Blogroll

कीटकांचे स्वसंरक्षणतंत्र | Protection Technics of Insects

कीटकांचे स्वसंरक्षणतंत्र | Protection Technics of Insects 


संरक्षणासाठी कीटक सर्वसामान्य उपायांबरोबर इतर अनेक युक्त्या, प्रयुक्त्या योजतात. फुलपाखरे, पतंग यांना पंख असतात. उडण्यामध्ये ते अतिशय कुशल असतात. शत्रूची चाहूल लागताच त्यांच्यापैकी बहुतेक जण साहजिकपणे पंखांवर स्वार होऊन पळून जातात. नाकतोडे, टोळ, रातकिडे यांसारखे सडपातळ पाय असणारे कीटक पंख असले, तरी पहिल्या प्रथम, शत्रूच्या हल्ला करण्याच्या संभाव्य मार्गातून टुणकन उडी मारून बाजूला होतात आणि नंतर जरुर वाटली तर उडून जातात. झुरळासारखे कीटक, पंख असले, तरी उडत नाहीत. शत्रूच्या हल्ल्याची जाणीव होताच वेगाने पळून जातात. हे बहुधा प्रत्येकाने अनुभवले आहे.
काही भुंगेरे (उदा. पेंगूळ वत्सला, रूपाली) पंखहीन असतात. त्यांना उडताही येत नाही, की पळताही येत नाही. ते शत्रूची चाहूल लागली, की असतील तेथे दडतात. जराही हालचाल न करता मेल्यासारखे पडून राहतात. एलिओडेस नावाचा भुंगेरा डोके जमिनीत खुपसतो आणि राहिलेले शरीर जमिनीस ९0 अंश कोनात ताठ सरळ करून शत्रू आहे तोपर्यंत तसाच ताटकळत उभा राहतो. ही असली ध्यानं शत्रूच्या लक्षात येत नाहीत. शत्रूला शिकार सापडत नाही. काही नाकतोडे, काही फुलपाखरे, काही भुंगेरे यांचा रंग ते जेथे साधारणपणे वावरतात, तेथील रंगांशी मिळता-जुळता असतो. त्यामुळे ते चटकन लक्षात येत नाहीत आणि शत्रूच्या तावडीतून सुटतात. असे कीटक बहुधा पाली, सरडे, बेडूक, पक्षी यांचे खाद्य असते. विस्टॉन ब्युटेलारिया हा एका जातीचा पतंग इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम परिसराचा रहिवासी आहे. त्याच्या वंशजांचा रंग तेथील वातावरणास साजेल असा फिक्कट पांढरा होता. परंतु, तेथे जेव्हा औद्योगिक क्रांती झाली आणि गिरण्यांची धुराडी काळा धूर ओकू लागली, तेव्हा पांढर्‍या रंगाचे हे पतंग शिकारी पक्ष्यांच्या दृष्टीस सहज पडत असत. हे टाळून स्वत:चा जीव बचावण्यासाठी या पतंगांनी आपला रंग बदलला, काळसर केला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दुसर्‍या काही पतंगांनी आपल्या रंगातच नव्हे, तर रूपातही बदल केला. काही नाकतोड्यांसारखे दिसू लागले, तर काहींनी आपल्या पंखावरील रंगीबेरंगी खवल्यांना रजा दिली आणि मधमाशी किंवा गांधिलमाश्यांच्या पंखासारखे पारदश्री आणि पातळ बनविले. यात त्यांना उत्क्रांतीची साथ लाभली, यात शंका नाही. अशीच साथ आणखी एका पतंगाला लाभली. त्याचे रूप बदलले नाही; पण पंख मात्र दगड फुलासारखे दिसू लागले. दुर्गंध भुंगेरे कुलातील भुंगेर्‍यांच्या स्रावक ग्रंथींच्या स्रावाला दुर्गंध येतो. हा स्राव कातडीवर पडला, तर कातडीला फोड येतात. कातडी चुरचुरते. या कुलात बॉम्बफोड्या नावाचा भुंगेरा शत्रू जवळ आला, की बॉम्बच्या स्फोटासारखा आवाज करतो आणि दुर्गंधी स्राव एखाद्या पाण्याच्या जोरदार झोताप्रमाणे बाहेर सोडतो. शत्रूला शिकार सोडणे आणि पळून जाणे भाग पडते. मधमाश्या, गांधिलमाश्या आणि लाल मुंग्या स्वत:चे, आपल्या वसाहतीचे संरक्षण कसे करतात, हे नव्याने सांगायला नको.
कीटकांच्या स्वसंरक्षणाच्या या युक्त्या, प्रयुक्त्यांबाबत सांगावे तेवढे थोडेच आहे. 


No comments:

Post a Comment