पत्थरचाट मासा - Catfish
कॅटफीश प्रकारातलाच मासा आहे. त्याचे नाव त्याच्या वैशिष्ट्यावरून पडले आहे. पत्थरचाट हा मासा पुण्यातील नद्यांमध्ये सापडत होता, हा आता इतिहास झाला आहे. तेव्हा खडकवासला किंवा मुळशी ही धरणे अस्तित्वातही नव्हती आणि नद्याही आजच्यासारख्या पुणे शहराचे सांडपाणी वाहणारे नाले नव्हत्या, तर खूपच चांगल्या आणि मोठय़ा होत्या. त्यांची पात्रे विस्तृत होती. त्यामुळे या नद्यांमध्ये पूर्वी मासे आढळत असत. पाण्याचा कितीही मोठा प्रवाह असला, तरी हा मासा दगडांना, खडकांना घट्ट चिकटून राहतो; म्हणूनच त्याचे असे नाव पडले आहे.
याचा आकारही इतर माशांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या पुढील मोठय़ा दोन मिशा मुळांशी जाड्या आणि पुढे निमुळत्या होत गेल्यामुळे त्यांचा आकार माती खोदण्याच्या टिकावासारखा दिसतो. दुसर्या दोन मिशा नाकपुडीसमोरून शिंगासारख्या वर दिसतात. छातीकडील भाग हा जणू काही शिल्प कोरल्यासारखा विशिष्ट चौकोनी आकाराचा दिसतो आणि त्यावर छोटे-छोटे खूपसे टेंगूळ दिसतात. याच्याच साहाय्याने तो दगडाला किंवा खडकाला घट्ट चिकटून राहतो.
या माशांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तोंडाचा जबडा अत्यंत रुंद आणि मोठा, डोळे मात्र तुलनेने खूपच छोटे. छाती आणि पोटाजवळील पंख खालून पाहिले, तर एक सपाट पृष्ठभाग होईल, अशी रचना आहे. या माशाच्या पंखांची रचना ही खूप जाडसर वाटते आणि त्याच्या खालील भागात भरपूर मेद असावे, असे फुगीर दिसतात. शरीराच्या वरच्या भागातील दुसरा छोटासा पंखासारखा आकार हा पूर्णपणे मेदयुक्त असतो. १0 ते २५ सेंमी लांब वाढ होणारा हा मासा तांबूस ते काळसर रंगाचा असतो.
त्याची वीण वर्षातून एकदाच पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होत असते. मादी एका वेळी १५00 ते ७000 पर्यंत अंडी देते. माशांचे वजन, लांबी, वय आणि पर्यावरणातील पोषक बाबींवर याची पुनरुत्पादन क्षमता अवलंबून असते. तर मादीचे प्रमाण साधारणपणे एकास एक असे असते. या माशाविषयीची विशेष जीवशास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. शिवाय तो खूपच कमी प्रमाणात मिळतो. यावरून त्याचे अस्तित्व धोक्याच्या पातळीवर आहे, हे स्पष्टपणे जाणवते. अभ्यासासाठी म्हणून याचे सरंक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment