Blogroll

कापूर Camphor Tablets

कापूर Camphor Tablets

स्कृतमध्ये कर्पूर, मराठीत कापूर व इंग्लिशमध्ये कॅम्फर अशा उच्चारसाधम्र्य असणार्‍या नावांनी ओळखली जाणारी कापराची वडी घरोघरी धार्मिक पूजाअर्चांमध्ये आरतीसाठी उपयोगात आणली जाते. कापूर ज्वालाग्राही आहे; पण त्याचा एकदम भडका उडत नाही. तो जळताना थंड ज्योतीने जळतो व राखही मागे राहत नाही. कापराचा शुभ्र रंग व थंड ज्योत यांमुळेच संस्कृतमध्ये चंद्र किंवा चंद्राला समानार्थी शब्दही कापूर या अर्थाचे आहेत. शंकराचे वर्णन 'कपरूरगौर' या विशेषणाने केले जाते. कारण, कापूर दिसतो शुभ्र स्फटिकासारखा.
नैसर्गिक कापूर हे वनस्पतिजन्य सुगंधी द्रव्य आहे. पूर्वेकडील चीन, जपान व भारत या देशांमध्ये प्राचीन काळापासून वृक्षांपासून कापूर मिळवला जातो. दालचिनी, तमालपत्र सुगंधी द्रव्यांच्या कुळातील 'सिनॅमोमम कॅम्फोरा' या सदाहरित वृक्षापासून मुख्यत: कापूर मिळतो. झाडाची पाने चुरडल्यासही कापराचा वास येतो. ही झाडे जंगलात आपोआपही वाढतात व मुद्दाम लागवडही केली जाते. जुन्या झाडांच्या खोडाचे बारीक तुकडे करून, वाफेच्या मदतीने ऊध्र्वपातन करून कापूर व कापराचे तेल काढले जाते. घनरूप द्रव्यातील पाण्याचा व तेलाचा अंश यंत्राच्या साहाय्याने काढून टाकतात. हा कापूर आणखी शुद्ध करण्यासाठी उष्णतेने त्याची वाफ करून व ती वाफ थंड क रून जे चूर्ण उरते, त्याच्या वड्या पाडतात. असा नैसर्गिक कापूर अजूनही बनत असला, तरी आता रासायनिक पद्धतीनेही कापूर बनवला जातो. कापूर संप्लवनशील असतो म्हणजे घनरूपातून तो द्रवरूप अवस्थेत न जाता बाष्परूपात जातो. हवेत उघडा राहिला असता उडून जातो. त्याला विशिष्ट उग्र वास असतो व तिखटसर चव असते. त्यात औषधी गुणधर्मही आहेत. यातील मेंथॉलसदृश द्रव्य त्वचेवर बाहेरुन लावण्याच्या जंतुनाशक मलमांमध्ये तसेच स्नायूंच्या दुखण्यावरील मलमांमध्ये उपयोगात आणले जाते. कापराची वडी कपाटात ठेवल्यास कपडे, पुस्तके व इतर वस्तूंची वाळवी, मुंग्या अशा कीटकांपासून रक्षण होते. डासांचा प्रतिबंध करण्यासाठीच्या रसायनांमध्येही कापूर वापरतात. काही आयुर्वेदिक औषधांमध्ये कापराचा र्मयादित प्रमाणात उपयोग केला जात असला, तरी त्याची वडी पोटात गेल्यास अपायकारक आहे. त्यामुळे पूजेसाठी आणलेला कापूर लहान मुलांपासून दूरच ठेवणे इष्ट. तसेच, कापूर जळताना बराच धूर होतो. त्यामुळे बंदिस्त जागेत धुराचा त्रास होऊ शकतो व कार्बनचे थरही जमतात. म्हणून हल्ली काही देवालयांच्या गाभार्‍यात कापूर जाळणे बंद केले आहे व तो बाहेर उघड्यावर जाळला जातो, हे योग्यच आहे. 

2 comments: