Blogroll

हेलिक्स तेजोमेघातील गाठी

 हेलिक्स तेजोमेघातील गाठी


तेजोमेघ व त्याच्या केंद्रस्थानी असलेला तारा यांच्या पृष्ठभागावरून वायू फेकला जात असतो. या वायूंची एकमेकांबरोबर टक्कर झाल्यानंतर त्यातून निर्माण होणार्‍या दाबामुळे तेजोमेघात गाठी तयार होतात. वकाशात परिक्रमा करणार्‍या हबल दुर्बिणीतून कुंभ तारकासमूहातील हेलिक्स तेजोमेघाची चित्रे घेण्यात आली तेव्हा त्या या तेजोमेघात धूमकेतूसारख्या गाठी दिसून आल्या, त्यांना 'कॉमेटरी नॉट्स' म्हटले गेले. अशा प्रकारच्या गाठी प्रथमच दिसल्या होत्या. प्लॅनेटरी तेजोमेघांसंदर्भात हा नवीन शोध होता.
या तेजोमेघात शास्त्रज्ञांनी हजारो गाठींची नोंद केली. या गाठींचा आकार आपल्या सूर्यमालेच्या दुप्पट आहे आणि त्यांचे शेपूट सूर्य आणि पृथ्वी यांच्या सरासरी अंतराच्या हजारपट लांब आहे. या गाठींचे वस्तुमान पृथ्वीइतके आहे. या गाठींची दिशा या तेजोमेघाच्या केंद्राच्या दिशेने आहे, जशा सायकलीच्या तारा असतात, पण तुटलेल्या.
नंतर अशा गाठी इतर प्लॅनेटरी तेजोमेघातही दिसून आल्या. या गाठींचे कोडे पूर्णपणे सुटलेलं नसलं तरी काही शास्त्रज्ञांचे मत आहे की, या तेजोमेघांच्या केंद्रस्थानी असलेल्या तार्‍यातून मोठय़ा प्रमाणात वायू बाहेर फेकला जातो. जेव्हा या वायूची टक्कर तेजोमेघातील वायूशी होते तेव्हा तार्‍यातील वायूच्या दाबामुळे तिथे अशा प्रकारच्या गाठी तयार होत असाव्यात.
असा वायू सूर्यातूनही फेकला जातो. हा वायू प्रकाशासारखा सतत फेकला जात नसतो तर तार्‍याच्या पृष्ठभागावर होणार्‍या बदलातून तो बाहेर फेकला जातो. या वायूची घनता खूपच कमी असते; पण त्याला वेग असतो, त्यामुळे त्यांची ऊर्जाही खूप जास्त असते.
या गाठींचा शोध अचानक लागला होता. २00२ मध्ये सिंहतारका समूहातील उल्कावर्षावावेळी हबल दुर्बिणीला उल्कावर्षावाच्या उगमस्थानाच्या बरोबर विरुद्ध दिशेला वळविण्यात आले होते. हा तेजोमेघ त्याच दिशेला होता. तेव्हा याची काही चित्रे घेऊन त्यांना जोडल्यावर त्यांचे हे स्वरूप पहिल्यांदा लक्षात आले होते.

No comments:

Post a Comment