Blogroll

चतुर आणि चटक चांदणी

 चतुर आणि चटक चांदणी 



चतुरांचे संयुक्त डोळे डोक्याच्या वरील भागामध्ये एकमेकांच्या अगदी जवळ चिकटलेले दिसतात. चटक चांदणीचे डोळे एकमेकांपासून दूर असतात. चतुरांचे मागील पंख पुढल्या पंखापेक्षा बरेच रुंद असतात. चटक चांदण्यांचे दोन्ही पंख समान आकाराचे, निरुंद असून, ते देठासारख्या भागाने वक्षास जोडलेले. चतुरांचे पंख लाल, पिवळे आणि काळसर पट्टय़ांनी रंगलेले असतात. चतुर जमिनीवर अथवा झाडाच्या फांदीवर बसला, की त्याचे पंख वक्षाच्या डाव्या-उजव्या बाजूस जमिनीला समांतर पसरलेले असतात. चटक चांदणीचे अरुंद पंख फारसे रंगीत नसतात. चटक चांदणी झाडोर्‍याच्या फांदीवर विसावली, की पंख वक्षावर तिरकस कोनात किंवा पोटाच्या लांबसर बाजूंना समांतर राहतात. चटक चांदण्याच्या तुलनेत चतुर मोठे असल्याने ते डोळ्यांत चांगलेच भरतात. त्यांच्याकडे सहजपणे लक्ष जाते. हे दोन्ही कीटक 'भुईचर' असले, तरी त्यांना भुईवर चालता येत नाही. त्यांची अंडी आणि पिल्ले जलाशयामध्ये आढळतात.
जपानी लोकांमध्ये चतुरांना खूप महत्त्व दिले जाते. एके काळी जपानला चतुरांची बेटे म्हणून ओळखले जात होते. जपानी दागिन्यांमधील कलाकुसरीवर चतुरांची छाया दिसते. जपानी मुले लांबसर केसाच्या दोन्ही टोकांस लहान वजनाचे दगड बांधतात आणि तो केस उडणार्‍या चतुरांच्या थव्यामध्ये भिरकावतात. तो केस चतुरांच्या काटेरी पायांत अडकतो. साहजिकपणे स्वत:ला त्या जाळ्यातून सोडविण्याच्या प्रयत्नांत चतुराला जमिनीवर यावे लागते. जपानी मुलांचा हा खेळ आहे, की खाण्यासाठी चतुर पकडण्याचा तो सापळा आहे? तेच जाणोत. इंडोनेशिया, जपान इत्यादी देशांमध्ये चतुरांचा जेवणामध्ये वापर करतात, असे सांगितले जाते.

No comments:

Post a Comment