Blogroll

बुरशीपासून औषधे

बुरशीपासून औषधे


बुरशी प्रकारांमध्ये प्रामुख्याने मश्रूम किंवा अळिंबी वर्गाचा समावेश होतो. जगभरात ढोबळमानाने ३,000पेक्षा जास्त अळंब्या खाण्यायोग्य मानल्या जातात. बटन, ऑयस्टर, शीताके या काही लोकप्रिय प्रजातींबरोबरच २0 इतर प्रजातींची लागवड मोठय़ा प्रमाणामध्ये करून जगभरातल्या बाजारात विकली जातात. जंगलातल्या खाण्यायोग्य जातीचे ज्ञान असलेल्या काही जमाती त्या गोळा करून विकतात. अळंब्यातील प्रथिने, कबरेदके या पोषकमूल्याचे प्रमाण प्रजातींनुसार बदलत असले, तरी नेहमीच्या पौष्टिक आहाराला जोड म्हणून जेवणामध्ये अळिंबीचा वापर ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. याशिवाय, सूर्यप्रकाशाची मदत घेऊन काही प्रजाती आपल्या शरीराला आवश्यक असणारे ड जीवनसत्त्व निर्माण करतात. महाराष्ट्रात सापडणार्‍या रीषी तसेच फन्सोम्बा या अळंब्यांचे  गरम पाण्यामध्ये केलेले सरबत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधी मानले जाते. या अळंब्यांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळतात. चिनी औषधोपचारांमध्ये रीषी या अळिंबीला फार प्राचीन काळापासून स्थान आहे. अमेरिकेत रीषी या अळिंबीपासून तयार केलेली विविध औषधेही बाजारात उपलब्ध आहेत.
याशिवाय, अस्पर्जिल्लस ओरायझीसारख्या काही बुरशांचा उपयोग जपान, चीन या देशांमध्ये खाद्यपदार्थांच्या निर्मितिप्रक्रियेमध्येही केला जातो. यीस्ट व इतर अनेक बुरशांमधील पेशीचा प्रथिनांचा स्रोत म्हणून वापर करण्याची पद्धत फार पूर्वीपासून रूढ आहे. दुसर्‍या महायुद्धात यीस्टपासून तयार केलेल्या प्रथिनांचा पुरवठा केला गेला. या प्रथिनाचा सर्वांत जास्त वापर आता प्राण्यांच्या खाद्यामध्ये केला जातो. ही प्रथिने शेती, कारखान्यातील टाकाऊ घटकांचा वापर करून आंबवण प्रक्रियेतून तयार होतात. यासाठी गव्हाचे काड, फळे-भाज्या यांचे टाकाऊ भाग इत्यादींचा उपयोग होतो. यातून प्रथिनांच्या निर्मितीबरोबरच विविध उद्योगांमध्ये तयार होणार्‍या टाकाऊ पदार्थांचे चांगले उपयोजन होऊ शकते. यामुळे यीस्ट व यीस्टसारख्या लवकर वाढणार्‍या, पण अपायकारक नसलेल्या बुरशांचा वापर प्रथिनांच्या निर्मितीमध्ये होऊ लागला. याशिवाय, बेकिंग व मद्यनिर्मितीमध्ये यीस्टचा वापर सर्रास केला जातो, हे सर्वज्ञात आहे. 


गांधील माशी

गांधील माशी


गांधील माशी म्हणजे फक्त डंख मारणारी माशी, असे नाही. तिचे अनेक प्रकार आहेत व प्रत्येक प्रकाराचे काही ना काही वैशिष्ट्य आहे.
रळाच्या अंड्यांवर जगणार्‍या, वाढणार्‍या अळ्यांच्या माशीला 'निशाण (ध्वज) माशी' (एनसिग्न) म्हणतात, कारण तिचे उभट-चपटे पोट एखाद्या निशाणासारखे नेहमी फडकत असते.
नर-मादींचे मिलन झाले, की ही माशी झुरळाच्या अंडीधारिणीचा शोध घेऊ लागते. कारण, तिला स्वत:चे अंडे त्यात घालायचे असते. हा शोध लागल्यावर त्यात स्वत:चे अंडे घालताना तिला खूप प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी १५ ते २0 मिनिटे सहज लागतात. झुरळाच्या अंडीधारिणीचे आणि तिच्यातील अंड्यांची कवचे छिद्र पाडण्यास अतिशय कठीण असतात.
त्यामुळे या कवचातील कमी जाडीची, पातळ असणारी जागा शोधून काढणे. अशी जागा शोधण्यासाठी निशाण माशी तिच्या क्षणोक्षणी थरथरत राहणार्‍या स्पश्रांची (अँटेनाची) मदत घेते. ही जागा माशीला सहज मिळत नाही. धारिणीच्या पृष्ठभागाची (एक-एक मिलिमीटर) चाचणी घेतल्याशिवाय ती जागा सापडत नाही व जागा सापडल्याशिवाय तिचे समाधान होत नाही. बराच वेळ तिचा हा प्रयत्न सुरू असतो.
जागा सापडल्यावर ती जरा वेळ थांबते आणि नंतर आपल्या अणकुचीदार अंडी निक्षेपकाच्या साह्याने धारिणीच्या कवचाला भोक पाडते व त्यातील सोयीच्या जागी झुरळाच्या अंड्यावर आपले अंडे घालते आणि भोक बाहेरून बंद करते. निशाण माशीच्या अंड्यातील अळी बाहेर पडल्यावर, रूपांतराच्या (एन्सटार) पाच अवस्थांनंतर कोषावस्थेत जाते आणि प्रौढ माशी होऊन बाहेर पडते. प्रत्येक अवस्था बदलत असताना अळीच्या दातांचे रूपही बदलत जाते. झुरळाच्या अंड्याचे कवच फोडणे हाही जोरकस कार्यक्रम असतो. झुरळाच्या एका अंडीधारिकेत साधारणपणे १६ अंडी असतात. त्यांचे कवच फोडण्यासाठी, अंड्यातील जीव खाण्यासाठी नव्या दातांची योजना निसर्गानेच केलेली असावी. झुरळांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणि संख्या समतोल असणे आवश्यकच असते. त्यामुळे निसर्गानेच ही व्यवस्था केली असावी, असे म्हणता येते. परजीवी, पण परोपजीवी अशी या माशीची ओळख त्यातूनच झाली आहे.

प्रथिने हिरव्या पानांमधली

प्रथिने हिरव्या पानांमधली


मानवी जीवनाला उपयुक्त अशा अनेक गोष्टी निसर्गात आहेत. त्याचा व्यवस्थित शोध घेतला गेला पाहिजे. त्यानंतर त्या आहार स्वरूपात आणण्यासाठी लागणारा खर्चही कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. योग्य शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी बालकांच्या आहारात काही विशिष्ट प्रथिनांची गरज असते. उच्च प्रथिनयुक्त पदार्थ समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या लोकांना परवडत नसल्यामुळे गरीब लोकांना स्वस्तात प्रथिने उपलब्ध करून देणे, ही आधुनिक काळाची गरज बनली.
हिरव्या पानांमध्ये त्यांच्या वजनाच्या ६ ते ८ टक्के प्रमाणात प्रथिने आढळतात. ही प्रथिने म्हणजे प्रकाशसंेषण आणि श्‍वसन या क्रियांना लागणारे वितंचकच असल्याने, ती पाण्यात विरघळणारी आणि पचण्यास हलकी असतात. शिवाय, शरीराला आवश्यक असणारी सर्व अमिनो आम्लेही त्यांच्यात आढळतात. त्यामुळे विकसनशील देशांमधील बालकांच्या आहारातली प्रथिनांची कमतरता हिरव्या पानांद्वारे कमी खर्चात दूर करता येईल, असा एक विचार सुमारे ५0 वर्षांपूर्वी पुढे आला आणि या विषयावर भारतात संशोधनही सुरू झाले. संशोधनाच्या सुरुवातीच्या काळातच हे लक्षात आले, की वनस्पतिभक्षकांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी पानांमध्ये निसर्गत:च फेनॉलिक गटातली काही सरळ सरळ विषारी, तर काही पोषणविरोधी संयुगे असतात आणि पानांमधून प्रथिने काढताना त्यांचा या पदार्थांशी संयोग होऊन ती प्रथिने मानवी आहारासाठी अयोग्य ठरतात.
याच संशोधनात पुढे असेही आढळले, की जनावरे खात असलेल्या हिरव्या चार्‍यात ही फेनॉलिक संयुगे कमी प्रमाणात आढळतात. विशेषत: लसूणघास (ल्यूसर्न) या चारापिकाच्या पानांमध्ये तर त्यांचे प्रमाण खूपच कमी असते. या पाल्यातून उच्च पाच्यता आणि उच्च पोषणमूल्य असणारी आणि मानवी आहारात वापरण्यायोग्य अशी प्रथिने वेगळी काढण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश मिळाले; परंतु ही प्रथिने अजूनही लोकांपर्यंत पोहोचू शकलेली नाहीत. कारण, लसूणघासचा बाजारभाव, प्रक्रियेचा खर्च आणि तयार मालाच्या वितरणाचा खर्च हे सर्व लक्षात घेता ही प्रथिने दुधाइतकीच महाग ठरतात. मात्र, त्यांना सरकारी अनुदान मिळाले, तर लोकांना परवडेल अशा किमतीत ती उपलब्ध होऊ शकतील. पानांमधील क्लोरोफिलमुळे ही प्रथिने हिरव्या रंगाची दिसतात. त्यामुळे अनुदानावर मिळणारी प्रथिने खुल्या बाजारात विकली जाण्याचा संभवही या प्रथिनांबाबत कमी राहील. खालावलेल्या आर्थिक स्तरातील कुटुंबांमधील मुलांना अशी प्रथिनेही देण्याची गरज असून, त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.

विरघळणार्‍या बॅटर्‍या Soluble Battery

 विरघळणार्‍या बॅटर्‍या Soluble Battery 


बॅटरीची उपयुक्तता आणि सुटसुटीतपणा यांमुळे कोट्यवधी बॅटरी रोज तयार होतात आणि वापरल्या जातात. मात्र, त्या धोकादायक, क्वचित प्रसंगी स्फोटक आणि घातकही असतात. बॅटरीची ही भीती आता यापुढे बाळगावी लागणार नाही. कारण, संपल्या की आपोआप विरघळून जाणार्‍या बॅटर्‍या भविष्यकाळात उपलब्ध होणार आहेत. प्रभाकर खोले जनिर्मिती करणार्‍या बॅटरी म्हणजेच सेलचा वापर आपण अनेक ठिकाणी करत असतो. अगदी मोबाईलपासून खेळण्यांपर्यंत आणि रिमोट कंट्रोलपासून ते थेट वैद्यकीय आरोग्यरक्षक उपकरणापर्यंत. या सेलमध्ये रासायनिक प्रक्रिया करण्यात येऊन वीजनिर्मिती होत असते. त्यासाठीच त्यात अँसिड व इतर घातक रासायनिक द्रव्ये असतात. वापरात नसलेल्या किंवा संपलेल्या बॅटरीचा प्रसंगी स्फोट होऊन इजा होण्याची भीती असते. म्हणूनच वापरून झालेले सेल वेळीच व काळजीपूर्वक नष्ट करावे लागतात आणि लहान मुलांच्या हातांत तर ते मुळीच लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागते.
त्यातच वैद्यकीय उपकरणांसाठी अशा बॅटरीचा वापर जर करायचा असेल किंवा शरीरामध्येच रोपण केल्या जाणार्‍या वैद्यकीय यंत्रासाठी असा सेलही त्यात बसवायचा असेल, तर किती तरी जास्त काळजी घ्यावी लागते. सुरक्षित वेष्टने, निचरा होण्याची निर्धोक व्यवस्था, वेळीच इशारा देणारी यंत्रणा या सर्वांचा वापर करूनही धोका व त्यामुळेच काळजीही शिल्लक राहतेच. विरघळून जाणारी निर्धोक बॅटरी
आता मात्र अशी काळजी घेण्याची गरज उरणार नाही. एका नव्या संशोधनामुळे बॅटरीचा शरीराला होऊ शकणार्‍या अपायाचा धोका जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात येऊ शकेल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे. काम झाल्यावर सुरक्षितपणे विरघळून जाऊ शकणार्‍या बॅटरीचे युग येऊ घातले आहे. कानॅगी मेलन विद्यापीठामधील एका संशोधकांच्या गटाने बायोडिग्रेडेबल अशी विरघळून जाणारी बॅटरी तयार तयार केली आहे. विद्यापीठातील या संशोधन गटाचे प्रमुख प्रा. ख्रिस्तोफर बेटिंजर यांनी नुकतीच अशा प्रकारच्या बॅटरीची यशस्वी चाचणी केली.
आम्लाऐवजी माशाची शाई
सध्या वापरल्या जाणार्‍या बॅटरीमध्ये प्रामुख्याने लिथियन व इतर विषारी विद्युतवाहक घटक असतात. त्यामुळे वीजनिर्मिती चांगली होत असली, तरी हे घटक शरीराला अपायकारक असतात. शरीरामध्ये वापरावयाच्या वैद्यकीय उपकरणांतील संवेदक यंत्रे, पेसमेकर अशांमध्ये या बॅटरींचा वापर धोकादायक ठरू शकतो. आता बेटिंजर यांच्या शास्त्रज्ञगटाने बॅटरीत रासायनिक द्रवांऐवजी 'कटलफिश' नावाच्या माशाच्या शरीरातून सोडल्या जाणार्‍या शाईचा वापर केला आहे. ते पूर्णपणे जोखीममुक्त असते. एवढेच नव्हे, तर कालांतराने कार्यभाग संपल्यावर ते आपोआप विरघळूनही जाते. त्याचा शरीराला कसलाही धोका शिल्लक राहत नाही. साधे सेलही त्यांचा कार्यभाग संपल्यानंतर यामुळे निर्धोक होतात. त्यांच्यापासून काळजी घेण्याचे कारणच उरत नाही.
वारंवार शस्त्रक्रिया नको
पूर्वी शरीरामध्ये रोपण केलेले वैद्यकीय संयंत्र चालविणार्‍या बॅटरीला सुरक्षेसाठी संरक्षक कवच तर घालावे लागेच; परंतु बॅटरीची कालर्मयादा संपल्यानंतर ती पुन्हा बाहेर काढण्यासाठी व नव्याने बसविण्यासाठी परत शस्त्रक्रियाही करावी लागे.
आता ही भीती आणि धोका संपूर्णपणे समाप्त होईल. नव्याने येऊ घातलेली बॅटरी पूर्णपणे कार्यक्षम तर असेलच, पूर्वीच्या बॅटरीपेक्षा तिची कालर्मयादा फार मोठी असेल. शिवाय, शरीरातील यंत्राला वीजपुरवठा करण्याचे काम संपल्यावर ती निर्धोकपणे विरघळून जाईल.

तीळ भारतात कधी, कसा आला

तीळ भारतात कधी, कसा आला

अरबस्तानात जन्मलेला तीळ भारतात कधी, कसा आला? थोडा धांडोळा घेतला, तेव्हा असा पुरावा मिळाला, की तीळ भारतातूनच बाहेर गेला. फार प्राचीन काळापासून तिळाचा वापर होत असल्याच्या नोंदी आहेत. थर्ववेदात तिळाचे अनेक उल्लेख सापडतात. उत्खननातील पुरावा सांगतो, की सिंधूच्या खोर्‍यात गहू, मोहरी आणि तिळाची लागवड होत असे. पणि नावाच्या जमातीतील मंडळी व्यापारासाठी टायग्रीस-युफ्राटिसच्या दुआबात गेली, तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर तीळ तिकडे नेला. सुमेरियन लोकांना तिळाचं आकर्षण होतं.
भारतातून तीळ आयात करणं अवघडच होतं. कारण, या प्रवासाला लागणारा वेळ फारच मोठा होता. मग त्या देशातच तिळाची लागवड सुरू झाली. पॅलेस्टाईन आणि लगतच्या प्रदेशांत ख्रिस्तपूर्व ३000च्या आसपास तीळ लागवडीखाली होता. सुमेरियन संस्कृतीच्या लिखाणावर तिळाचा उल्लेख आहे, तो ख्रिस्तपूर्व २३५0चा. पाकिस्तानातील तिळाच्या लागवडीचे संदर्भ याच सुमाराचे. तीळ किती मौल्यवान समजला जाई, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्जाच्या व्यवहारात चांदी आणि तीळ महत्त्वाची गहाणवट समजली जाई.
भारतात तर तिळाची लागवड होतीच. महाराष्ट्रासारख्या अगदी सामान्य दर्जाची उपजाऊ जमीन असलेल्या प्रदेशात इतिहासपूर्व काळातही तिळाची लागवड होतीच. तेव्हा तीळ भारतातूनच बाहेर गेला, असं म्हणता येईल. मात्र, भारतातील तिळाचा वापर धार्मिक प्रथांशी निगडित होता. 'मनुस्मृती'ने कांदा, लसूण बहुधा त्यांच्या उग्र गंधामुळे त्याज्य ठरवले होते. तीळ पवित्र समजला जाई. 'तेषां दत्त्वा तु हस्तेषु सपवित्रं तिलोदकम्,' असं मनूनं म्हटलं आहे. रामायणात अश्‍वमेध यज्ञासाठी लक्ष्मणाने १0,000 गाड्या तीळ आणल्याचा उल्लेख आहे. राज्यारोहणप्रसंगी राजतिलक राजाच्या भालप्रदेशावर लावण्यात येई. हा तिलक शब्दही तिळापासूनच आलेला. 'स्नेहेन तिळवत् सर्वं सर्गचक्रे निपीडयते,' असं महाभारत सांगते. तीळ आणि त्याचं तेल दोन्हीही विध्वंसक शक्ती आणि आत्मे यांना दूर पळवतात, अशीही समजूत. तीळ, दूध आणि तांदूळ यांच्यापासून केलेल्या खिरीचा उल्लेख रामायणात आहे. केशर आणि तीळ यांचा वापर धार्मिक कृत्यांमध्ये केला जाई.
तीळ प्रामुख्याने तेल बी आहे. 'तिलात् इति तैलम्,' अशी तेलाची व्याख्या आहे. म्हणजे तेल प्रथमत: तिळापासून काढलं गेलं. याचा मुख्य गुणधर्म म्हणजे थंड वातावरणातही हे तेल द्रवस्वरूपीच असतं, गोठत नाही. या तेलात असणारे दोन अँटिऑक्सिडंट घटक म्हणजे सिसॅमोलिन आणि सिसॅमिअम. या दोन घटकांमुळे हे तेल लवकर खवट होत नाही. मेथिओनाईन आणि ट्रिप्टोफॅन नावाची दोन अमिनो आम्लेही संरक्षक आहेत. यातील मेथिओनाईन अधिक महत्त्वाचं. कारण, त्यात सल्फर असतो. फिकट पिवळ्या, सोनेरी वर्णाच्या या तेलाला फारच खमंग स्वाद असतो.
आयुर्वेदीय उपचारांत तेल म्हणजे फक्त तिळाचंच. उष्ण गुणधर्मामुळे वातहारक आणि कफशामकही. म्हणून डोकं दुखत असल्यास कपाळावर तेलाचं र्मदन हा एक उत्तम, घरगुती उपाय. काळे तीळ चावून खाल्ल्यास दात बळकट होतात. या तेलाचा दिवा स्वच्छ प्रकाश देतो. त्याला काजळी कमी धरते. म्हणून तर म्हणत असावेत, 'तिळाचं तेल, कापसाची वात, दिवा जळो सारी रात.'

सर्पविष रहस्य हलाहल पचण्याचे - Snake Poison Digestion Process

रहस्य हलाहल पचण्याचे - Poison Digestion Process

सर्पविष रहस्य हलाहल पचण्याचे - Snake Poison Digestion Process

विष रक्तात मिसळले, तर मृत्यू अटळ आहे. मात्र, तेच विष तोंडावाटे शरीरात गेले, तर पचले जाते. विष म्हणजे प्रोटिन आहे, हे याचे कारण आहे. नमधील एका उत्खननात हवेत उडू शकेल, अशा प्रकारच्या एका विषारी डायनोसॉरचा जीवाश्म सापडला आहे. या डायनोसॉरच्या दातांमध्ये विषारी सर्पांना असतात, अशा प्रकारच्या पोकळ्या आणि त्याच्या कवटीत विषवाहक दातांच्या वरच्या बाजूला विषाची पिशवी बसू शकेल, अशी एक पोकळीही आढळली आहे.
सुदैवाने असले प्राणी सध्याच्या युगात उपलब्ध नाहीत. पण, सापांच्या काही जातींमध्ये मात्र अशा प्रकारचे दात आणि विषग्रंथी आढळतात. सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये सर्पांव्यतिरिक्त अमेरिका खंडात आढळणार्‍या 'हीला मॉन्स्टर' नामक एका सरड्यातही हे अवयव आढळतात. सर्पांमध्येच हा गुण का आढळावा, या प्रश्नाचे उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असे उत्तर आहे, की पाय नसल्याने सापांना जमिनीवरून सरपटत जावे लागते. जमिनीशी होणार्‍या घर्षणाने त्यांचा पळण्याचा वेग अन्य प्राण्यांच्या मानाने कमी असतो. त्यामुळे प्रबल शत्रूपासून पळ काढणे किंवा पळणार्‍या सावजाचा पाठलाग करणे, या दोन्ही क्रियांसाठी लागणारा वेग सापाकडे नसतो. त्यामुळे अन्य प्राण्यांजवळ नसलेले विषारी दात सापाजवळ असतात. म्हणून सापांना जीवनकलहात तगून राहणे शक्य झाले असावे.
जैवरासायनिकदृष्ट्या सर्पविष हे प्रोटिन गटात मोडते. आपल्या रक्तात बाहेरचे कोणतेही प्रथिन गेल्यास त्यापासून आपल्या शरीराला कमी-अधिक प्रमाणात अपायच होतो. एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याला कोणत्याही प्राणिजन्य किंवा वनस्पतिजन्य प्रोटिनच्या काही ग्रॅम मात्रेचे इंजेक्शन दिले, तर ते बर्‍याचदा जीवघेणेही ठरू शकते. पण, हेच प्रोटिन जर तोंडावाटे पोटात गेले, तर त्याचे काहीही दुष्परिणाम न होता ते पचून जाते. सर्पविषालाही हाच नियम लागू होतो. त्यामुळे एखाद्यास साप चावल्यास त्याच्यावर जे प्रथमोपचार तातडीने करावयाचे असतात, त्यांपैकी एक म्हणजे तोंडाने जखमेतील विष शोषून घेणे. अर्थातच, हा उपचार करणार्‍या व्यक्तीच्या ओठांना किंवा तोंडात जखमा असता कामा नयेत. याप्रकारे विष शोषताना ते प्रथमोपचार करणार्‍या व्यक्तीच्या पोटात पचून जाते, त्यामुळे तिला अपाय होत नाही.


आंबट असूनही गोड चिंच - tamarind

आंबट असूनही गोड चिंच - tamarind


भुताखेतांचे निवासस्थान म्हणून चिंच भारतीय समाजात बदनाम आहे. मात्र, ही बदनामी विनाकारण आहे. कारण, अनेक भारतीय पदार्थ असे आहेत, की आंबट चिंचेमुळे त्यांची गोडी वाढते. चिंचेचे पाणी नसेल, तर भेळ कशाने ओली करणार? च म्हणजे एक डेरेदार सदाहरित वृक्ष. पान संयुक्त पिच्छाकृती. प्रथम श्रेणीच्या पर्णाक्षावर पर्णिकांच्या १0-१२ जोड्या. पर्णिकांची संख्या सम. रंग काळपट हिरवा. कोवळ्या पर्णिका पोपटी वर्णाच्या आणि चवीला चिंचेइतक्याच आंबट. फांद्यांच्या टोकाशी चिंचेचा मोहर येतो. बोटभर लांबीच्या दांड्यावर, लांब देठावर फुले येतात. फूल काहीसे श्रीखंडी वर्णाचे, नखभर आकारमानाचे. त्याच्या चार निदलांचा एक छोटासा पेला बनतो. काहीशा हिरवट पिवळ्या पेल्यातून तीन पाकळ्या निघतात. पिवळट पाकळ्यांवरच्या लालसर रेषांमुळे आणि लाल शिडकाव्यामुळे चिंचेची फुलं अतिशय देखणी. फुलात फक्त तीन कार्यक्षम पुंकेसर असतात. काहींमध्ये तीन वंध्य पुंकेसरही दृष्टोत्पत्तीस येतात. या पुंकेसरांच्या मध्यातून स्त्रीकेसर फुटतो.
पानाप्रमाणेच फुलंही आंबट चवीची. चिंच शेंगावर्गीय, पण या शेंगेचं वैशिष्ट्य म्हणजे पातळ असली, तरी लाकडासारखी काहीशी टणक साल. आतला गर मुख्यत: फिकट पिवळा आणि लालचुटुकही. गरात लपलेले चिंचोके काहीसे चौकोनी आणि चकचकीत-काळपट लाल वर्णाचे असतात.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आंबट चवीमुळे चिंच एकदम स्वयंपाकघरात शिरली असली, तरी चिंचेचं झाड एक बदनाम वृक्ष आहे. त्याला घराच्या आवारात प्रवेश नाहीच. कारण, या वृक्षावर अमानवी शक्तींचा वास असतो, अशी धारणा आहे. चिंचेच्या बदनामीसाठी ग्रामीण भागात एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी. एका नवविवाहितेचा पती व्यापारासाठी दूरदेशी निघाला. पत्नीनं त्याला सांगितलं, की जाताना रात्रीचा मुक्काम चिंचेखाली करायचा. मात्र, परत येताना कडुनिंबाखाली. नवर्‍यानं बायकोचा सल्ला मानला आणि परिणामी तो आजारी पडला. परतीच्या प्रवासात कडुनिंबाखाली झोपला. घरी येईपर्यंत ठणठणीत बरा! तात्पर्य- चिंचेवरील अमानवी वस्तीला पुरावा मिळाला!
चिंचेवरील भुतांच्या अशा असंख्य कथा ग्रामीण भागात आहेत. मात्र, मुलांना भीती दाखवण्यापलीकडे त्याला अर्थ नाही. चिंच हा दीर्घायुषी, सावली देणारा, चिंचेसह त्यातील चिंचोकेही उपयोगाकरता देणारा वृक्ष आहे, एवढे खरे.