Blogroll

मुंग्यांचा शेजारधर्म वारुळे

मुंग्यांचा शेजारधर्म वारुळे


मुंग्यांचा शेजारधर्म हा मदत करण्याचा शेजारधर्म नाही, तर स्वार्थावर आधारलेला आहे. एकाच जातीच्या मुंग्यांची वारूळे शेजारीशेजारी नसतात, हेही त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ग्यांच्या वसाहतींनी (वारुळे) बराच मोठा प्रदेश व्यापल्यावर त्यांची वारुळे एकमेकांजवळ अगदी शेजारी शेजारी असतात. अशा दोन किंवा अधिक वसाहती जवळजवळ असल्यावरच त्यांच्यातील शेजारधर्माचे (!) स्वरूप प्रजाती वा जातीनुरूप भिन्न भिन्न असते.
साधारणपणे एकाच जातीच्या मुंग्यांच्या वसाहती शेजारी शेजारी स्थापित झाल्याचे आढळत नाही. शेजारी शेजारी स्थापित झालेल्या वसाहती वेगवेगळ्या जाती-प्रजातींच्या असतात. त्या वसाहतीतील एकमेकांत मिसळणे अपरिहार्य असते. त्याचे स्वरूप वेधक असते. मानवाच्या वृत्ती-प्रवृत्तींचे ते जणू प्रतिबिंब वाटते.
शेजारी शेजारी असणार्‍या दोन वसाहती आतून बोगद्यांनी जोडल्या जातात. त्यातील मुंग्या अगणित असल्या तरी एकमेकींच्या वसाहतीत जात नाहीत. 'आपण बर्‍या आपल्या वसाहती बर्‍या' अशा रीतीने त्यांचे व्यवहार चालू राहतात. असा शेजार, 'आत्मकेंद्री शेजार' आहे, असे म्हणावेसे वाटते.
काही जातींच्या वसाहतींच्या भिंती आश्‍चर्यजनकरीत्या सामाईक असतात. काही आघात होऊन या भिंती कोसळल्या, तर त्यातील दोन वेगळ्या जातींच्या मुंग्यांचा अपरिहार्यपणे एकमेकांशी संबंध येतो. मग त्या एकमेकींच्या बाजूच्या अंडी, अळ्या, कोश याची पळवापळव करतात आणि शहाजोगपणे 'तुम्ही कोण व आम्ही कोण' ही वृत्ती धारण केल्यासारख्या स्वतंत्रपणे राहतात. असा शेजार हा 'पेंढारी शेजार' होय.
सोलेनॉप्सिस प्रजातीतील फ्युगॅक्स जातीच्या मुंग्या आकाराने आणि सार्मथ्याने जेमतेम असतात. त्या आपल्या वसाहती कॉम्पोनोट्स प्रजातीतील आकाराने आणि शक्तीने जबरदस्त असलेल्या मुंग्यांच्या वसाहती शेजारी स्थापन करतात. वृत्तीने डामरट असणार्‍या या मुंग्या चपळतेने हालचाली करतात. कॉम्पोनोट्सच्या रक्षक मुंग्यांना गुंगारा देत, त्या कॉम्पोनोट्स मुंग्यांच्या वसाहतीत जातात. तेथील अंडी, अळ्यांचा शोध घेतात आणि त्यावर आपली पोटपूजा साजरी करतात. अशा शेजारधर्माला 'चौर्यकर्मी' म्हणणे शोभून दिसते.
क्रिमॅटोगॅस्टर लिमाटा पॅराबायोटिका जातीच्या मुंग्या आणि मोनॅसिक डॅबिलीस या मुंग्या एकाच वसाहतीत वस्तीला असतात. एकाच गंधमार्गाचा येता-जाता वापर करतात. परंतु, आपली स्वत:ची प्रजा मात्र दुसर्‍या जातीच्या संपर्कात अजिबात येऊ देत नाहीत. कॉम्पोनोट्स लॅटरॅलीस, क्रिमॅटोगॅस्टर स्कू टेलॅरिस या मुंग्यासुद्धा अशा शेजारधर्माचा अवलंब करतात.
एकंदरित पाहता, मुंग्या-मुंग्यांतील शेजारधर्म एकमेकांच्या वसाहतीत चोर्‍या करणे अथवा शेजारी असणार्‍या वसाहतीशी फटकून वागणे यात धन्यता मानतो. असा निष्कर्ष, निदान काही जातींच्या मुंग्यांबाबत काढावा लागतो. 

No comments:

Post a Comment