Blogroll

ZIP Chains , झिप चेन

ZIP Chains , झिप चेन


सवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात नवनव्या प्रकारचे कपडे अस्तित्वात आले. त्यामुळे हे कपडे अंगावर नीट बसावेत आणि अंगावरून झटपट काढता यावेत, अशा सोयींचे बरेच शोध लागले.
आपल्याकडे जशी बाराबंदी असायची, तसेच अनेक बंद बांधायचे कपडे युरोपातही वापरले जात. अगदी श्रीमंत व्यक्ती शिंपले आणि त्यापेक्षाही धनिक असलेले लोक हस्तिदंताची बटणे सतराव्या शतकात वापरत असत. त्याचं प्रमाण अर्थातच फार कमी होतं.
पुढं लाकडी बटणे आणि काजांचा जमाना आला. आकडी म्हणजे हुक आणि अडणी म्हणजे लूप, हे स्त्रियांचे कपडे बंद करण्यासाठीचे साधन मानले जाऊ लागले. धातुशास्त्रात जशी प्रगती झाली, तशी धातूंची बटणे आली. त्याचबरोबर एकमेकांत अडकणारे दाते तयार केले गेले. दाबून बसवायची 'टिच' बटणे आली. पण, ही एक एक करून लावावी लागत असत. त्यामुळे थोडी त्रासदायक वाटत.
व्हिटकोंब जुडसन या अमेरिकनाने बुटांसाठी सर्वप्रथम एकात एक घट्ट बसणार्‍या दात्यांचे क्लास्प लॉकर बनवले; पण थोडा ताण पडताच हे सुटत असत. १९१३मध्ये गिडीअन सुंडस्टॉर्म याने या दात्यांना एका झटक्यात एकत्र आणून एकमेकांत अडकवणारी सरक चावीची सोय बनवली. या चेनचे दाते एका पट्टीवर बसवले होते. चेनची सरक चावी सरकवताना होणार्‍या आवाजामुळं या सुविधेला झिप चेन किंवा झिप फासनर असं म्हणण्यात येऊ लागलं. प्लॅस्टिकच्या जमान्यात धातूच्या ऐवजी प्लॅस्टिक झिप अवतरल्या. त्या स्वस्त असल्यामुळे लोकप्रिय झाल्या. आता तर या चेन कपड्यांशिवाय पिशव्या, बूट, बॅगा, लहान लहान मनीपर्स यांसाठीही वापरल्या जातात. 

No comments:

Post a Comment