Blogroll

साहचर्य गुणधर्म .. एकमेका साहाय्य करू..

 साहचर्य गुणधर्म .. एकमेका साहाय्य करू..


मानव वगळता बहुतेक प्राणिमात्रांचा साहचर्य हा नैसर्गिक गुणधर्म असल्याचे दिसते. काही जातींचे भुंगे हे बुरशीबरोबर सहजीवन जगत असतात. ते बुरशीला वाढवतात व बुरशीही त्यांच्या कायम उपयोगी पडत असते. गेंरे हा कीटकांचाच प्रकार आहे. त्यांचेही बुरशीबरोबर चांगले सहकार्य असते. किंबहुना काही जातीचे भुंगेरे तर बुरशीशिवाय दिसतच नाहीत. या भुंग्यांनी केलेल्या झाडाच्या खोडात बुरशीची शेतीच केलेली असते.
वाळवी आणि मुंग्यांप्रमाणे काही भुंगेरे किंवा बीटल्ससुद्धा बुरशींबरोबर सहजीवन जगतात. अम्ब्रोशिया नावाचे भुंगेरे त्याला उपयुक्त अशा मृत झाडाच्या खोडामध्येच बोगदा तयार करतात आणि त्यामध्ये बुरशीची शेती करतात. बोगदा तयार झाला, की त्यामधे बुरशीच्या बीजाणूंचे रोपण केले जाते. बुरशी काही विकरे स्रवून झाडांच्या पेशीमधील अन्नघटकांचे विघटन करतात आणि या तयार खाद्याचा आयताच नजराणा अम्ब्रोशिया भुंगेर्‍यांना मिळतो. बुरशींना भुंगेर्‍यांच्या नत्रयुक्त विष्ठेमधून पोषकद्रव्ये मिळतात.
बुरशीच्या वाढलेल्या कवकजालाच्या धाग्यांवर भुंगेर्‍यांची मादी अंडी घालते. या अंड्यांमधून बाहेर पडलेल्या भुंगेर्‍यांच्या अळीसदृश बाळाचे खाऊ-पिऊ घालून संगोपन व संरक्षण बुरशी करते. यामुळे निसर्गामध्ये अम्ब्रोशिया भुंगेरे आणि बुरशी एकमेकांशिवाय आढळूच शकत नाहीत. अशाच प्रकारचे सहजीवन गांधिलमाशींच्या काही प्रजाती आणि बुरशींमध्ये आढळते. बुरशीच्या अम्ब्रोशियाला या प्रजातीबरोबरच अनेक बुरशी या भुंगेर्‍यांबरोबर सहजीवन स्थापित करतात.
प्राचीन काळामध्ये जगात प्रचलित असलेली 'वस्तुविनिमय पद्धती' बुरशी आणि कीटकांच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये दिसून येते. आपल्याकडे उपलब्ध असेल, ते दुसर्‍यास द्यावे व दुसर्‍याकडून आपणास हवे ते घ्यावे हा सरळ-सोपा मार्ग पुन्हा एकदा आपण यांच्याकडून शिकून आचरणात आणायला हवा. उत्क्रांतीच्या वाटेवर या दोन्ही प्रजातींनी एकमेकांना समजून-उमजून केलेली सहकार्याची भावना ही विज्ञान-संशोधनाच्याही पुढची आहे. का ? कसे ? याची उत्तरे मिळत राहतील; परंतु आजही अशा सहजीवनाकडून आपल्याला मात्र बरेच काही शिकण्यासारखे आहे.

No comments:

Post a Comment