Blogroll

पारिजातक फुलराणीची कहाणी

पारिजातक  फुलराणी ची कहाणी 


पारिजातकाची फुले अत्यंत सुंदर असतात. त्याचे कारण हा वृक्ष देव-दानवांच्या समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या चौदा रत्नांपैकी एक. या वृक्षाच्या नावामागे एक शोकांतिका आहे. बहुधा सुंदर गोष्टींमागे काहीतरी दु:ख असतेच, या समजुतीतून ती निर्माण झाली असावीत. रिजातक एक स्वर्गीय वृक्ष. कारण, अगदी स्पष्ट आहे. देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी चौदा रत्नं बाहेर पडली त्यात सुरा आणि हलाहल मिळालं. तसंच लक्ष्मी कौत्सुभ आणि पारिजातकही. हा वृक्ष जन्मला त्या वेळी त्याला सुवर्णकांती होती. त्याच्या पानांना पोवळ्यांचा रंग होता. देवेंद्र या सौंदर्यावर भाळला नसता तरच नवल. देवेंद्राने या वृक्षाला नंदनवनात स्थान दिले.
पारिजातकाची इतरही नाव आहेत - मंदार, रागपुष्पी, नालकुंकूमक, हरिशृंगार आणि शेफालिका, रागपुष्पी आणि नालकुंकूमल या संज्ञा अर्थातच त्याच्या गुलाबी, लाल देठांच्या फुलांमुळे. सौंदर्यवतीला जसं 'बिंबाधरा' असं संबोधलं जातं. त्याप्रमाणे खालच्या ओठाला या फुलाच्या लाल देठाची उपमाही दिली जाते. शेफाली किंवा शेफालिकाचा उल्लेख ऋतुसंहाराच्या तिसर्‍या
सर्गात 'शेफालिका कुसुमगंध मनोहराणि' असा आहे. तो अगदी यथार्थ आहे. कारण, पारिजातकाच्या गंधाचा मोह कुणाला पडणार नाही? मात्र शेफाली किंवा शेफालिका हे नाव बंगालमध्येच अधिक परिचित आहे. पारिजातकाचे एक नाव खरपत्रही आहे. कारण उघड आहे, याची पानं पॉलिश पेपरसारखी खरखरीत असतात. पारिजातक मुख्यत: लागवडीखालीच आहे. फक्त सातपुड्याच्या काही भागात तो वन्यस्थितीत आढळतो, असं म्हणतात. अगदी खडकाळ, रूक्ष जमिनीत वाढणार्‍या, मध्यम उंचीच्या या वृक्षाच्या कोवळ्या फांद्या चौकोनी आणि लवयुक्त असतात. या फांद्यांवर साध्या पानांच्या जोड्या स्वस्तिकार पद्धतीनं मांडलेल्या, पर्णपाते अंडाकृती, दंतुर कडांचे व आधी सांगितल्याप्रमाणे खरखरीत असते.
पारिजातकाचा बहर पावसाळ्यात. रात्री उमलणार्‍या जाई-जुई या फुलांच्या कुळातच पारिजातकाची नोंद आहे. ही सर्वच फुलं पांढरी आणि सुवासिक. निशाचर कीटकांना आनंद यज्ञाचं आमंत्रण गंधाद्वारे मिळतं. अंधारात ही फुलं चांदण्यासारखी उठून दिसतात. पारिजातकाचं वानसशास्त्रीय नाव फारच अगडबंब आहे. निक्टँथस आरबोर ट्रिस्टिस. निक्टँथस म्हणजे चंद्रविकासी, खरं तर निशाविकासी. आरबोर म्हणजे वृक्ष, तर ट्रिस्टीस म्हणजे अश्रू गाळणारा. पारिजातकाची गळणारी फुलं म्हणजे त्याचे अश्रूच. अशी ही कविकल्पना.
फुलांचे गुच्छ फांद्यांच्या टोकाशी येतात. पाकळ्यांची नलिका लाल रंगाची, तर सुट्या भागाचा रंग पांढरा शुभ्र. नलिकेत दडलेले दोन नगण्य पुकेसर आणि लक्षात न येण्याजोगे स्त्रीकेसर. पारिजातकाची फळे पैसा म्हणूनच ओळखली जातात. याचं कारण त्याचे गोलाकार चपटं रूप. पारिजातकाचं फूल अतिशय नाजूक. अगदी थोडा वेळ हातात धरलं तरी कोमेजणारं, उन्हात तर ताबडतोब मलुल होणार. त्याचं कारणही तसंच आहे. 'पारिजाता' नावाची कुण्या एका देशाची राजकन्या होती. सुकुमार आणि नाजुका. ही फुलराणी सूर्यदेवावर भाळली. बालकवींच्या फुलराणीप्रमाणे तिचं सूर्यदेवाशी लग्न लागलं. राजपाट त्यागून ती सूर्यदेवाची सहचारिणी होऊन त्याच्या बरोबर गेली. पण, एकेदिवशी घात झाला. सूर्यदेवानं तिला सोडून दिलं. पारिजातानं दु:खानं जगाचा निरोप घेतला. तिचं दहन केलं त्या ठिकाणी राखेतून एक वृक्ष जन्माला आला. त्याची फुलं म्हणजेच पारिजाताची फुलं. पारिजाता राज कन्येसारखीच अतिशय नाजूक. पण, सूर्यानं केलेला विश्‍वासघात पारिजाता अजूनही विसरलेली नाही. ही फुलं सूर्य मावळल्यावर उमलतात आणि सूर्य उगवल्यावर गळून पडतात, उन्हानं कोमेजून जातात.

No comments:

Post a Comment