Blogroll

कस्तुरी मृग

कस्तुरी मृग

कस्तुरी मृग
कुठे मिळते ही कस्तुरी? ती मिळते कस्तुरी मृगाच्या नाभीजवळच्या गंध गं्रथीतून. हरीण कुळाशी नातं सांगणार्‍या पाच प्रजातींमधील कस्तुरी मृग हा आशिया खंडातल्या भारताच्या हिमालयीन पर्वतरांगांमध्ये, त्याचप्रमाणे दक्षिण चीन, रशिया, नेपाळ, कोरिया, म्यानमार या देशांत सापडतो. पॅलिआर्कट्रीक आणि पौर्वात्य भागात त्यांचं अस्तित्व आहे. पर्वतीय डोंगररांगांत साधारणत: १६00 मीटर उंचीपर्यंत त्यांचा वावर असतो. थंडीच्या मोसमात ते तीव्र उताराच्या सूचिपर्णी जंगलात जातात. डोंगर-कपार्‍या हे त्यांचं आवडतं आश्रयस्थान. उन्हाळ्यात नद्या, ओढे, झरे यांच्या जवळपास कुरणात किंवा शेतात ते बागडताना दिसतात. पाणथळ दलदलीचा भाग मात्र त्यांना अगदी वज्र्य असतो. स्तुरी' या सुगंधी द्रव्याने अवघ्या जगाला आकर्षित केलंय. आपल्या देवांना सुगंधी कस्तुरीचा टिळा कपाळाला लावून प्रसन्न करता येतं. फार प्राचीन काळापासून ही प्रथा प्रचलित आहे. कस्तुरी म्हणजे फक्त सुगंधी गुणधर्म असलेलंच मौलिक द्रव्य नाही, तर त्यात औषधी गुणधर्मही आहेत. आयुर्वेद आणि गंधशास्त्रविषयक प्राचीन वाड्मयात त्यांची वर्णनं आढळतात. त्याचप्रमाणे चीन व कोरियातल्या चारशेहून अधिक पारंपरिक औषधोपचारांत कस्तुरीचा वापर केला जातो. याला ५000 वर्षांची परंपरा आहे. पेशवेकाळात 'लाडाचे कारंजे' या गावच्या सावकाराने आपल्या वैभवाचं प्रदर्शन करण्यासाठी आपल्या वाड्याच्या मातीच्या गिलाव्याच्या भिंती कस्तुरीने सुगंधित करून टाकल्या. त्याने गिलाव्याच्या मातीतच कस्तुरी कालवली. पुढच्या विपरीत काळात लोकांनी त्याच्या पडक्या भिंतींची माती लुटून नेल्याची कथा प्रचलित आहे.
हरणासारख्या या प्राण्यांचं वर्णन हरणांशी जुळतं. पुढचे निमुळते आखूड पाय आणि मागचे लांब पुष्ट पाय त्यांना खडकाळ उतार-चढ करायला व पळायला उपयोगी पडतात. पाठ कमानदार असते. मागच्या पायावरची शरीराची उंची सर्वाधिक असते. लांब-लांब झेपा घेतच ते पळतात. नरांचं वजन माद्यांपेक्षा जास्त असतं. ते १५ ते १७ किलो भरतं. दोघांनाही शिंग नसतात.
कस्तुरी मृग ओळखण्याची ठळक खूण म्हणजे त्याच्या वरच्या जबड्यातून बाहेर डोकावणारे, दोन वळणदार आणि टोकदार सुळे. ते खाली विळ्याच्या पात्यासारखे उलटे वळलेले असतात. वयस्कर नराचे सुळे खालच्या जबड्याच्याही बाहेर खाली गेलेले दिसतात. त्यांचा उपयोग प्रतिस्पध्र्याशी लढायला होतो. पूर्ण वाढीच्या दातांची लांबी दहा सेंटिमीटरपर्यंत भरते.
नवीन जन्मलेल्या पाडसाच्या अंगावर मऊ, आखूड, गडद तपकिरी केस असतात. त्यावर पिवळे किंवा पांढरे ठिपके असतात. थंडीच्या प्रारंभी त्या केसांची जागा प्रौढ वयातले भरड, लांब, दाट केस घेतात. ठिपके पुसट होतात किंवा पूर्णपणे नाहीसे होतात. कान सशासारखे किंचित गोलाकार असतात. पायांचे खूर लांब, तळाला जास्त रुंद, पण थोडे टोकदार असतात. त्यामुळे ते मऊ भुसभुशीत मातीत किंवा बर्फात रुतत नाहीत.
गंध ग्रंथी हे नराचं वैशिष्ट्य. त्या तीन प्रकारच्या असतात. खुरांवर, शेपटीखाली व जननेंद्रिय आणि नाभीच्या मधल्या भागात त्या आढळतात. नाभीजवळच्या साधारण तीन सेंटिमीटर रुंद आकाराच्या ग्रंथीतून कस्तुरी स्रवते. त्यातून सुमारे २८ ग्रॅम कस्तुरी मिळते. ती मेणचट आणि गडद लाल रंगाची असते. कस्तुरीचा वास खूप लांबून ओळखता येतो. तीन हजार भाग द्रवात एक भाग कस्तुरी असली, तरीही त्याचा वास आपण ओळखू शकतो. मोहवून टाकणारा असा हा गंध आहे. कस्तुरी हे सोन्याच्या तिप्पट भावाने विकलं जाणारं मौलिक द्रव्य आहे. रशियात वर्षाला १७ ते २0 हजार प्राणी त्यासाठी बेकायदा मारले जातात. या प्राण्यांचं जतन करणं हे निसर्गाचं रक्षण आणि व्यापार या दोन्ही दृष्टींनी फार महत्त्वाचं आहे.

No comments:

Post a Comment