स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त बुद्धिमान असतात?
युवक - माकडांपेक्षा मानवाच्या मेंदूचं वजन जास्त असल्यानं मानव माकडांपेक्षा जास्त बुद्धिमान आहे. पुरुषांच्या मेंदूचं वजन स्त्रियांच्या मेंदूपेक्षा साधारण शंभर ग्रॅम जास्त असतं. त्यामुळे साहजिकच पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात!
युवती - (हसून) मेंदूच्या वजनाप्रमाणे बुद्धिमत्ता ठरली, तर देवमासा माणसाच्या सहा पट बुद्धिमान ठरेल! प्रत्यक्षात मेंदू किती परिपक्व (मॅच्युअर) झाला आहे, यावर बुद्धिमत्ता ठरते. तुम्हा युवकांपेक्षा आम्हा युवतींचाच मेंदू अधिक परिपक्व असतो, असं विज्ञानानं दाखवून दिलं आहे. इंग्लंडमधल्या न्युकॅसल विद्यापीठातले मार्कस कैसर आणि त्यांच्या सहकार्यांनी 'चुंबकीय अनुनाद चित्रीकरण' (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) वापरून मेंदूंचा तुलनात्मक अभ्यास केला. त्याआधारे, समान वयाच्या युवकांपेक्षा युवतींचा मेंदू अधिक परिपक्व असतो, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. त्यांना असं आढळलं, की मेंदूची पुनर्रचना करण्याचं काम युवतींमध्ये युवकांच्या आधी सुरू होतं.
युवक - मेंदूची पुनर्रचना?
युवती - आपण शिकतो तेव्हा मेंदूतल्या चेतापेशींमध्ये अनुबंधनं (सिनॅप्स) निर्माण होतात. मेंदूतल्या चेतापेशी आणि अनुबंधनांची संख्या जसजशी वाढत जाते, तसतशी मेंदूत त्यांची पुनर्रचना केली जाते. हे काम युवतींच्या मेंदूमध्ये लवकर सुरू होतं, असं या शास्त्रज्ञांना आढळलं.
युवक - पण, या पुनर्रचनेची गरजच काय?
युवती - वाढत्या वयाबरोबर बदलणार्या आपल्या गरजांनुसार आपली कामं अधिक कार्यक्षमपणे होण्यासाठी ही पुनर्रचना केली जाते. या पुनर्रचनेत फारसा वापर न होणारी अनुबंधनं काढून टाकली जातात, तर महत्त्वाच्या कार्यांसाठी संबंधित चेतापेशींमध्ये अधिक कार्यक्षम अनुबंधनं निर्माण केली जातात. उदाहरणार्थ, आपल्याला दिसणार्या दृश्याची ऐकलेल्या ध्वनींशी सांगड घालण्याचं काम करणारी अनुबंधनं सातत्यानं लागतात. यासाठी दृश्य आणि ध्वनी संदेशांवर प्रक्रिया करणार्या चेतापेशींमध्ये वेगवान संदेशवहनासाठी विशेष अनुबंधन-मार्गाची निमिर्ती केली जाते. अशा सुधारणांमुळे आपला मेंदू त्याचं कामं अधिक झपाट्यानं आणि कार्यक्षमतेनं करू शकतो. युवतींच्या मेंदूत ही विकासप्रक्रिया लवकर सुरू होते. म्हणूनच मेंदूच्या वजनाच्या बढाया मारण्याऐवजी युवती अधिक परिपूर्ण विचारानं परिपक्वतेचं माहात्म्य पटवून देतात!
No comments:
Post a Comment