Blogroll

IB Board 'आयबी बोर्ड':वैज्ञानिक शिक्षण पद्धतीचे नवे दालन

IB Board 'आयबी बोर्ड':वैज्ञानिक शिक्षण पद्धतीचे नवे दालन


'पहिली ते आठवी परीक्षा बंद' असा नियम निघाला आणि विविध शिक्षणतज्ज्ञांनी यावर आपली मते मांडली.. काहींनी त्यावर प्रखर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी (बळजबरीने) स्वागत केले. जागतिकीकरणाच्या बदलांमध्ये शिक्षण क्षेत्रातही अनेक बदल होत आहेत. 'शालेय पातळीवर परीक्षा नको' हा त्यापैकीच एक बदल. प्रचलित परीक्षा पद्धत खरंच सर्वोत्कृष्ट आहे की नाही, वा त्याला उपलब्ध असलेले पर्याय यांवर प्रकाश टाकण्याच्या प्रयत्न या लेखाद्वारे केला आहे.

माझ्या मते, 'विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास' हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट परीक्षा पद्धतीतून क्वचितच सफल होते. परीक्षाकेंद्रीत पद्धतीमध्ये विद्यार्थ्याच्या डोक्‍यात बदाबदा माहिती ओतणे म्हणजेच 'शिकवणे' आणि ती माहिती जशीच्या तशी परीक्षेमध्ये उतरवणे म्हणजे 'ज्ञानप्राप्ती'! यामुळे आपल्या शिक्षणपद्धतीत विधाने, व्याख्या, नियम यांची घोकंपट्टी रुजली. विज्ञानात प्रयोगांचे अनन्यसाधारण महत्त्व असूनही प्रयोगांना विज्ञान शिक्षणाचे माध्यम बनविण्याची गरज वाटली नाही.

सर्वसाधारणत:, 60 संख्या असलेल्या आपल्या वर्गांमध्ये एक-दोन विद्यार्थी उत्तम आकडेमोड अथवा स्मरणशक्तीच्या जोरावर परीक्षेत गुण मिळवित असतील, तर त्यांना आपल्याकडे 'हुशार' मानले जाते आणि इतर विद्यार्थी 'सर्वसाधारण' किंवा 'ढ' म्हणून विभागले जातात. स्मरणशक्ती किंवा उत्तम आकडेमोडीच्या आधारावर केलेली विभागणी 'सर्वसाधारण' व 'ढ' समजल्या गेलेल्या मुलांसाठी धोकादायक होऊ शकते. 'तारें जमीन पर'मधली 'एव्हरी चाईल्ड इज स्पेशन' ही आमीर खानने मांडलेली संकल्पना आपल्या प्रचलित परीक्षाकेंद्रीत पद्धतीमध्ये कुठेच समाविष्ट होत नाही.

चाकोरीबद्ध, शिस्तीच्या बडग्याखालची आणि परीक्षाकेंद्रीत पद्धत विद्यार्थ्यांची खरी जिज्ञासा वाढविते का? विद्यार्थी हे खरंच जिज्ञासू असतात. सलग पाच वर्षे परदेशात शालेय शिक्षक म्हणून काम केल्यावर मला आपली विज्ञान शिक्षण पद्धती आणि आधुनिक विज्ञान शिक्षण पद्धतीतील फरक लक्षात आला. आधुनिक विज्ञान शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी फक्त परीक्षा हेच एक माध्यम नाही. परीक्षा पद्धतीला पर्याय काय आणि कसा, याचा उहापोह करण्यासाठीच हा लेख..

दहावी, बारावी बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसई याप्रमाणेच शिक्षणक्षेत्रात 'आयबी' (International Baccalaureate) हे नवीन बोर्ड उदयास आले आहे. त्याची सुरवात स्वित्झर्लंडमध्ये झाला. सध्या भारतामध्येही पुणे, मुंबई, बंगळूर, दिल्लीमध्ये काही प्रमाणात या 'आयबी' शाळा आहेत. या 'आयबी' शाळा आणि त्यांच्या विज्ञान शिक्षण पद्धतीची आपण थोडक्‍यात ओळख करून घेऊ.

'प्रचलित परीक्षा पद्धतीला पर्याय' या विचारातून 'आयबी'ची सुरवात 1982 च्या दरम्यान झाली. गेल्या 30 वर्षांत चीन, मलेशिया, जपान आणि आफ्रिकेतील देशांत 'आयबी' शाळांची संख्या वाढत आहे. 'आयबी'मध्ये विज्ञान शिक्षणाची एक विशिष्ट चाकोरी आढळून येत नाही. शिक्षकांना इतर विषयांतील आंतरसंबंध जाणीवपूर्वक साधावा लागतो. 'इतिहासातील विज्ञानाची परिस्थिती' यावर मुलांना खोलवर संशोधन करण्याची मुक्तता आहे. उदाहरणार्थ, '15 व्या शतकातील महिला मासिक पाळीत आपल्या शरीराची वैज्ञानिक पद्धतीने कशी काळजी घेत होत्या' ही इयत्ता सातवीच्या वर्गासाठी संशोधनांतर्गत परीक्षा होती. वर्गातील विद्यार्थ्यांच्या गटाने इंटरनेटच्या मदतीने विविध स्रोतांद्वारे माहिती संकलित केली आणि त्याचे सविस्तर विश्‍लेषण करून त्याचे दिलेल्या वेळेत उत्कृष्ट सादरीकरण केले. गटातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला काहीतरी काम आले पाहिजे, ही त्या परीक्षेमधील सर्वांत महत्त्वाची अट होती. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना नियोजन, कामाची विभागणी, तर्कशुद्ध विचार करणे, सृजनशीलता ही आणि इतर अनेक मूल्ये अप्रत्यक्षरित्या विज्ञान विषयातून शिकविली जातात. या प्रकारच्या परीक्षेत प्रत्येक गटाच्या कामाचे मूल्यमापन हे विद्यार्थ्यांनी केलेले कामाचे नियोजन, सादरीकरण, तर्कशुद्ध विचार, कामाची विभागणी आणि सृजनशीलता या पातळ्यांवर केले गेले.

विज्ञान शिक्षणात प्रयोगाचे महत्त्व असल्याने 'आयबी' शिक्षणात प्रयोगाला फारच वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात येते. आमच्या शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक मिळून प्रयोगाची आखणी करतात, निरीक्षणाची खातरजमा करतात व चर्चाही करतात. ज्याप्रमाणे आपल्याकडे प्रयोगवहीत छापलेले प्रयोग करून घेण्याचा अट्टाहास या 'आयबी' शाळांमध्ये मुळीच नसतो. उदाहरणार्थ, इयत्ता सहावीच्या वर्गात सूक्ष्मजीव शिकवताना आम्ही चक्क 'यीस्ट' सूक्ष्मजीव वापरून ब्रेड बनविण्याचाच प्रयोग करण्याचा बेत आखला. प्रत्येक गटाने वेगवेगळी गृहितके मांडली आणि त्याप्रमाणे काम केले. काम संपल्यानंतर, म्हणजेच प्रयोग झाल्यानंतर आपापले निष्कर्ष तपासून पाहिले. या प्रकारच्या परीक्षेत प्रत्येक गटाने मांडलेली गृहितके, कामाची विभागणी, ब्रेडचा दर्जा आणि प्रत्येक गटाला आलेले निष्कर्ष या पातळ्यांवर मूल्यमापन केले गेले. या परीक्षेमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट झाली, ती विद्यार्थ्यांनी शेवटी आपण स्वत:च तयार केलेले ब्रेड खाल्ले. हे सारे करताना साहजिकच विज्ञान विषय आव्हानात्मक, जिवंत आणि सृजनात्मक आनंद देणारा ठरतो.

'आयबी' शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एखादे मत स्वीकारण्याची व नाकारण्याची रीत यांच्याशीही ओळख करून दिली जाते. याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी तयार होते. यासाठीच 'आयबी' शाळांमध्ये मूल्यशिक्षण आणि त्यासाठी स्वतंत्र तास नसतात. 'आयबी' शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एका ठरविलेल्या व्यक्तिमत्वामधून वाढविण्याचा प्रयत्न सतत केला जातो. ही ठरविलेली व्यक्तिमत्वे किंवा 'प्रोफाईल्स' पुढीलप्रमाणे :

(Caring) जाणीव, (knowledgeable) ज्ञानात्मक, (Thinker) विचारवंत, (Principled) तत्ववादी,(Responsible) जबाबदार, (Communicator) संवाद साधणारा.

प्रत्येक विषयातील विविध प्रकारच्या परीक्षांमधून (ज्यात आपल्यासारख्या प्रचलित परीक्षा अभावानेच असतात) वर नमूद केलेल्या 'प्रोफाईल्स' साधण्याचे एक रंजक आव्हान शिक्षकासमोर असते. 'आयबी' शिक्षणाची सर्वांत महत्त्वाची आणि जमेची बाब म्हणजे विद्यार्थ्याला 'ग्लोबल नागरिक' बनविण्याचा प्रयत्न. प्रत्येक विषयातील प्रत्येक धडा हा जागतिक पातळीचा विचार करून शिकवावा लागतो. हेदेखील 'आयबी' शिक्षकांसमोर एक मोठे आव्हान असते.

भविष्यकाळ हा नेहमीच आजच्या लहान मुलांचा असतो. कारण, आज शिकणारी मुले दहा-पंधरा वर्षांनी मोठी होणार आहेत. ती स्वबळावर शिकू शकली नाहीत, तर नजरेपलीकडच्या भावी प्रश्‍नांना समर्थपणे कशी भिडू शकतील? त्यांच्याबाबत आपुलकी असेल, तर त्यांना शिकवणाऱ्या आणि त्यांची जिज्ञासा चेतावणाऱ्या वेगळ्या विज्ञान शिक्षणाला पर्याय नाही. अशी जिज्ञासा चेतावणाऱ्या आणि परीक्षा-विरहीत शिक्षणपद्धतीत मला परदेशातील विद्यार्थ्यांनी आजवर विचारलेले प्रश्‍न खरंच मजेशीर होते. उदाहरणार्थ :

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानात गुरुत्वाकर्षणशक्ती नसताना अन्ननलिकेतून अन्न पोटाकडे कसे जाते? (धडा : पचनसंस्था)

दुसऱ्या गुदगुल्या केल्या, की हसू येते; पण स्वत:च स्वत:ला गुदगुल्या केल्या, तर हसू येत नाही का? (धडा : ज्ञानेंद्रिये)

स्वत:चा रेकॉर्ड केलेला आवाज इतरांना योग्य वाटतो; पण स्वत:ला नाही. असे का? (धडा : ध्वनी)

एखाद्या 'एचआयव्ही'ग्रस्त रुग्णाला डास चावला, तर डासाला 'एचआयव्ही'ची लागण होते का? नसेल, तर का नाही? (धडा : रोग)

अशा पद्धतीने रंजक विज्ञान शिक्षण देण्याचा प्रयत्न 'आयबी' करत आहे. वर नमूद केलेले प्रयोग व मूल्यमापनाच्या पद्धती प्रत्येक विद्यार्थ्याला निश्‍चितच आत्मविश्‍वासू बनवितात. परीक्षा पद्धत नसल्याने सर्वसामान्य विद्यार्थी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नाराज होत नाही आणि शिक्षणाचा खऱ्या अर्थाने आनंद घेतो. त्यामुळे मला माझ्या 'आयबी' शाळांमध्ये आजवर आलेल्या अनुभवांमुळे विज्ञान शिक्षणात बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेचा भाग बनल्याचा थोडा अभिमान वाटत आहे. 

No comments:

Post a Comment