भन्नाट गाड्या New Cars Technology
एका अनोख्या वाहनाचीदेखील प्रायोगिक तत्त्वावर निर्मिती सुरू आहे. या
वाहनाला 'म्युझिक कार' असे म्हणतात. गाडीमधील स्टिरिओवर चालक ज्या प्रकारचे
संगीत वाजवेल, त्यानुसार या कारचा रंग बदलतो. तसेच, 'स्मार्ट की' च्या
मदतीने ही कार सुरू करता येते. आणि 'स्मार्ट फोन' च्या साहाय्याने तिच्यावर
पूर्ण नियंत्रण ठेवता येते.
याशिवायही आणखी बर्याच नवनवीन गोष्टी या
कारमध्ये असतील. कार उत्पादक क्षेत्रातील अनेक अभियंते यावर काम करत आहेत.
नव्या तंत्रज्ञानामुळे सध्याच अनेकविध प्रकारच्या गाड्या बाजारात येत
आहेत. त्यात आता या प्रकारच्या नव्या गाड्यांची भर पडणार आहे. एका जागतिक
कार उत्पादक कंपनीने चीनमधील नागरिकांकडून 'तुमच्या स्वप्नातली भविष्यातली
कार कशी असावी आणि दिसावी?' या विषयावर कल्पक सूचना मागवल्या. त्यातील
सर्वोत्कृष्ट कल्पनांवर सध्या एक कंपनी काम करत आहे. त्यातून काही नव्या व
चमत्कारिक गाड्या लवकरच बाजारात येण्याची चिन्हे आहेत. शेखर जोशी
चाकांविना हवेत पळणारी हॉवर कार
चाके नसलेली ही गाडी हवेत साधारण एक ते
दीड फूट उंचीवरून पळते. टायरच नसल्यामुळे रस्त्याशी होणारे घर्षण शून्य
होते. त्यामुळे या कारची इंधन कार्यक्षमता खूपच वाढते. ही कार इलेक्ट्रिक
मोटरवर चालत असल्यामुळे धुराचा त्रास होणार नाही. पर्यायाने पर्यावरणाची
सुरक्षितता राखली जाईल. या कारमध्ये बसवलेल्या संवेदनशील उपकरणांमुळे
गर्दीमध्ये धावणार्या इतर वाहनांची नोंददेखील ही गाडी घेऊ शकते. आकाराने
छोटी असल्याने या गाडीच्या पार्किंगला थोडीशी जागा पुरते.
अशा
गाड्यांसाठी विशिष्ट प्रकारचे रस्ते लागतात. रस्त्यांवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक
पट्टय़ा बसवाव्या लागतात. अन्यथा तांत्रिकदृष्ट्या ही कार पळू शकणार नाही.
हे रस्ते कसे असावेत, यावर स्टॅनफोर्ड विद्यापीठात संशोधन सुरू आहे.
इलेक्ट्रिक हाय वे टेक्नॉलॉजीचा वापर करण्यावर या संशोधनाचा भर आहे. मागील
वर्षी बिजींग मोटार शोमध्ये या गाडीचे सादरीकरण केले गेले.
कंपनीने या
गाडीला 'पीपल्स कार प्रोजेक्ट' असे नाव दिले आहे. लोकांच्या मनातील सध्या
अस्तित्वात असलेल्या कारपेक्षा या कारचा आकार वेगळा आहे. तांत्रिकदृष्ट्या
हे वाहन कारच्या व्याख्येत कुठेही कमी पडत नाही.
जगातील बर्याच प्रगत
देशांत विद्युतचुंबकत्वावर आधारित हॉवरट्रेन म्हणजे जमिनीपासून वर
उचललेल्या अवस्थेत हवेत अतिजलद वेगात धावणार्या रेल्वेगाड्यांचा अनेक
वर्षांपासून लोकांच्या वाहतुकीसाठी वापर होत आहे. चाकांविना पळणारी हॉवर
कार हे आज तरी स्वप्न वाटते आहे. तसेच या कारच्या निर्मितीत गुंतलेल्या
तंत्रज्ञांना ही कार प्रत्यक्षात आणताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत
आहे. यांमधूनच आणखी नव्या सुधारणा सुचतील. या कारमध्ये नजीकच्या भविष्यात
नवनवे बदल होत राहतील. अशा कारचा लोकांच्या वाहतुकीसाठी एक नवा पर्याय
म्हणून पाहिले जात आहे. या कारमध्ये दोन व्यक्ती बसू शकतात. ही गाडी
विद्युतचुंबकत्व आणि गुरुत्वाकर्षणबलविरोधी कार्याच्या शास्त्रीय
सिद्धांतावर आधारित आहे. विशेष प्रकारच्या पट्टय़ा बसवलेल्या रस्त्यांवरील
प्रचंड विद्युतचुंबकीय बलामुळे ही कार हवेत वर ढकलली जाते. कार पुढे अथवा
मागे जाण्यासाठी या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर बसविलेली असते. पूर्वनियोजित
मार्गावरच ही कार पळू शकते.
No comments:
Post a Comment