Blogroll

रायगडबांधणीची प्रेरणा Raigarh

 रायगडबांधणीची प्रेरणा Raigarh 


 रायगडबांधणीची प्रेरणा Raigarh


शिवकालीन दुर्गांपैकी राजगड-रायगड हे छत्रपतींचे बिनीचे दुर्ग. रायगड शिवछत्रपतींनी राजधानी म्हणून बांधवून घेतला. कौटिल्याची नगररचना व त्यातील दिशादर्शन यांचे तंतोतत दर्शन रायगडाच्या बांधणीतून दिसते. र्थशास्त्रामध्ये कौटिल्याने नगररचनेच्या संदर्भात विस्तृत व नेमके विवेचन केलेले आढळते. कोणत्या जागी काय हवे, जे हवे ते कोणत्या दिशेस हवे, आजूबाजूस काय हवे व ते का हवे, यासंबंधीची सारी मतमतांतरे त्याने अतिशय नेटकेपणाने उलगडून दाखवली आहेत.
सातवाहन सम्राटांनी निर्मिलेले काही प्राचीन दुर्ग, चालुक्य व राष्ट्रकूटांनी निर्मिलेले काही मध्ययुगीन दुर्ग व अगदी अलीकडील म्हणावे असे शिवकालीन दुर्ग वानगीदाखल जरी निवडले, तरी यातून हा विषय स्पष्ट होतो. या संदर्भात अनेक दुर्गांची उदाहरणे देता येतात. सातवाहनकालीन दुर्गांमध्ये जीवधन, शिवनेरी, हडसर या जुन्नर परिसरातील दुर्गांची उदाहरणे देता येतात. अजिंठा-सातमाळ रांगेतील मार्कंड्या, रवळ्याजवळ्या, राजदेहेर, इंद्राई हे चालुक्य, राष्ट्रकूटकालीन दुर्गही याकडे निर्देश करतात. येथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, की वर सांगितलेल्या सार्‍याच दुर्गांवर नंतरच्या राजवटींनी अनेकानेक संस्कार केले. त्यामुळे मूळ अवशेष लोपलेले जरी दिसले, तरी काही मूळ वास्तू त्यातूनही ओळखता येतात. मात्र, त्यासाठी पारखी नजरेची आवश्यकता असते.
या विषयात नेमके निर्देश हवे असतील, तर अगदी अलीकडे रचलेल्या दुर्गांचा अभ्यास करावा लागतो. मध्ययुगीन शेवटची दुर्गनिर्मिती शिवकालात झाली. या शिवकालीन दुर्गांपैकी राजगड-रायगड हे छत्रपतींचे बिनीचे दुर्ग. रायगड शिवछत्रपतींनी राजधानी म्हणून बांधवून घेतला. कौटिल्याची नगररचना व त्यातील दिशादर्शन यांचे तंतोतंत दर्शन रायगडाच्या बांधणीतून अनुभवास येते.
कौटिल्य म्हणतो, नगरातील वस्तीच्या मध्यभागी, पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख असा राजवाडा बांधावा. या राजवाड्याच्या पूर्वेस उत्तरेच्या बाजूस आचार्य व पुरोहित यांची निवासस्थाने, यज्ञशाला व जलागार असावेत. दक्षिणेस पूर्वेकडील भागात भांडार, सेवकांच्या राहण्याच्या जागा असाव्यात. दक्षिणेस कारखान्यांवरील अधिकारी, सेनाधिकारी, वैश्य व व्यापारी यांची वस्ती असावी.
राजवाड्याच्या उत्तरेस बाजारपेठ व औषधालय असावे. उत्तरेच्या पूर्वेकडील भागात नगरदेवता, राजाची कुलदेवता यांची मंदिरे, धातू, रत्ने यांच्यापासून वस्तू बनविणारे कारागीर, तसेच ब्राह्मण यांची वस्ती असावी.
राजाच्या निवासस्थानाच्या पाठीमागे स्वतंत्र महालांमध्ये स्त्रियांचे निवासस्थान, प्रसूतिगृह या वास्तू असाव्यात. त्यांच्या पलीकडे राजपुत्र, राजकन्या यांची निवासस्थाने असावीत. त्यांच्या निवासस्थानाच्या पुढल्या बाजूस वस्त्रालंकार धारण करण्याची खोली, सल्लामसलतीची खोली असावी. राजमहालाच्या चहूबाजूंस पहारेकर्‍यांच्या चौक्या असाव्यात.
कौटिल्य जे-जे म्हणतो, ते सारेच रायगडावरील राजवाड्याचा परिसर पाहताना अनुभवता येते. येथील शिवछत्रपतींचा वाडा पूर्वाभिमुख आहे. राजवाड्याच्या पाठीमागील बाजूस राणीवसा आहे. समोरच्या बाजूस सभागृह आहे. दक्षिणेस अष्टप्रधानांचे वाडे आहेत. उत्तरेस वण्यावियीका वा बाजारपेठ आहे. उत्तरेच्या पूर्वेकडील भागात नगरदेवता-जगदीश्‍वर आहे. पूर्वेस उत्तरेच्या बाजूस ब्राह्मणवाडा आहे. पूर्वेस सैन्य व सर्वसामान्यांच्या वस्तीच्या जागा आहेत. मला वाटते, ही सारी रचना हेतुगर्भ आहे. आपल्या हिंदुस्थानातील दुर्गशास्त्राचा एक प्राचीन वसा शिवकालापर्यंत कसा आला, या प्रवासाची ही एक अनोखी कहाणी आहे!

No comments:

Post a Comment