बचनाग आणि अतिविष
देवतात्मा हिमालय अनेक औषधी वनस्पतींचं माहेरघर आहे. अस्सल ब्रह्मकमळ,
अस्सल कुटकी, खुरासनी ओवा दारूहळद, जटामासी आणि बचनाग. स्सल बचनाग
काश्मीरपासून नेपाळ, हिमालयात वाढतो. त्याचं अस्सल नाव 'वत्सनाभ',
अपभ्रंशानं 'बचनाग.' 'वत्सनाभ' या संस्कृत नामानं त्याचं व्यवच्छेदक लक्षण
स्पष्ट होतं. या वर्षायू वनस्पतीला जमिनीत कंदांची जोडी असते. हे दोन्ही
कंद एकमेकांना जुळलेले असतात. त्यांची आकृती दिसते वासराच्या अर्थात
गाईंच्या वासराच्या बेंबीसारखी. नाभीसारखी दिसते म्हणून ही वनस्पती
'वत्सनाभ.'
वत्सनाभचा भाईबंद आहे अतिविष. अतिविषही हिमालयाचाच रहिवासी.
नावावरूनच स्पष्ट होतं, की ही वनस्पती विषारी आहे. वत्सनाभ, त्याचाच भाऊ
म्हणजे विषारीच. वत्सनाभाची पर्यायी आयुर्वेदीय नावे आहेत ती त्याच्या
विषारी स्वभावावरूनच. विष, गरल आणि प्राणहर. याचबरोबर वत्सनाभ अमृत
म्हणूनही ओळखला जातो. विष आणि अमृत! दोन्ही जन्माला आली ती अमृतमंथनातून.
आयुर्वेदात एक प्रसिद्ध श्लोक आहे तो असा,
'योगादपि विषं तीक्ष्णं उत्तमौषधं भवेत्।
भैषजं काऽपि दुयरुक्तं तीक्ष्णं संभाव्यते विषम्।।
'योग्य
प्रमाणात वापरल्यास विष हे उत्तम औषध ठरतं, तर प्रमाणाबाहेर मात्रेत
दिल्यास औषध-भैषजही विषच ठरूशकतं,' याच न्यायाने थोड्या प्रमाणात वापरलेला
वत्सनाभ आणि अतिविष गुणकारी ठरतात. बाळगुटीत अतिविष समाविष्ट आहे, ते सर्वच
बालविकारांवरचा इलाज म्हणून, यामुळेच अतिविषाला 'महौषधी' आणि 'शिशुभैषज'
म्हटलं जातं! अकोनिटम् किंवा अकोनाईट नावाचं औषध होमिओपॅथी पद्धतीत
तापावरचा उपचार म्हणून वापरलं जातं, तसंच 'त्रिभुवनकीर्ती' या आयुर्वेदीय
ज्वरनाशकात बचनाग आहे. बचनाग आणि अतिविष या दोन्ही वनस्पती औषधी गुणांच्या.
या दोन्हीची प्रजाती अँकोनिटम्. अँकोनिटम् फेरॉक्स. फेरॉक्स म्हणजे
'भयप्रद.' बचनाग तर अँकोनिटम् हेटेरोफायलम्. हेटेरोफायनमचा अर्थ भिन्न पानं
असणारा, म्हणजे 'अतिविष.' वनस्पतीशास्त्रातील या दोन्हीचं आणखी एक नाव
म्हणजे 'माँक्स् हूड.' साधारण एक मीटरपर्यंत उंची, पानांची तर्हा
जातीप्रमाणे, फुलांचा रंगही जातीनुसार, पांढरा, पिवळा; पण सर्वांत देखणी
गडद निळ्या-जांभळ्या वर्णाची. त्यांच्यात निदलं, दलं म्हणजे पाकळ्या असा
भेदभाव नाही. सगळीच एका वर्णाची, त्यातील एक घटक अतिशय मोठा, उरलेल्या
सर्वांना आपल्या अंतरंगात वेढून टाकणारा, त्याची आकृती ख्रिस्ती
धर्मगुरूंच्या टोपीसारखी म्हणून याचं नाव मॉक्स् हूड-फणा.
अँकोनिटम् -
ग्रीक शब्द 'अकोनिटॉन' हे अँकोनिटम्चं मूळ. 'अँकोन'चा अर्थ 'बाण.' प्राचीन
काळापासून अँकोनिटम्चा विषारी स्वभाव ज्ञात होता, त्यामुळे याचे कंद वापरून
बाणाची टोकं विषारी केली जात. प्लिनीच्या मते काळ्या समुद्राजवळ 'अँकोन'
नावाचं स्थान होतं. हे स्थान म्हणजे अँकोनिटम्ची जन्मभूमी आणि म्हणून नाव
अँकोनिटम्. दुसर्या एका ग्रीक दंतकथेनुसार 'अँकोनिटस्' नावाचा एक पर्वत
होता. 'हक्यरुलस' म्हणजे ग्रीक पुराणकथेतील भीमाचा अवतार. त्याचं आणि
सेरबेरस नावाच्या एका पिसाळलेल्या कुत्र्याचं तुंबळ युद्ध अँकोनिटस्
पर्वतावर झालं. हा तीन डोक्यांचा कुत्रा इकिड्ना ही सर्पकन्या व टायफोन
यांचा मुलगा. या कुत्र्याची विषारी लाळ अँकोनिटस् पर्वतावर पडली. ती जिथे
पडली तिथे अँकोनिटम् ही वनस्पती जन्माला आली व तिने लाळेचा विषारीपणा
आत्मसात केला, त्यामुळेच 'अँकोनिटम् फेरॉक्स' म्हणजे भयावह विष.