिंब हा अमृतपुत्र आहे. अमृतकुंभ जरासा हिंदकळला आणि त्यातील दोन थेंब जमिनीवर पडले. त्यातून कडुनिंबाचे दोन वृक्ष उगवले. एकावर ब्रह्मदेव, तर दुसर्‍यावर श्री विष्णू आरूढ झाले. कडुनिंब शीतगुणधर्माचा, महिषासुर वधानंतर देवीनं याच वृक्षाच्या शीतल छायेत काही काळ विश्रांती घेतली. पुरीच्या मंदिरातील बलभद्र अर्थात बलराम, जगन्नाथ आणि सुभद्रेच्या प्रतिमा लाकडातूनच तयार करतात; म्हणून हा काष्ठदेव म्हणजे दारुदेव; हे लाकूड कडुनिंबाचं असतं. 
गुढीपाडव्याला कडुनिंबाची डहाळी बांधून जशी गुढी उभारायची, तशीच कडुनिंबयुक्त चटणीही खायची परंपरा आहे. पंचागात यातील घटक द्रव्यं दिलेली असतात. कडुनिंबाची कोवळी पानं, फुलं, मिरी, ओवा चिंच, हिंग, मीठ, साखर आणि चिंचेचा कोळ यापासून तयार होणारं चाटण कफ आणि पित्त या दोन्ही दोषांना ताळ्यावर आणतं आणि उन्हाळा सुखावह करतं. येणार्‍या वर्षप्रतिपदेला अशी चटणी करुन अवश्य खा

Ita Karina Reena इटा करिना

Ita Karina Reena इटा करिना

Ita Karina Reena इटा करिना


रिना तेजोमेघ साध्या डोळ्यांनाही दिसतो. सध्या हा तेजोमेघ मध्यरात्रीच्या सुमारास बरोबर दक्षिणेला दिसत आहे. त्याची क्षितिजावर उंची फक्त सुमारे ८ अंश असल्यामुळे त्याला सहज ओळखणे थोडे अवघड आहे. ज्या तार्‍याच्या नावाने तो ओळखला जातो, तो तारा आहे इटा करिना.
इटा करिना हा तारा आपल्यापासून सुमारे साडेसात ते आठ प्रकाशवर्षे दूर असल्याचा अंदाज आहे. शास्त्रज्ञांचे मत आहे, की हा कदाचित एकापेक्षा जास्त तार्‍यांचा समूह असावा; पण हा समूह या लाल तेजोमेघात दडलेला असल्यामुळे हे तारे आपल्याला दिसत नाहीत. इटा करिनाचे हे चित्र एका विशिष्ट प्रकारच्या उपकरणाचा वापर करून घेण्यात आले आहे. यात तेजोमेघाच्या वर्णपटलाचे चित्रण करून अशी चित्रे तयार करण्यात येतात.
यातील मुख्य तारा निळ्या रंगाचा आहे. अशा तार्‍यांच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे १0,000 अंश सेल्सिअस असते. वस्तुमान सूर्याच्या १२0 पट आहे. निरीक्षणातून असा अंदाज करण्यात येतो, की एके काळी याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १५0 पट होते. दुसरा तारा हा एक तप्त महाराक्षसी तारा आहे, ज्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सुमारे ३0 पट आहे.
गेल्या २00 वर्षांत इथे अनेक स्फोटक घटनांची नोंद झाली आहे. खगोलशास्त्रीय निरीक्षणे सांगतात, की १८४३ मध्ये हा आकाशातील सर्वांत प्रखर तारा होता. मग, याची तेजस्विता कमी होत गेली व १८६८मध्ये हा दिसेनासाच झाला. त्यानंतर गेल्या २५ वर्षांत हा परत प्रखर होत गेला. आता तो साध्या डोळ्यांनाही दिसतो. त्यातच १९९८-९९ मध्ये याची प्रखरता अचानक दुप्पट झाली होती. अशी दाट शक्यता आहे, की या तार्‍याचा अंत एक महास्फोटात होईल.

त्वचाभेदी माश्या

 त्वचाभेदी माश्या

 त्वचाभेदी माश्या

शेतकरी बांधवांच्या घरी किंवा शेतावर गाई, म्हशी, बैल, घोडे अशी पाळीव जनावरे असतात. जिवंत असताना ती राब राब राबतातच. या जनावरांना काही माश्या कायम छळत असतात. त्यांना शेपटीने हाकलून जनावरांना वैताग येतो. तरीही त्या हाकलल्या जात नाहीतच. अनेक माश्या एकाच वेळी घोंगावणारा आवाज करीत गुरांना घेरू लागतात. त्याच्या आवाजाने गुरांचे मन:स्वास्थ्य ढासळतं आणि नेहमीच्या वागण्यावर, दूध आणि मांसाच्या उत्पादनावर घसरता परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.
एवढेच नाही, तर हायपोडरमा (त्वचेखाली राहणार्‍या) नावाच्या माश्या जनावरांच्या कुजू लागलेल्या जखमांवर, पातळसर असलेल्या ओठांवर अथवा पुढील पायांच्या फर्‍यावर एकावेळी अनेक अंडी घालतात. जखमांवर घातलेल्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या कुजलेले मांस खाता-खाता मासांत घुसतात. जखमा नळ्यांसारख्या लांबसर पोखरतात. त्या पोकळीत चिकट असा अर्धा घन, अर्धा द्रव पदार्थ साठून राहतो. (बुचर्सजेली) त्याने मांसाचा दर्जा कमी होतो. जनावरे बेचैन होतात. गाई, म्हशी, दूध कमी प्रमाणात देऊ लागतात. त्यांचे वजन घटू लागते. एव्हाना शरीरात घुसलेल्या, स्थलांतर करीत राहिलेल्या अळ्यांची वाढ पूर्ण झालेली असते. त्या गुरांच्या शरीराबाहेर पडण्यासाठी कातडीचा कमी जाड भाग शोधून काढतात. तेथे पुन्हा कातडीला जखमा करून तेथील उतींचा फराळ करून शरीराबाहेर येतात. शरीर सोडून जमिनीमध्ये कोशावस्थेत जातात. कोशावस्था पूर्ण करून झाल्यावर मिलन आणि अंडी घालण्याचे जीविताचे लक्ष पूर्ण झाल्या-झाल्या चार-पाच दिवसांतच जगाचा निरोप घेतात.
त्यांनी केलेल्या जखमांकडे लक्ष दिले गेले नाही, तर जीवाणू संसर्ग होऊन 'मायासिस' आजाराला आमंत्रण दिले जाते. या आजाराने गुरे दुबळी होतात अतिशय अशक्त आणि चैतन्यहीन बनतात व अखेरीस प्राणालाच मुकतात.

बुरशी चे संशोधन सूक्ष्मजीवशास्त्र

बुरशी चे संशोधन सूक्ष्मजीवशास्त्र

बुरशी चे संशोधन सूक्ष्मजीवशास्त्र

अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचा एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लंडनमधील एका हॉस्पिटलमध्ये जीवाणूवर संशोधन करीत असे. एके दिवशी स्टेफायलोकोकस ओरिअस या जीवाणूची बशी (पेट्री प्लेट) स्वच्छ करण्याचे विसरून तो तसाच गावाला गेला. परत आल्यावर, एका हिरव्या-पिवळ्या रंगाच्या बुरशीमुळे या जीवाणूची वाढ खुंटल्याचे त्याला दिसून आले.
ही बुरशी म्हणजेच पेनिसिलिअम नोटटम. या बुरशीतून पेनिसिलिन हे प्रतिजैविक वेगळे करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. मानवाच्या इतिहासातली ही अत्यंत महत्त्वाची घटना ठरली. होवर्ड फ्लोरे आणि अन्स्र्ट चेन या संशोधकांनी या शोधाचे महत्त्व ओळखले. या प्रतिजैविकाचे प्रमाण वाढविण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले.
मानवी जीवनात पावलोपावली उपयोगी पडणार्‍या या संशोधनाबद्दल १९४५ मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्यासोबत होवर्ड फ्लोरे आणि अन्स्र्ट चेन यांना नोबेल परितोषकाने गौरविण्यात आले.
बदलत्या वातावरणामुळे प्रतिजैविकांना दाद न देणार्‍या जीवाणूंच्या हट्टी प्रजाती आता विकसित झाल्या असल्या तरी पेनिसिलिनचा वापर अनेक सुधारणा आणि इतर प्रतिजैविकांची जोड घेऊन आजही वैद्यकशास्त्रात केला जातोच. अलीकडच्या काळात, २00१ मध्ये सॅकारोमायसीस सेरेविसी (बेकिंग यीस्ट) या एकपेशीय बुरशीला नोबेलविजेत्या संशोधनामधे सहभागी होण्याचा मान मिळाला.
एका सजीवातून दुसरा सजीव निर्माण होण्याची साखळी पेशींमुळेच जिवंत राहते. एका पेशीचे विभाजन होऊन नवीन पेशी पायरी-पायरीने निर्माण होतात. अतिसूक्ष्म पातळीवर घडणारे, एका पेशीतून दुसरी पेशी जन्माला येण्याचे हे विकासचक्र सजीवांसाठी फार महत्त्वाचे; परंतु जटील असते.
सॅकारोमायसीस सेरेविसी या बुरशीच्या पेशीविभाजनातील टप्पे, त्यामध्ये सहभागी असणारी प्रथिने व त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणार्‍या लेलंड हार्टवेल, पौल नर्स आणि टीम हंट या शास्त्रज्ञांच्या शोधनिबंधास नोबेल पारितोषिक मिळाले. वनस्पती, प्राणी आणि बुरशा यांच्या पेशीचक्रामध्ये, जराशा बदलामुळे होणार्‍या गुंतागुंतीवर यामुळे उत्तरे मिळणे सोपे जाणार आहे. या संशोधनाचा उपयोग भविष्यात कर्करोगांच्या पेशींचा अभ्यास करताना अभ्यासकांना होणार आहे.

इंटेरनेट कैमरा

इंटेरनेट कैमरा 

सीसीटीव्ही तंत्रज्ञानातच आता आय.पी. कॅमेरा या नावाची नवी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. आय.पी. म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरा. यात इंटरनेटवर आय.पी. अँड्रेस टाकून हे कॅमेरे इंटरनेटवरूनच कुठूनही ऑपरेट करता येतात. या नव्या प्रणालीमुळे प्रत्येक वेळी मॉनिटरिंग रूममध्ये जाऊन बसण्याचा त्रास वाचला आहे. पोलीस किंवा प्रशासन पाहिजे त्या वेळी, पाहिजे त्या ठिकाणाचे निरीक्षण करू शकतात, यासाठी आर. जे.४५ या केबलचा वापर करतात.
सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या आकारातही लक्षणीय बदल झाले आहेत. अत्यंत छोटे, सहसा नजरेसही पडणार नाहीत असे कॅमेरे उपलब्ध आहेत. संशोधन करून त्यांच्या क्षमतेतही बदल केले जात आहेत. सध्याच्या काळात असंख्य प्रकारचे धोके आहेत. त्यातून वाचायचे असेल तर हे तंत्रज्ञान आवश्यक असेच आहे. पूर्वी फक्त श्रीमंत व्यक्ती किंवा कारखानदार वगैरेंकडूनच याचा वापर होत होता. आता मात्र सर्वसामान्य व्यापारी, दुकानदार हेही अशी यंत्रणा बसवून घेतात, त्याचा खर्चही आता सामान्यांच्या आवाक्यात येणारा आहे.