फेंगडे मासे
सप्टेंबर महिन्यांमध्ये सगळी पृथ्वी हिरवा शालू पांघरून बसलेली असते. या कालावधीमध्ये निसर्गात भटकंती म्हणजे मन प्रसन्न आणि तृप्त तर होतेच; पण निसर्गात काय बघू न काय नको, अशी अवस्था होते. सगळं अद्भुत आणि रमणीय. एकदा असाच ताम्हिणी परिसरामध्ये फिरत असताना हिरव्यागार भातखाचरातून खळखळणार्या पाण्याचे धबधबे बघत होतो. धबधब्याचे पाणी ज्या उत्साहाने आणि जोमाने पडत असते, ते बघून आपल्यालासुद्धा खूप उत्साह वाटतो. अशाच भातखाचरातून जात असताना गमतीशीर बाब दिसली.
भातखाचराच्या ज्या कोपर्यातून पाण्याचा प्रवाह पुढे जात होता, त्या चिंचोळ्या प्रवाहामध्ये कॉटनची साडी सोडली होती. साहजिकच सर्व पाणी त्या साडीवरून पुढे जात होते. एका ठिकाणी साडीवर खूप मासे एकत्र काही तरी खाण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वाटले म्हणून जवळून निरीक्षण केले. ज्या ठिकाणी मासे एकत्र जमा होत होते, तेथे साडीच्या खाली एक मोठय़ा तोंडाचे मडके ठेवलेले होते आणि साडीला खालच्या बाजूने गव्हाचे पीठ लावलेले होते. साहजिकच, त्या वासाने सगळे मासे तेथे जमा होत होते व साडीला असलेल्या छिद्रातून खाली मडक्यात पडत होते. मासेमारीची ही पद्धत पावसाळ्यात बर्याच ठिकाणी वापरली जाते. उत्सुकता म्हणून पाहिले, तर हे सगळे मासे फेंगडे मासे होते. मुरे, फेंगडे असे एकत्र वावरताना दिसतात. हा मासा शास्त्रीयदृष्ट्या खूप अलीकडे अभ्यासला गेला आहे. हा मासा फक्त पश्चिम घाटातच सापडतो. या माशाचे प्रमाणसुद्धा कमी झाले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्या अधिवासावर होणारे आक्रमण. डोंगरकपारीतील छोटे-छोटे ओहोळ हा यांचा मुख्य अधिवास; परंतु बेसुमार जंगलतोडीमुळे पाण्याचे प्रवाह बदलतात, माती वाहून जाते. याचा परिणाम अन्यही अनेक माशांच्या अधिवासावर होत असतो.
जसजसे पाण्याचे प्रवाह सुकायला लागतात, तसा फेंगडा मासा नदी, तलाव यासारख्या मुख्य पाण्यामध्ये येऊन स्थिरावतो आणि पुनरुत्पादन कालावधीमध्ये पुन्हा तो प्रवाहाच्या उलट दिशेने टेकडी, डोंगर, दरी यांतील स्वच्छ पाण्याच्या प्रवाहामध्ये जातो. ज्या पाण्याला खूप वेग आहे, अशा ठिकाणी राहणे ते पसंत करतात. पाण्याच्या प्रवाहाशी सामावून घेण्यासाठी या माशाच्या तोंडाचा आकार विशिष्ट पद्धतीमध्ये विकसित झालेला असतो. तोंडाच्या साह्याने पाण्याच्या तळाशी हे मासे चिकटून राहतात. या माशाचा जीवशास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यातून आणखी काही गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. मात्र, त्यासाठी प्रथम त्यांची संख्या कशी वाढेल, याचा विचार करायला हवा. नदीनाल्यांचे प्रदूषण थांबविल्याशिवाय ते शक्य नाही.
No comments:
Post a Comment