Blogroll

वेदनामुक्तीची जादू : अँनेस्थेशिया Anesthesia

वेदनामुक्तीची जादू : अँनेस्थेशिया Anesthesia 

काही शतकांमध्ये शल्यक्रियाशास्त्राची प्रगती विलक्षण झपाट्याने झाली. त्याची काही प्रमुख कारणे आहेत. शस्त्रक्रियेत आणि शस्त्रक्रियेनंतर होणारा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी निर्जंतुकीकरणाचे विविध उपाय अमलात आणले जाऊ लागले. शरीरक्रियाशास्त्रासारख्या पायाभूत वैद्यकीय शास्त्रशाखांमधील प्रगतीमुळे शरीरातील विविध क्रियांमधील शास्त्रीय तत्त्वे, कारणमीमांसा, आपापसांतील ताळमेळ, होणारे बदल अशा विविध बाबींचे अधिकाधिक सूक्ष्म आकलन होऊ लागले. केवळ शरीररचना पहिल्यासारखी सामान्य करणे हे शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट नसून, शारीरिक क्रिया शक्य तितकी सामान्य आणि नैसर्गिक करणे, हे शस्त्रक्रियेचे मुख्य उद्दिष्ट असते. विविध तंत्रांचा आणि तंत्रज्ञानाचा विकास, विविध उपकरणांची मदत ही बाब या प्रगतीला साहाय्यभूत ठरली. पण, या सर्वांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे कारण ठरले बधिरीकरणशास्त्र वा अँनेस्थेशियालॉजीतील प्रगती. सर्जरीच्या सुरुवातीची एबीसीच मुळी 'ए फॉर अँनेस्थेशिया'ने होते म्हणा ना.
कोणतीही शस्त्रक्रिया म्हणजे काही विशिष्ट विकार बरा करण्यासाठी, विशिष्ट व्याधींवर उपचार करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने विशिष्ट तंत्राने केलेली जखम. ही जखम बाहेरून दिसणारी असेल अथवा न दिसणारीही असू शकेल. अेंडोस्कोपच्या मदतीने केल्या जाणार्‍या अनेक शस्त्रक्रियांमध्ये बाहेरून कोणतीच जखम नसते वा आत केलेल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत बाहेरील जखम नगण्य असते. पण, जखम लहान असो वा मोठी, बाहेरून दिसो वा न दिसो, जखम म्हटली की वेदना आलीच. शुद्धीवर असलेला आणि वेदनेची जाणीव न गमावलेला सामान्य माणूस शस्त्रक्रियेची वेदना कशी सहन करणार? म्हणूनच शस्त्रक्रियेदरम्यान वेदना जाणवू नयेत, यासाठी विविध पद्धती अँनेस्थेशियाच्या शास्त्रात विकसित होत गेल्या.
आधुनिक वैद्यकाच्या विकासापूर्वी रुग्णाच्या मस्तकावर प्रहार करून त्याला बेशुद्ध करणे, रुग्णाला विविध मादक द्रव्ये देणे, त्याला बांधून अथवा इतरांनी आवळून धरून निपचित पाडणे अशा उपायांचा उल्लेख होतो. आधुनिक वैद्यकाच्या विकासात वेदनेच्या मार्गाचे जसजसे अधिकाधिक आकलन होत गेले, तसतसा विविध औषधांचा बधिरीकरणासाठी उपयोग करण्यात येऊ लागला.
शस्त्रक्रिया ही त्वचेलगतच्या भागामध्ये असेल, तुलनेने त्यात कमी आकाराचा छेद घ्यावा लागणार असेल, कमी काळाची असेल, तर तेवढय़ाच भागातील मज्जातंतूच्या शाखा इंजेक्शनद्वारे औषध त्या भागात टोकून बधिर करण्यात येतात. काही वेळा तर अतिशीत पदार्थांच्या फवार्‍याने फक्त मज्जातंतूची टोके तात्पुरती बधिर करूनही शस्त्रक्रिया केली जाते. यापुढचा भाग म्हणजे काही ठळक मज्जातंतूचे शरीरातील स्थान लक्षात घेऊन अथवा मज्जारजूच्या पातळीप्रमाणे शरीरातील विशिष्ट पातळीवरील रचना लक्षात घेऊन, त्यानुसार तो भाग वा त्या पातळीपर्यंतचा शरीराचा भाग बधिर केला जातो.
यानंतरचा भाग अर्थातच रुग्णाला पूर्णपणे बेशुद्ध करणे, यासाठी विविध प्रकारची औषधे वापरली जातात. या प्रकारात अधिकाधिक सुरक्षा आणण्यासाठी सतत नव्या औषधांसाठी, नव्या तंत्रासाठी संशोधन चालूच असते.
र्मयादित काळासाठी वेदनेपासून मुक्ती देणारे अँनेस्थेशियाचे शास्त्र आधुनिक वैद्यकातील आणि शस्त्रक्रियाशास्त्रातील एक अत्यंत आवश्यक सुविधा आहे.

No comments:

Post a Comment