Blogroll

सप्तपर्णी वृक्ष

सप्तपर्णी  वृक्ष 

सप्तपर्णी  वृक्ष


सप्तपर्णी हा बंगालमधील वृक्ष आहे. त्याचे लाकूड अत्यंत हलके असते. त्यामुळेच तिथे शाळेत प्रथमच जाणार्‍या मुलांना लागणार्‍या पाट्या या लाकडापासून तयार करतात. वर्गांमधील फळेही याच लाकडापासून तयार होतात. त्यावरून या वृक्षाच्या इंग्रजी नावापुढे स्कॉलॅरिस असा शब्द आला. डॉ. हेमा साने 
प्पा बळवंत चौक ते कन्याशाळा' या रस्त्यावर चक्कर टाकली, तर दुतर्फा काही वृक्ष खडी ताजीम देत उभे असलेले दिसतात. कडुबदाम आणि सप्तपर्णी. कडुबदाम ओळखायचा त्याच्या फताड्या आणि गळून पडताना लालसर झालेल्या पानांमुळे. तसेच, बदामाच्या आकाराच्या आणि आकारमानात बदामापेक्षा किंचित मोठय़ा असलेल्या फळामुळे. हा बदाम अभारतीय, त्याच्या जोडीचा सप्तपर्णी मात्र खास भारतीय वृक्ष.
कन्याशाळेच्या दारातच असलेल्या सप्तपर्णीच्या शिरोभागी बाणाप्रमाणे फुटलेल्या दोन फांद्या अगदी अफलातून! लक्ष वेधून घेणार्‍या या फांद्यांवर या वृक्षाचं व्यवच्छेदक लक्षण स्पष्ट आहे. सप्तपर्णी म्हणजे प्रत्येक पेरावर सात पानांचं एक वलय. अनेकदा याच्या फांद्यांची मांडणीही वलयाकारच असते. अशावेळी सप्तपर्णीची एक अजस्त्र नैसर्गिक दीपमाळच तयार होते.
सप्तपर्णी ऊर्फ सातवीण पर्जन्यवनांचा सदाहरित वृत्तीचा रहिवासी. उंची एवढी, की खालच्या झाडीतून उभा राहिलेला हा वृक्ष जंगलावर नजर ठेवणारा, इतर वृक्षराजीचा संरक्षक पहारेकरीच. कारण, सर्व काही 'ऑल वेल' असेल, तर हा ३0 मीटरपर्यंत वाढणारा. पानं आणि फांद्यांच्या वलयांकित रचनेबरोबर सप्तपर्णीची आणखी एक खासियत म्हणजे फांद्यांवरची. विशेषत: फारशा जून न झालेल्या फांद्यांवरची पांढुरक्या श्‍वसन रंध्रांची रांगोळी. पर्णपातं साधं, आंब्याच्या पानासारखं दोन्ही टोकांना निमुळतं होणारं. पण, आकारमानात लहान. वरचा पृष्ठभाग मळकट हिरवा, तर खालचा पांढुरका. पोत जाडसर.
सप्तपर्णीला अगदी नगण्य आकारमानाच्या फुलांचे घोस येतात. नगण्य म्हणजे नखावर जवळजवळ दोन फुलं आरामात बसतील. पाच मळकट पांढर्‍या पाकळ्याच स्पष्टपणे दिसतात. फुलाचे इतर भाग केवळ जाणकारांनाच समजतात. पण, फुलांची संख्या अमाप. त्यांना वेखंडासारखा उग्र, झणझणीत गंध. डोकंदुखीवरचा उपाय. पण, अशी अनेक फुलं असंख्य झाडांवर बहरतात, तेव्हा हाच वास डोकेदुखीस कारणीभूत ठरतो. आयुर्वेदात एक वचन आहे -
योगादपि विषं तीक्ष्ण, उत्तमंमौषधम् भवेत । भैषजं काडपि दुयरुक्तं संभाव्यते विषम् । तेव्हा सप्तपर्णीचा गंधही असंच दुधारीशस्त्र आहे. अप्पा बळवंत चौकातून जाणार्‍या रस्त्यावरच्या रहिवाशांना अजून हा गंधानुभव नाही. कारण, हे वृक्ष अजून फुललेले नाहीत. या रस्त्याखेरीज इतरत्रही अनेक रस्त्यांवर सप्तपर्णीची लागवड आहे. तेव्हा काही वर्षांनी सार्वजनिक आणि सार्वत्रिक डोकेदुखी निश्‍चित.
सप्तपर्णी ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान फुलतो. फुलांची जागा नंतर फळे घेतात. प्रत्येक फुलापासून सुतळीच्या जाडीच्या आणि त्याच रंगाच्या २ लोंबत्या शेंगा तयार होतात. लांबी जवळजवळ २५ सेंमीपर्यंत. या फळात असंख्य बिया तयार होतात. बिया अंदाजे ३-४ मिलिमीटर लांब तपकिरी वर्णाच्या. बियांच्या टोकाला असलेले केसांचे पुंजके, बियाच्या लांबीपेक्षा लांबीला जास्त. त्यामुळे सप्तपर्णीच्या बियांची वार्‍यावरची वरात अगदी सहज.
सप्तपर्णीचं वानसशास्त्रीय नाव अल्स्टोनिया स्कॉलॅरिस. अल्स्टोनिया हे प्रजाती दर्शक नाम म्हणजे 'अल्स्टोन' या वानस शास्त्रज्ञाच्या गौरवासाठी. 'स्कॉलॅरिस' या विशेषणाला खास छटा आहे.
सप्तपर्णी हा वृक्ष वंगभूमीचा खास वृक्ष. तिथे पूर्वी शिक्षणाचा 'श्रीगणेशा' होत असे लाकडी पाटीवर. आपल्याकडे दगडी पाटी वापरत होते, तशी ही लाकडी पाटी. त्यावर धूळ पसरायची आणि टोकदार काडीने अक्षरे काढायला शिकवले जाई. म्हणून ही धूळपाटी आणि अक्षरे धुळाक्षरे. या पाटीसाठी सप्तपर्णीचे लाकूड वापरले जात असे.
शाळेतले फळेही सप्तपर्णीच्या लाकडाचे. कारण, हे लाकूड वजनाला अतीव हलके. लाकडाचा असा वापर स्कूल म्हणजे शाळेसाठी. म्हणून अल्स्टोनिया झाला स्कॉलॅरिस. अल्स्टोनिया स्कॉलॅरिसचे शिक्षणाशी असलेले हे नाते आजही टिकून आहे. गुरुदेव रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनच्या पदवीदान समारंभात प्रत्येक स्नातकाला सप्तपर्णीची शाखा दिली जातेच. पण, त्या पदवीपत्राच्या पार्श्‍वभूमीवर सप्तपर्णीच्या पानांसकटच्या फांदीची पार्श्‍वभूमी असते.

No comments:

Post a Comment