खग्रास चंद्रग्रहण
एप्रिल महिन्यात १५ एप्रिल रोजी खग्रास चंद्रग्रहण झाले. हे ग्रहण भारतातून दिसले नव्हते. ते दिसले होते उत्तर अमेरिकेतून. त्यांच्यासाठी ही एक पर्वर्णीच होती. कारण २0११ नंतरचे हे पहिले चंद्रग्रहण होते जे बघण्याची संधी मिळाली होती.चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. पृथ्वीच्या सावलीत चंद्र गेल्यामुळे काही काळ आपल्याला तो दिसत नाही किंवा फारच मंद दिसतो. चंद्रग्रहणाची मजा म्हणजे चंद्रग्रहण होत असेल तर पृथ्वीच्या ज्या भागातून चंद्र दिसत असेल, त्या सर्व भागातल्या लोकांना ते ग्रहण बघण्याची संधी असते. असेही अनेकदा होते, की संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जात नाही. पण जेव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा आपल्याला रंगांचा एक वेगळा आविष्कार दिसतो. खग्रास चंद्रग्रहण जेव्हा त्याच्या बरोबर मध्य कालावधीच्या जवळ असते, तेव्हा आपल्याला तो तांबडा तपकिरी रंगाचा दिसतो. होते काय, की जेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जातो, तेव्हा एकतर त्यातील विविध रंगांची प्रकाशकिरणे विखुरली जातात. तसेच प्रकाशाचे वक्रीभवन होते. निळा रंग सर्वांत जास्त विखुरला जातो, तर लाल सर्वांत कमी. त्यामुळेच आपल्याला उगवता सूर्य किंवा चंद्र हा लालसर दिसतो. तसेच लाल प्रकाशाचे वक्रीभवन होऊन तो पृथ्वीच्या वातावरणातूनसुद्धा बाहेर पडतो आणि खग्रास ग्रहणाच्या वेळी याच तांबूस-लाल प्रकाशातून चंद्र गेल्यामुळे तो आपल्याला लाल तपकिरी रंगाचा दिसतो.
No comments:
Post a Comment