Blogroll

Haldi KumKum - हरिद्राकुंकुम्

Haldi KumKum - हरिद्राकुंकुम्


पूजेच्या विधीत 'हरिद्राकुंकुम् सर्मपयामि' असे म्हणत वाहण्यात येणारे हळद आणि कुंकू हे पूजा साहित्याचे महत्त्वाचे घटक आहेत व व्यापारी दृष्टीनेही महत्त्वाचे पदार्थ आहेत. रंगाने भिन्न असे हे दोन पदार्थ असले, तरी हळदीपासूनच रासायनिक प्रक्रियेने कुंकू बनते. हळदीला औषधी गुणधर्मांमुळे आरोग्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्व आहे. वप्रकाश या संस्कृत ग्रंथातील पुढील श्लोकात हळदीचे गुणधर्म दिले आहेत.

'हरिद्रा कटुकातिक्ता रुक्ष्णोष्णा कफपित्तनुत्।
वण्र्या त्वग्दोषमेहास्र शोथपाण्डुव्रणापहा ॥'

हळद ही कडवट, तिखट असून, कफघ्न व पित्तनाशक आहे. तिच्यामुळे त्वचेचा वर्ण सुधारतो व जखम बरी करण्याचेही सार्मथ्य तिच्यात आहे. हळदीवर बरेच आधुनिक संशोधन होत आहे व मधुमेह, कर्करोग, अल्झायमर अशा रोगांवरही ती गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. हळदीला भारतात तर चांगली मागणी आहेच; पण रंगासाठी तिची निर्यातही होते. हळदीची आंबेहळद ही जात रक्तविकार व त्वचाविकार यांवर औषधी आहे. हळद प्रयोगशाळेत दर्शक म्हणून उपयुक्त आहे. कारण, आम्लामुळे तिला लाल रंग येतो.
हळदीचे रोप साधारणपणे कमरेइतके उंच, कर्दळीसारखी लांबट पाने असणारे असते. पानांनाही हळदीचा छान वास येतो. या पानांमध्ये वाफवून पातोळे नावाचा गोड पदार्थ किंवा इडल्या मुद्दाम बनवितात. ओल्या हळदीचे लोणचे बनवितात. पण, केवळ मीठ, आले व लिंबू यांसह ओल्या हळदीचा कीस जेवताना खाल्ल्यास मुखाचे आरोग्य सुधारते व पचनही सुधारते. भारतातील स्वयंपाकघरातील एक अत्यावश्यक पदार्थ म्हणून हळदीचे स्थान आहे. हळदीमुळे पदार्थाला सुंदर रंग, चव व स्वाद प्राप्त होतातच; पण आहारात हळदीचे नित्य सेवन रोगप्रतिबंधकही आहे. हळदीची लागवड भारतात सर्वत्र होते. महाराष्ट्रात सांगली-मिरज परिसर हळदीचे उत्पादन व व्यापार यांसाठी प्रसिद्ध आहे. मध्यम काळी जमीन हळदीला मानवते. पावसाळ्यापूर्वी तिची लागवड केली जाते. म्हणूनच सप्टेंबरमध्ये हळदीची पाने बाजारात मिळतात व डिसेंबरच्या सुमारास ओली हळद मिळू लागते. पुढे दोन महिन्यांनी हळकुंडे तयार होतात. ती जमीन खणून बाहेर काढतात व स्वच्छ करून पाण्यात शिजवितात. शिजून मऊ झाली, की आठवडाभर उन्हात चांगली वाळवतात. मग रंग येण्यासाठी चोळून, घासून घेतात व कुटून, दळून पावडर करतात. हळदपूड बाजारातून घेताना भेसळीचा धोका असतो. पूर्वी हळकुंडांपासून घरीच पूड केली जात असे. त्यामुळे हा धोका नसे. हळकुंडे विरल सल्फ्यूरिक आम्लात किंवा लिंबाच्या रसात भिजवली, की त्यांना लाल रंग येतो. नंतर पापडखाराच्या पाण्यात शिजवली, की रंग पक्का होतो. अशी हळकुंडे वाळवून, कुटून, दळून कुंकू तयार होते. अजूनही काही गावांमध्ये घरगुती पद्धतीने असे कुंकू तयार करतात. असे कुंकू घातक नाही; पण स्वस्त कृत्रिम रंग कुंकू म्हणून वापरणे अपायकारक आहे.

No comments:

Post a Comment