Blogroll

Blood Group Details रक्तगट ठरतात कसे?

Blood Group Details रक्तगट ठरतात कसे? 



कोणाला रक्त द्यावयाचे असल्यास आपला रक्तगट माहीत असणे गरजेचे आहे. वेगळ्या गटाचे रक्त दिल्यास रिअँक्शन येऊ शकते. क्वचित प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो.
ओ गटाचे रक्त सर्व गटाच्या व्यक्तींना दिलेले चालते (युनिव्हर्सल डोनर) आणि एबी गटाची व्यक्ती कोठल्याही गटाचे रक्त घेऊ शकते (युनिव्हर्सल रिसीपियंट), असे मानले जाते. परंतु, कधी कधी ओ रक्तगटाच्या रक्तातील अँटी ए व अँटी बी या अँटीबॉडीज अपेक्षेपेक्षा बर्‍याच पटीने अधिक प्रभावी असतात. अशा परिस्थितीत ओ रक्तगटाचे रक्त संपूर्णपणे सुरक्षित राहीलच असे नाही. त्यामुळे सध्या रुग्ण ज्या रक्तगटाचा आहे, त्याच रक्तगटाचे रक्त त्याला दिले जाते. त्या रक्तगटाचे रक्त मिळत नसल्यास किंवा इर्मजन्सी परिस्थितीत अपवाद म्हणून ओ रक्तगटाचे रक्त दिले जाते. अपघातप्रसंगी आपल्या स्वत:ला, जवळच्या नातेवाइकांना किंवा मित्राला कधीही रक्ताची गरज भासू शकते. त्यासाठी रक्तासंदर्भात मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. आपले रक्त मुख्यत: दोन भागांनी बनले आहे. लाल रक्तपेशी आणि रक्तरस (प्लाइका). लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर अँटीजेन्स (प्रतिजन) असतात व रक्तरसामध्ये अँटीबॉडीज (प्रतिद्रव्ये) असतात. अँटीजेन्स जन्मापासून आपल्या बरोबर येतात, तर अँटीबॉडीज जन्मानंतर साधारणत: चार महिन्यांनंतर शरीरात तयार होतात. रक्तगटांची नावे लाल रक्तपेशींवर असणार्‍या अँटीजेनवरून दिली जातात. त्या अँटीजेनची संलग्न अँटीबॉडी रक्तरसात असते. यावरून रक्तगट ठरविले जातात.
१) ए रक्तगटाच्या लाल रक्तपेशींवर 'ए' अँटीजेन असते व रक्तरसात अँटी बी अँटीबॉडी असते.
२) बी गटाच्या लाल रक्तपेशींवर 'बी' अँटीजेन व रक्तरसात अँटी ए अँटीबॉडी असते.
३) ओ रक्तगटाच्या लाल रक्तपेशींवर ए किंवा बी कोणतेच अँटीजेन नसते. परंतु, रक्तरसात अँटी ए व अँटी बी या दोन्हीही अँटीबॉडीज असतात.
४) एबी रक्तगटाच्या लाल रक्तपेशींवर ए आणि बी ही दोन्हीही अँटीजेन्स असतात. परंतु, रक्तरसात अँटी ए आणि अँटी बी या दोन्हीही अँटीबॉडीज नसतात.
शरीरातील अविभाज्य भाग असणारे रक्त हे एकाच रंगाचे आणि जवळपास एकसारखेच दिसणारे असते. तरी त्यामध्ये असणारे प्रकार म्हणजेच रक्तगट कसे पडतात? यामागील शास्त्र आणि त्याचे महत्त्व जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Super Glue - सुपर ग्लू

Super Glue -  सुपर ग्लू

आज बाजारात अनेक प्रकारचे डिंक उपलब्ध असल्यामुळे आता खळ सहसा वापरली जात नाही. पूर्वी डिंक वापरात होताच, परंतु सहज उपलब्ध होत नसे. बाजारात उपलब्ध असणार्‍या डिंकाच्या अनेक प्रकारांपैकी 'सुपर ग्लू' हा डिंकाचा आधुनिक प्रकार फार लोकप्रिय आहे.
हा 'सुपर ग्लू' लोकप्रिय होण्याचे कारण एकच - या डिंकामुळे कागद चुटकीसरशी चिकटतो. कागदच नव्हे, तर इतरही अनेक वस्तू या डिंकामुळे चिकटविता येतात. दोन लाख वर्षांपूर्वी इटली या देशात डिंकाचा प्रकार मानवाच्या वापरात होता, याची नोंद २00१ मध्ये आढळली. त्याचप्रमाणे सत्तर हजार वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील सिबुदू या ठिकाणीही काही संयुगे वापरून तयार केलेले आसंजक वापरात असल्याची नोंद आढळते. हे आसंजक झाडाचा डिंक आणि नैसर्गिक डिंकाचे गुणधर्म बदलतात आणि ते अधिक टिकाऊ होते. तसेच ते, पाण्यात विरघळत नाहीत. अश्मयुगात या आसंजकाचा वापर दगडी हत्यारे आणि वस्तू तयार करण्यासाठी होत असल्याचे दिसून येते. आजही वस्तू झटपट चिकटवणारा आसंजक म्हणजेच 'सुपर ग्लू' तयार करण्याच्या प्रयत्नांत अनेक संशोधक आहेत.
१९४२ मध्ये झालेल्या दुसर्‍या महायुद्धात अशाच एका आसंजकाचा शोध लागला. युद्धकाळात अँक्रेलिकपासून हलक्या वजनाच्या; परंतु टिकाऊ बंदुकीच्या नळ्या तयार करण्यात संशोधक गुंतले होते. संशोधकांच्या चमूचे प्रमुख हॅरी वॅस्ले. हे बंदुकीच्या नळ्या तयार करीत असताना, नळीला एका पदार्थाचा स्पर्श झाला व तो नळीला चिकटला. अनेक प्रयत्नांनंतरही त्या नळ्यांचा चिकटपणा जात नव्हता. अखेरीस त्या नळ्या निरुपयोगी म्हणून टाकून देण्यात आल्या.
त्यानंतर तब्बल ९ वर्षांनी सायनोअँक्रिलेट या 'सुपर ग्लू'चा शोध लागला. याचे श्रेय इस्टमन कोडॅक कंपनीतील दोन संशोधक हॅरी कुव्हर आणि फ्रेड जॉयनर यांना जाते. १९४२ च्या युद्धकाळात जो चिकट पदार्थ तयार झाला होता तो पदार्थ उत्तम आसंजक म्हणून वापरात येऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या दृष्टीने त्यांनी त्यावर संशोधन सुरू केले. त्यांनी सायनोअँक्रिलेटमध्ये मिथाईल-२ सायनोअँक्रिलेट व इथाईल-२ सायनोअँक्रिलेट यांचा समावेश करून, 'सुपर ग्लू' तयार केले. १९५८ मध्ये 'इस्टमन-९१0' या नावाचे सायनोअँक्रिलेट बाजारात प्रथमच उपलब्ध झाले. १९६0 मध्ये लॉक्टाईट नावाचे सायक्रोअँक्रिलेट बाजारात उपलब्ध झाले. अधिक संशोधनानंतर १९७१ मध्ये 'सुपर बॉन्डर' नावाने सायक्रोअँक्रिलेट तयार केले.  - डॉ. के.सी. मोहिते

कीटकांचे गंध Smelling Capacity of Insects

कीटकांचे गंध Smelling Capacity of Insects 


कीटकांचे गंध Smelling Capacity of Insects
कीटक त्यातही मुंग्या इतक्या शिस्तीत वागतात कशा, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर कीटक त्यांच्या शरीरातून वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या वासांचे स्राव सोडत असतात यात आहे. ण्यांच्या शरीरामध्ये असलेल्या स्रावकग्रंथींमधून ते विविध स्राव शरीराबाहेर सोडत असतात. त्यातील काही स्रावांना विशिष्ट गंध असतो आणि त्या गंधातही विशिष्ट प्रकारचा संदेश दडलेला असतो. हा गंध आणि त्यातील संदेश, ज्या प्राण्याने तो स्राव शरीराबाहेर सोडला, त्याचे जातभाई वा जातभगिनीच ओळखू शकतात आणि संदेशानुसार कृतीही करतात. या स्रावामध्ये संप्रेरकाचा समावेश असतो. अशा स्रावासाठी इंग्रजी भाषेत फेरोमोन/फेरोमोन्स असा ग्रीक भाषेतील जोडशब्द वापरला जातो. मराठी भाषेत त्याला प्रतिशब्द म्हणून 'लिंग गंध' हा शब्द वापरला जातो. खरे तर लिंग गंध हा गंध फेरोमोन्स या सं™ोने ओळखल्या जाणार्‍या नऊ गंधांपैकी केवळ एक गंध आहे. मराठीत फेरोमोन्सला 'वातवाही संप्रेरक गंध गट' असे म्हणावयास हवे.
कामकरी मधमाशी तिला बिचकावणार्‍या किंवा हल्ला करणार्‍या माणसाला जेव्हा डंख करते, तेव्हा ती तिच्या पोळय़ातील इतर कामकरी मैत्रिणींना धोक्याचा इशारा आणि मदतीला येण्याची हाक स्राव गंधानेच देते. त्याला 'इशारा गंध' म्हटले जाते.
मुंग्या, वारुळाबाहेरील अन्नसाठा शोधल्यावर, अन्नांश वारुळात आणताना वाटेमध्ये जागोजागी आपल्या पोटाचे शेवटचे टोक टेकवत असतात. त्या वेळी त्या त्या जागी गंधस्रावाचा थेंब सोडीत असतात. त्याचा उद्देश, वारुळातून अन्नासाठी बाहेर पडणार्‍या अन्य मुंग्यांनी त्या गंधाच्या अनुरोधाने विनासायास अन्नसाठय़ापर्यंत जावे हा असतो. अन्नमार्गाचा गंध वातवाही संप्रेरक गंध गटातील एक गंध असतो.
असे सांगितले जाते, की वाळवीच्या वारुळातील सारे व्यवहार वातवाही संप्रेरक गंध गटातील निरनिराळय़ा गंधांवरच अवलंबून असतात. राणी वाळवीच्या त्वचेतून गंधस्राव जणू पाझरत असतात. त्यातील गंध कामकरी घटकांना राणीजवळ येऊन तो चाटण्याचा संदेश देतो. कामकरी घटकांनी तो चाटला आणि त्यातील काही अंशरक्षक घटकांना पाजला, तर कामकरी आणि रक्षक घटक प्रजननास अपात्र ठरतात. शिशू कामकरी घटक, भूक लागल्यानंतर अन्न पुरविणार्‍या मोठय़ा कामकरी घटकांना त्यांच्या शरीरातील गंधस्राव बाहेर सोडून त्या करवी घास भरविण्याची विनंती करतात. त्यास 'लाचार गंध' वा 'विनंती गंध' म्हणतात. वातवाही संप्रेरक गंध गटाचे उपगट (उदा. लिंग गंध, इशारा गंध इत्यादी) पडण्याचे कारण त्या-त्या स्रावामध्ये वेगवेगळी रासायनिक संयुगे असतात हे होय. (उदा. मधमाशीने मैत्रिणींना एकत्र येण्यासाठी वापरलेल्या गंधस्रावामध्ये नेरॅलिक किंवा जेरॅनिक आम्ल असते, वाळवीच्या शिशू कामकर्‍यांनी पोटभरीसाठी वापरलेल्या लाचार गंधामध्ये इ-हेवझेन एल.ओ.एल. हे रासायनिक संयुग असते.)

एडवर्ड जेन्नर देवी ची लस, Edward Jenner's Smallpox vaccine

एडवर्ड जेन्नर देवी ची लस, Edward Jenner's Smallpox vaccine

एडवर्ड जेन्नर देवी ची लस, Edward Jenner's Smallpox vaccine



काही शास्त्रज्ञ त्यांचे संशोधन व निष्कर्ष याबद्दल इतके ठाम असतात, की त्याचे प्रयोग स्वत:वरही करण्याची त्यांची तयारी असते. डॉ. जेन्नर यांनी त्या पुढची पायरी गाठत देवीसारख्या त्या काळी असाध्य मानल्या जाणार्‍या आजाराची लस आपल्या ११ महिन्यांच्या मुलाला टोचली. ज्ञानाच्या इतिहासामध्ये अनेक संशोधकांनी आपले संशोधन पूर्णत्वास नेण्यासाठी धाडसी प्रयोग केलेले आहेत. हे प्रयोग मुख्यत: उपकरणाच्या उपयोगाच्या बाबतीत होते. जेन्नर यांनी केलेले प्रयोग मात्र तरुण आणि लहान मुलांच्या संबंधातील होते. विशेष म्हणजे, त्यांना आपल्या संशोधनाविषयी आणि आपण केलेल्या अनुमानाविषयी एवढी खात्री होती, की त्यांनी त्यांच्या संशोधनाचा प्रयोग स्वत:च्या ११ महिन्यांच्या मुलावर केला. अठराव्या शतकात जगातील अनेक देशांमध्ये 'देवी' हा रोग अतिशय दुर्धर असा मानला जाई. देवीची लागण झाल्यामुळे शरीरावर अनेक विपरित परिणाम होत आणि काही लोकांना अंधत्व येत असे. त्याचप्रमाणे अनेक मुले या रोगाला बळी पडत. 
एखाद्या समस्येने अनेक जण ग्रस्त असतात. मात्र, ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींची संख्या अगदीच कमी असते. जेन्नर हे तरुणपणी जॉन हंटर या शल्यविशारदाबरोबर त्यांचे साहाय्यक म्हणून काम करीत होते. जॉन हंटर यांनी त्यांना एक कानमंत्र दिला होता. तो म्हणजे 'विचार करू नका, प्रयत्न करा.' जेन्नर यांनी छातीमध्ये होणार्‍या वेदनांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. अठराव्या शतकात युरोपमध्ये आपल्याकडील झोपडपट्टींशी साम्य दाखवणारी वसाहत होती. त्यामुळे तेथेही डास, पिसवा यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे पिसवांपासून होणार्‍या रोगावरही त्यांनी संशोधन केले.
हे संशोधन करीत असताना 'देवी' या रोगामुळे होणार्‍या 'अपरिमित नुकसानी'कडे त्यांचे लक्ष गेले. त्या काळी देवी हा रोग असाध्य मानला जाई. त्यांचा होणारा प्रादुर्भाव इतका प्रचंड होता, की जवळ जवळ ६0 टक्के लोकांना त्याची लागण होत असे. या लागण झालेल्या लोकांपैकी २0 टक्के लोक, तर मृत्युमुखी पडत. त्याचप्रमाणे चेहरा विद्रूप होणे, दृष्टीवर परिणाम होणे यांसारख्या गोष्टी घडून येत.
देवी या रोगावर उपाय शोधण्याचा विचार करत असताना, त्यांच्या नजरेस एक गोष्ट पडली. गाईची धार काढणार्‍या स्त्रियांना या रोगाची लागण झाली, तरी त्यांच्यावर या रोगाचा होणारा परिणाम अतिशय कमी असे. या निरीक्षणावर विचार करताना त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली, की गाईंना होणारा देवीचा प्रादुर्भाव आणि त्यांच्या संपर्कातील स्त्रियांना होत नसलेला प्रादुर्भाव यामध्ये काहीतरी रहस्य दडलेले असावे. गाईच्या संपर्कात आल्यामुळे स्त्रियांना या रोगापासून बचाव करण्याची क्षमता प्राप्त होत असावी हे अनुमान तपासण्यासाठी त्यांनी एक धाडसी प्रयोग केला. गाईला झालेल्या देवीच्या व्रणातील स्राव त्यांनी एका १८ वर्षांच्या तरुणाच्या शरीरात टोचला. त्याचाच परिणाम असा झाला, की, त्या तरुणाला देवीची लागण झाली नाही. असाच प्रयोग त्यांनी इतर २३ व्यक्तींवर केला. त्यामध्येही त्यांना समाधानकारक यश मिळाले. असे होऊनही संशोधकांनी मात्र त्यांचा शोध मान्य केला नाही. शेवटच्या प्रयोगात त्यांनी या चाचणीमध्ये आपल्या ११ महिन्यांच्या मुलाचा समावेश केला. त्यांनी सातत्याने केलेल्या या प्रयोगामुळे संशोधकांना त्यांची दखल घ्यावी लागली. अखेर त्यांचे अनुमान मान्य होऊन देवीच्या रोगावर प्रतिबंधक लस तयार झाली. इंग्रजीमधील Vaccination हा शब्द Vacca म्हणजे गाय या शब्दापासून तयार झालेला आहे. देवीच्या व्रणातील स्राव शरीरामध्ये टोचल्यामुळे मानवाची प्रतिष्ठा कमी होते, असा आक्षेप घेण्यात आला. मात्र, या रोगामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडतात, याबाबत मात्र त्यांनी आस्था दाखविली नाही. जेन्नर यांची कल्पकता आणि त्यांची धाडसी वृत्ती यामुळे हे वरदान प्राप्त झाले.

Radioactivity किर्नोत्सर्जन आणि भावी पिढी

Radioactivity किर्नोत्सर्जन आणि भावी पिढी 



जीनमध्ये होणारा बदल हा प्रभावी आहे की अप्रभावी, यावर बरेच काही अवलंबून असते. जीन प्रभावी किंवा वरचढ असेल, तर त्या जीनमुळे निर्माण होणारी लक्षणे अनैसर्गिकरीत्या अप्रत्यक्षात उद्भवतील.
दुसर्‍या पिढीत लक्षणे उद्भवायची असतील, तर तो अप्रभावी जीन स्त्री व पुरुषाच्याही जननकोषात असणे आवश्यक असते. म्हणून अप्रभावी जीन हे बर्‍याच पिढय़ांमध्ये अप्रकट अवस्थेत राहू शकतात. जोपर्यंत ही परिस्थिती असते, तोपर्यंत अंडकोषात शुक्रजंतू व ठरावीक जीन एकत्र येत नाहीत. 
सन १९२७ मध्ये एच. जे. मूलर या अमेरिकन शास्त्रज्ञाने एक महत्त्वाचा शोध लावला. तो म्हणजे विविध प्राण्यांमधील 'रेडिएशन'मुळे होणार्‍या उत्परिवर्तन स्वरूपातील परिणाम. त्यांना हे बदल मुख्यत: 'ड्रोसोफिला मेलानोगॅस्टर' या जीवाणूंमध्ये आढळून आले. प्रामुख्याने सर्वसाधारण पाखरांवर 'क्ष' किरणांचा मारा केल्यास, हे बदल घडून आल्याचे दिसले. विविध किरणे म्हणजे बीटा कण, अल्फा कण, गॅमा किरण आणि न्यूट्रॉन्स वापरल्यानंतर त्यांना प्राणी व वनस्पतींमध्ये उत्परिवर्तनाचे परिणाम घडून आल्याचे दिसले. मुख्यत्वेकरून जैवरासायनिक दृष्टिकोनातून किरणांमुळे प्रजननावर होणार्‍या परिणामासंबंधीच्या अभ्यासाविषयी बरेचसे संशोधन झालेले आहे. किरणांमुळे होणार्‍या उत्परिवर्तन परिणामांवर विविध प्राण्यांच्या वर्गात प्रयोग केले गेले आहेत. यात छोटे-मोठे उंदीर, ससा यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. 
मूलरच्या पाखरांवरील प्रयोगाने हे सिद्ध झाले, की उत्परिवर्तनाची वाढ ही फक्त एकूण किरणांच्या मार्‍यांवर अवलंबून असते. विशिष्ट कालावधीच्या किरणांच्या मार्‍यावर ते अवलंबून नाही. हेच अनुमान नंतर बरीच वर्षे सर्व जिवांसाठी ग्राह्य धरण्यात आले. तथापि, १९५८ मध्ये ओक रिडज लॅबोरेटरीजचे प्रख्यात शास्त्रज्ञ डब्ल्यू. एल. रुसेल व त्यांच्या सहकार्‍यांनी उंदरांवर 'क्ष' व गॅमा किरणांचा मारा करून, त्यांच्या आनुवंशिक जीनमध्ये उत्परिवर्तन घडवून आणले. या प्रयोगाच्या आधारे हे सिद्ध झाले, की जेव्हा 'क्ष' आणि गॅमा किरणांच्या एकूण मात्रा व उत्परिवर्तन वाढीची वारंवारिता यात क्वचितच परस्पर व्यस्त प्रमाण असल्याचे दिसले.
वास्तविक वारंवारिता ही अंशत: तरी किरणांच्या ठरावीक कालावधीच्या मात्रेवर अवलंबून असल्याचे आढळले आहे. म्हणून नर उंदरांवर केलेल्या एका प्रयोगानंतर असे प्रसिद्ध करण्यात आले, की नर उंदराच्या आनुवंशिक जीनमधील किरणांमुळे होणार्‍या उत्परिवर्तनाच्या वाढीची वारंवारिता ही एकूण मात्रेवर अवलंबून नसून, ती किरणांच्या ठरावीक कालावधीच्या मात्रेवरही अवलंबून असते. किरण मात्रेचा कालावधी कमी असला, तरी त्या उत्परिवर्तनाच्या वारंवारतेत बदल होतो.

कापूर Camphor Tablets

कापूर Camphor Tablets

स्कृतमध्ये कर्पूर, मराठीत कापूर व इंग्लिशमध्ये कॅम्फर अशा उच्चारसाधम्र्य असणार्‍या नावांनी ओळखली जाणारी कापराची वडी घरोघरी धार्मिक पूजाअर्चांमध्ये आरतीसाठी उपयोगात आणली जाते. कापूर ज्वालाग्राही आहे; पण त्याचा एकदम भडका उडत नाही. तो जळताना थंड ज्योतीने जळतो व राखही मागे राहत नाही. कापराचा शुभ्र रंग व थंड ज्योत यांमुळेच संस्कृतमध्ये चंद्र किंवा चंद्राला समानार्थी शब्दही कापूर या अर्थाचे आहेत. शंकराचे वर्णन 'कपरूरगौर' या विशेषणाने केले जाते. कारण, कापूर दिसतो शुभ्र स्फटिकासारखा.
नैसर्गिक कापूर हे वनस्पतिजन्य सुगंधी द्रव्य आहे. पूर्वेकडील चीन, जपान व भारत या देशांमध्ये प्राचीन काळापासून वृक्षांपासून कापूर मिळवला जातो. दालचिनी, तमालपत्र सुगंधी द्रव्यांच्या कुळातील 'सिनॅमोमम कॅम्फोरा' या सदाहरित वृक्षापासून मुख्यत: कापूर मिळतो. झाडाची पाने चुरडल्यासही कापराचा वास येतो. ही झाडे जंगलात आपोआपही वाढतात व मुद्दाम लागवडही केली जाते. जुन्या झाडांच्या खोडाचे बारीक तुकडे करून, वाफेच्या मदतीने ऊध्र्वपातन करून कापूर व कापराचे तेल काढले जाते. घनरूप द्रव्यातील पाण्याचा व तेलाचा अंश यंत्राच्या साहाय्याने काढून टाकतात. हा कापूर आणखी शुद्ध करण्यासाठी उष्णतेने त्याची वाफ करून व ती वाफ थंड क रून जे चूर्ण उरते, त्याच्या वड्या पाडतात. असा नैसर्गिक कापूर अजूनही बनत असला, तरी आता रासायनिक पद्धतीनेही कापूर बनवला जातो. कापूर संप्लवनशील असतो म्हणजे घनरूपातून तो द्रवरूप अवस्थेत न जाता बाष्परूपात जातो. हवेत उघडा राहिला असता उडून जातो. त्याला विशिष्ट उग्र वास असतो व तिखटसर चव असते. त्यात औषधी गुणधर्मही आहेत. यातील मेंथॉलसदृश द्रव्य त्वचेवर बाहेरुन लावण्याच्या जंतुनाशक मलमांमध्ये तसेच स्नायूंच्या दुखण्यावरील मलमांमध्ये उपयोगात आणले जाते. कापराची वडी कपाटात ठेवल्यास कपडे, पुस्तके व इतर वस्तूंची वाळवी, मुंग्या अशा कीटकांपासून रक्षण होते. डासांचा प्रतिबंध करण्यासाठीच्या रसायनांमध्येही कापूर वापरतात. काही आयुर्वेदिक औषधांमध्ये कापराचा र्मयादित प्रमाणात उपयोग केला जात असला, तरी त्याची वडी पोटात गेल्यास अपायकारक आहे. त्यामुळे पूजेसाठी आणलेला कापूर लहान मुलांपासून दूरच ठेवणे इष्ट. तसेच, कापूर जळताना बराच धूर होतो. त्यामुळे बंदिस्त जागेत धुराचा त्रास होऊ शकतो व कार्बनचे थरही जमतात. म्हणून हल्ली काही देवालयांच्या गाभार्‍यात कापूर जाळणे बंद केले आहे व तो बाहेर उघड्यावर जाळला जातो, हे योग्यच आहे. 

फेसबुक सेफ्टी Protect Your FaceBook Account

फेसबुक सेफ्टी Protect Your FaceBook Account 

फेसबुक सेफ्टी Protect Your FaceBook Account


आपल्यापैकी बहुतेकांकडे फेसबुकचे अकाउंट आहे. दिवसातून अनेकदा लॉग ऑन करून आपण कोणाचं काय चाललंय ते पाहात असतो. नवीन काहीतरी वाचतो, फोटो पाहतो आणि पोस्टही करतो. फेसबुक अकाउंट उघडताना सुरु वातीला सेटिंग्ज पाहिलेली असतात; पण नंतर मात्न प्रोफाइल पिक्चर बदलण्याखेरीज फारसं लक्ष आपण देत नाही. त्यासाठीच्या या काही टिप्स. 

1 फेसबुकची प्रायव्हसी सेटिंग्ज महत्त्वाची आहेत. सगळ्यात आधी तुम्ही पोस्ट केलेल्या गोष्टी कोण कोण पाहू शकतं, ते ठरवा. तुमच्या फ्रेंड लिस्टचे काही ग्रुप्स केले असतील, तर त्याप्रमाणेही तुम्ही गोष्टी फक्त त्यांच्यासाठी अशा शेअर करू शकता. पब्लिक ऑप्शन सिलेक्ट केलात, तर गोष्टी जगाला कळतील. फ्रेंड्स ऑप्शनमध्ये फक्त तुमचे मित्नच तुमच्या पोस्ट पाहू शकतात. तुम्ही तुमच्या जुन्या पोस्टदेखील लिमिट द ऑडियन्स पर्यायच्या मदतीने तुमच्या मित्नमंडळीपर्यंतच र्मयादित ठेवू शकता.

2 शक्यतो फेसबुकवर तुमचा फोन नंबर टाकू नका. (आवश्यक असल्यास  फोन नंबर (Public) सार्वजनिक नका करू )

3 तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट कोण पाठवू शकतं ते ठरवा.

4 तुमचा ई-मेल अँड्रेस वापरून किंवा फोन नंबर वापरून तुम्हाला फेसबुकवर शोधता येणं शक्य आहे. त्यामुळे ते सेटिंगही पाहा.

5 याशिवाय तुम्हाला कोण टॅग करू शकतं, तुमच्या वॉलवर किंवा फोटोजवर कॉमेंट्स कोण लिहू शकतं, हेही तुम्ही ठरवू शकता.

6 आपण लॅपटॉप, टॅब्लेट, फोन अशा वेगवेगळ्या गॅजेट्सवरून फेसबुक अँक्सेस करतो. पण शक्यतो ऑफिससारख्या ठिकाणी जिथे नेटवर्क शेअरिंग असतं किंवा एकच कॉम्प्युटरही शेअर केला जातो तिथे फेसबुकचं डिफॉल्ट लॉग इन करू नका. अशा कॉम्प्युटर्सवरून फेसबुक वापरल्यावर लॉग आऊट करायला विसरू नका.
7 तुमच्या फोनवरची अनेक अँप्स इन्स्टॉल करताना तुमच्याकडे फेसबुक अँक्सेस करायची परवानगी मागतात. ही गोष्ट चेक करा. नाहीतर तुम्ही वापरत असलेल्या अँप्सबद्दलच्या गोष्टी तुमच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट होत राहतील.

8 फ्री वाय-फायमधून शक्यतो फेसबुक लॉग इन करू नका. कारण अशा नेटवर्कवर तुमचा डेटा आरामात हॅक होण्याची शक्यता असते.

9 तुमच्या कॉम्प्युटरवरचं अँण्टी व्हायरस सॉफ्टवेअर अपडेट ठेवा. शिवाय तुमच्या कॉम्प्युटरवर जो ब्राऊजर वापरत असाल तोही वेळोवेळी अपडेट करा; कारण त्यातही काही सेक्युरिटी प्रोटेक्शन इनिबल्ट असतं.

10 फेसबुकवर दिसणार्‍या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी थोडा विचार करा. तुमच्या मित्नाच्या अकाउंटवरून आलेली एखादी लिंक विचित्न वाटत असेल, तर ती नक्की त्यानेच पोस्ट केलेली आहे का याची खात्नी करा. कारण अनेकदा तुम्ही क्लिक केलेली लिंक स्पॅम असेल, तर तुमच्या अकाउंटवरूनही अशाच लिंक पोस्ट होतील.

11 शेवटी सगळ्यात महत्त्वाचं - ठराविक कालावधीनंतर पासवर्ड बदला. एखादा अतिशय वेगळा पासवर्ड ठेवण्याचा प्रयत्न करा, जो सहजासहजी ओळखता येणार नाही.

काचबिंदू कसा टाळाल? Avoid glaucoma

काचबिंदू कसा टाळाल?


How to Avoid glaucoma | Cause of glaucoma In India | glaucoma Treatments Surgery 2013 

कोणत्याही आजारावरील उपचाराची सुरुवात ही जीवनशैलीमधील बदलाने होते. काचबिंदूही त्याला अपवाद नाही. परंतु, जीवनशैलीतील बदलाने विशिष्ट आजार बरा होत नसेल, तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही .. चबिंदूच्या उपचारामध्ये यश व शाश्‍वती किती? हा प्रश्न कायम विचारला जातो. निदान किती लवकर झाले, आजार कोणत्या टप्प्यांत आहे, व्यक्तीची जीवनपद्धती व इतर धोकादायक आजार या सर्व गोष्टींवर हे अवलंबून असते. सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यातील आजार थांबविता येतात, मध्यम टप्प्यातील आजाराची प्रगती थांबविता येते व तिसर्‍या टप्प्यातील आजारांमुळे येणारे अंधत्व लांबविता येते. तरीही ५ टक्के रुग्णांमध्ये अपयश शक्य आहे. काचबिंदू होण्याचे नेमके एकच कारण नसते आणि त्यातील काही कारणांवर आपण पूर्ण उपचार करू शकत नाही.
जीवनपद्धती : जीवनपद्धती बदलणे हे सर्वांगीण आरोग्याबरोबरच काचबिंदूसारख्या आजारात निश्‍चितच उपयुक्त आहे. हे शास्त्रीय पाहणीत सिद्ध झाले आहे. याचे मार्गदर्शन करण्यात आम्ही नेत्रतज्ज्ञ कमी पडतो, असे मला प्रकर्षाने वाटते.
झोप, व्यायाम, फळे, पालेभाज्यायुक्त शाकाहारी आहार, नैसर्गिक जीवनसत्त्वांचा समावेश, धूम्रपान, दारू, तंबाखू व तत्सम व्यसनाधीनता डोळ्यांच्या शिरेचा नाश करते. त्यामुळे कोणत्याही औषधांचा परिणाम होत नाही. मानसिक ताणतणावाचा डोळ्यांच्या शिरेच्या रक्तपुरवठय़ावर परिणाम होतो. रक्तवाहिन्यांतील चरबीमुळे रक्तपुरवठा असुरक्षित होतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. आधुनिक व महागडी औषधे वापरली म्हणजे आपण सुरक्षित झालो, असे अजिबात मानू नये. रक्तप्रवाह व रक्तदाबातील चढ-उतारही दृष्टीस धोकादायक ठरू शकतात. यासाठी मानसिक संतुलन, शांती देणारा योग यांचा उपयोग नक्कीच होऊ शकतो.
डोळ्य़ांची बरीच औषधे ही डोळ्यांचा अंतर्दाब नियमित आटोक्यात ठेवण्याचे काम करतात. काही औषधे शिरेचा रक्तपुरवठा वाढवितात किंवा मज्जातंतूचा र्‍हास कमी करतात. काही औषधे ही अंतद्र्रवाची निर्मिती कमी करून तात्पुरता दाब कमी करतात. ही औषधे ३ किंवा ५ सीसी बाटलीत उपलब्ध असतात.
'पिलोकारपीन' हे मूलद्रव्य औषध ६0-७0 वर्षांपूर्वीचे. अजूनही काही प्रमाणात व तातडीच्या कांचबिंदूमध्ये ते उपयोगी आहे. यानंतर संशोधन झालेली अनेक औषधे आता बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय 'ब्रीमोडीन', 'डॉरसोलामाईड', तर 'अँसेटाझोलामाईड मॅनीटॉल' हे इंजेक्शन तातडीच्या उपचारांची गरज असणार्‍या रुग्णांत वापरण्यात येते.
शस्त्रक्रियेचा पर्याय : ज्या रुग्णांचा अंतर्दाब नियमित औषधाने आटोक्यात राहात नाही, जे रुग्ण औषधे नियमित टाकू शकत नाहीत किंवा ज्यांना तपासणीला नियमित येणे अशक्य आहे आणि दृष्टी हळूहळू कमी होतेय, अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे जरुरीचे असते.
शस्त्रक्रियेचा फायदा असा, की डोळ्यांतील दाब कमी करण्याचा सूक्ष्म अंतर्गत मार्ग तयार केला जातो. त्यामुळे दाब कायम कमी राहू शकतो. तज्ज्ञ-प्रशिक्षित-नेत्रतज्ज्ञ दुर्बिणीखाली ही शस्त्रक्रिया बिनधोक करू शकतात.
(१) लेसर Iridotomy, (२) लेसर trabeculo plasty, (३) लेसर Canaliculostomy मोजक्या, ठरावीक रुग्णांनाच याचा उपयोग होतो. ८0 ते ९0 टक्के रुग्णांवर trabeculectomy म्हणजेच अंतरजलाचा निचरा होणारी शस्त्रक्रिया केली जाते.
लवकर अचूक निदान, सातत्याने डोळ्यांतील थेंबाचा वापर, नियमित तपासणी व नोंद आणि जीवनपद्धतीतील बदल हे यशस्वितेचे गमक आहे. कांचबिंदूला भिऊन चालणार नाही. त्याच्याशी धैर्याने लढा देण्याची हिंमत ठेवणे, हा एकच उपयुक्त मार्ग आहे.

मानवी शरीरावर किरणांचा घातक परिणाम

 मानवी शरीरावर किरणांचा घातक परिणाम 

Radioactive Chemicals,  मानवी शरीरावर किरणांचा घातक परिणाम

मानवी शरीर असंख्य घटकांचे बनले आहे. त्यातील काही घटक किरणोत्सर्गातही तग धरतात तर काही मात्र त्याला तत्काळ बळी पडतात. कसेही असले तरी अंतिम परिणाम शरीराची हानी होऊन मृत्यू होणार हाच आहे. किरणांच्या अभ्यासातून हेच सिद्ध झाले आहे. व्र किरणांच्या अतिमार्‍याने उशिरा होणार्‍या परिणामांची काही महत्त्वाची स्पष्टीकरणे शास्त्रज्ञांनी प्रयोगांअंती नमूद केली आहेत. हे परिणाम साधारण महिने किंवा वर्षानंतर उद्भवतात. उशिरा होणार्‍या परिणामांच्या अभ्यासात शास्त्रज्ञांना प्राण्यांवर प्रयोग करताना त्यांचे आयुष्य कमी झालेले आढळले. असा परिणाम माणसांवर करणो अशक्य असल्याने, हा परिणाम अस्तित्वात आहे की नाही, यात शास्त्रज्ञांची द्विधा मन:स्थिती आहे. मात्र जास्त किरणांचा मारा मानवाचे आयुष्य कमी करण्यास कारणीभूत असून, यात शास्त्रज्ञांना कुठलीही शंका नाही. जपानमधील अणुबॉम्ब उत्पातात किरणांच्या मार्‍यामुळे रक्ताचा कॅन्सर व इतर कॅन्सरचे प्रमाण आढळून आले होते. याचे प्रमुख कारण म्हणजे किरणोत्सर्गी वर्षावामधील घटकांची अपाय करण्याची तीव्रता व त्यामधून निघणार्‍या न्यूट्रॉन, गॅमा, बीटा या भेदक किरणांमुळे होणारे परिणाम हे होय. या किरणांच्या आरपार भेदून जाण्याच्या शक्तीमुळे ते शरीरातील कोशिकांच्या पेशीतील रेणूंवर आदळून त्यांचा नाश घडवतात.
मानवी रक्तामधील घटकांवर किरणांच्या होणार्‍या परिणामांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी विस्ताराने केल्याचे आढळते. ठळकपणे सांगायचे झाल्यास, लसीका ऊती, अस्थिमज्जा आणि प्लीहा यांसारखे विविध घटक शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये रक्त तयार करतात. संवेदनाक्षम असल्याने या भागांत किरणांची लवकर अभिक्रिया होते. म्हणूनच मानवी शरीरात जठरातील आंतरिक मार्ग, डोळ्यांतील बुबुळे आणि पुनर्निर्मित होणारे इंद्रिय यांसारख्या उतिकांना 'किरण संवेदनाक्षम उतिका' असे म्हणतात. तर परिपक्व असलेल्या स्नायूंच्या पेशी, अस्थी, कास्थी किंवा अस्थिरूप न पावलेले आणि केंद्रस्थानी असलेली चेतासंस्था यांना 'किरणरोधक उतिका' असे म्हणतात. या उतिकांवर अनिष्ट परिणाम होण्यास साधारण जास्त किरणांचा मारा करणो आवश्यक असते. त्वचा, फुप्फुसे, यकृत यांसारखे मानवी शरीरातील अवयव मात्र किरणांना मध्यम स्वरूपात संवेदनाक्षम असतात.
वरील किरणांच्या मार्‍याच्या परिणामांचे वर्णन हे मुख्यत: बाहेरील सर्वच किरणांच्या स्रोतापासून होणारे आहेत. सर्वसाधारण अणुगर्भातून निघणार्‍या किरणांचे जीवशास्त्रीय परिणाम हे विविध किरणोत्सर्ग असलेल्या पदार्थांच्या परिणामांसारखेच असतात. पण, यामध्ये क्वचित प्राप्त परिस्थितीमध्येही शरीरात अतिशय कमी प्रमाणात असलेले वरील स्रोतही भयंकर परिणाम अथवा इजा घडवून आणू शकतात. एखादे किरणोत्सर्गी द्रव्य अथवा अणुकेंद्र विशिष्ट एका पेशीवर किंवा उतिकावर एकाग्र झाले, तर त्या परिणामांची अवस्था बिकट होते. कॅल्शिअम, स्ट्रॉन्शिअम, बेरिअम आणि रेडिअम यांसारखी किरणोत्सर्गी द्रव्ये अस्थींवर जोरदारपणो आक्रमण करतात. ही द्रव्ये मानवी शरीराचा सांगाडा किंवा अस्थिपंजा यावर जाऊन बसतात. प्लुटोनिअम आणि सेरिअम हेसुद्धा अस्थींवर आक्रमण करतात. प्राण्यांवर झालेल्या प्रयोगांच्या परिणामांच्या आधारे शास्त्रज्ञांनी प्लुटोनिअम शरीराच्या यकृतातही सामावला जाऊ शकतो, असा निष्कर्ष काढला. याचाच अर्थ, जर किरणोत्सर्गी द्रव्य हे सूक्ष्म प्रमाणात जरी शरीराच्या आत गेले, तर त्याचे भयंकर परिणाम मानवास भोगायला लागतात. यात प्रामुख्याने ही द्रव्ये संवेदनाक्षम असलेल्या अस्थिमज्जा व रक्त तयार करणार्‍या पेशींवर खोलवर परिणाम अथवा इजा करतात. पुढे जर अस्थीतील उतिकांवर सतत किरणांचा मारा होत राहिला, तर त्याचे रूपांतर ट्यूमरमध्ये होण्यास वेळ लागत नाही. 

फोटॉन प्रकाशाचे ओझे Weight of Photon

फोटॉन प्रकाशाचे ओझे Weight of Photon



प्रकाशाचे मूलकण म्हणजेच 'फोटॉन' यांना वस्तुमान आहे व त्याच्या परिणामस्वरूपी वजनही, असे काही वैज्ञानिकांच्या निरीक्षणांमधून दिसून आले. प्रकाशाच्या या 'ओझ्या'मुळे पदार्थविज्ञानामध्ये आजवर 'अजरामर' मानल्या गेलेल्या अनेक गृहीतकांमध्ये फेरबदल करावे लागण्याची शक्यता आहे. नेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध लेखक-कवी शशी पटवर्धन यांनी एक सामाजिक लेख लिहिला होता 'प्रकाशाचे ओझे'. लग्न, वराती, समारंभ आणि मिरवणुका यांमधून उजेडासाठी लागणार्‍या पेट्रोमॅक्स गॅसबत्त्या डोक्यावरून वाहून नेणार्‍यांच्या वेदना, दु:खे आणि हालअपेष्टा यांची कहाणी त्यामधून जनतेसमोर मांडली होती. या लेखाच्या शीर्षकामधील विरोधाभास हा वाड्मयीन लाक्षणिक अर्थासाठी होता. आता मात्र एका नव्या संशोधनाने हा विरोधाभास प्रत्यक्षातही असण्याची वैज्ञानिक शक्यता निर्माण झाली आहे.
सार्‍या विश्‍वामध्ये सर्वाधिक वेगवान गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे प्रकाशकिरण. दर सेकंदाला सुमारे तीन लाख किलोमीटर एवढय़ा तुफान वेगाने प्रवास करणार्‍या प्रकाशापेक्षा अधिक अशी कोणतीही गती असूच शकत नाही, ही ठाम धारणा आजपर्यंत सर्वच वैज्ञानिकांची होती व आहे. गेल्या शतकातील व कदाचित आजवरचाही सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ असा बहुमान ज्याला एकमताने बहाल करण्यात आला आहे, त्या अल्बर्ट आइनस्टाईनच्या प्रसिद्ध अशा e=MC2 या समीकरणामधूनही हे अंतिमोत्तर दिसून येते. कोणत्याही गोष्टीचा वेग वाढविण्यासाठी तिला ऊर्जा दिल्यास सुरवातीला त्याप्रमाणात गतीमध्ये वाढ होते. ही गतीवाढ काही काळापर्यंत प्रमाणबद्ध असते; परंतु जसाजसा हा वाढलेला वेग प्रकाशाच्या वेगाकडे वाटचाल करू लागतो, तसतसे मात्र हे प्रमाण विषम होऊ लागते. आणि अखेर प्रकाशाच्या वेगापाशी पोहोचल्यावर तर कितीही प्रमाणात ऊर्जा दिली, तरी त्या वस्तूच्या गतीमध्ये वाढ होतच नाही. थोडक्यात, प्रकाशाचा वेग हा 'अभेद्य' आहे.
प्रकाशाचे मूलकण म्हणजे जे 'फोटॉन' त्यांना वस्तुमान काहीसुद्धा नाही, असेच आजवर मानले गेले आहे. त्यामुळेच ते अनंत काळापर्यंत कोणताही फरक न पडता टिकून राहतात व त्यांचा वेगही सेकंदाला तीन लाख किलोमीटर हा कायम असतो, असेच गृहीत धरले गेले. परंतु, 'सायंटिफिक अमेरिकन' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार हे गृहीतक चुकीचे असण्याची शक्यता आहे.

शमी चे पाना चे महत्व | shami chi pan

शमी चे पाना चे  महत्व | shami chi pan


शमी आपल्याला माहिती आहे ती पांडवांनी अज्ञातवासात त्यावर ठेवलेल्या शस्त्रांमुळे. दसर्‍याला त्यांनी ती शस्त्रं काढली व कौरवांबरोबर युद्ध पुकारले वगैरे. पण हा वृक्ष तेवढय़ापुरताच प्रसिद्ध नाही, तर त्याचे आणखीही बरेच गुणधर्म आहेत. कमी पाण्याच्या प्रदेशात वाढणारा, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मी, अग्निपादप, सागरी, खेजडी, शंकर अग्निगर्भा पापनाशिनी- ही सर्व शमीची नावं. प्रत्येक नाव अर्थवाही; 'शमयते दोषान' - म्हणजे दोषांचे शमन करणारी, अग्निपादप वा अग्निगर्भा-अर्थात अग्नी धारण करणारी होय, यज्ञीय अग्नी तयार करताना काडी पेटवायची नाही तर लाकडावर लाकूड घासून, मंथन करून अग्नी निर्माण करायची पद्धत होती. त्यात शमी महत्त्वाची. शंकर या नावाची फोड शं-कर म्हणजे शुभकारक, पापनाशिनी असणारी- 'शमयति पापान्' अशी शमी म्हणूनच शं-कर शुभ; सागरी म्हणजे सम्यक् गर असणारी; इतर शेंगा शुष्क असतात; पण शमीची शेंग गरयुक्त म्हणून सागरी. याशिवाय शमी अजप्रियाही आहे. शेळ्या, बकर्‍यांना शमीचा पाला खूप आवडतो. खेजडी हे नाव मात्र स्थानिक म्हणजे राजस्थानात प्रचलित असणारं नाव आहे. 
राजस्थानच्या मरुभूमीत खेजरी म्हणजे शमी, केर आणि रुईची चलती. या जवळजवळ निपाण्या प्रदेशात यांचच साम्राज्य. म्हणून आजही भारतात कुठेही स्थिरावलेल्या राजस्थानी समाजात धार्मिक समारंभात केर अर्थात नेपती आणि सागरे या दोन्ही फळांची उपस्थिती अनिवार्य!
आपल्याला शमीचा परिचय केवळ गणेशप्रिय पत्री म्हणून! मात्र प्रत्यक्षात गणेशचतुर्थीच्या आसपास जी शमी बाजारात उपलब्ध असते, ती अस्सल शमी नसते, तरी ती असतात शमी सारखीच दिसणारी, त्याच कुळातल्या खैराची पानं; बरं आहे, सामान्यांना शमी आणि खैर यातला फरक कळत नाही तेच! कारण पुण्याच्या आसपास शमी तशी दुर्लभच आहे! त्यामुळे खैरानं शमीवर एकप्रकारे खैरच केली आहे. 
शमीचा वृक्ष जवळजवळ दहा ते वीस मीटरपर्यंत उंची गाठतो. मूळचा निपाण्या देशाचा रहिवासी असल्याने त्याची मुळं जमिनीखाली खूप खोलीपर्यंत वाढतात, त्याचं कारण पाण्याचा वेध! खोड काळसर वर्णाचं, कोवळ्या फांद्यांवर बारीक काहीसे वक्र काटे, पानं द्विपिच्छिल, मुख्य पर्णाक्ष सुमारे पाच सेंमी लांबीचं, फिकट पिवळसर हिरवं, त्यावर दुय्यम पर्णाक्षांच्या दोन जोड्या. ही जोड्यांची संख्या शमीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. या दुय्यम पर्णाक्षावर नगण्य आकारमानाच्या राखाडी वर्णाच्या पर्णिकाच्या सात ते बारा जोड्या. पर्णाक्षांवर काही वेळा कीटकांची निवासस्थानं असणारे बारीक बारीक फोड.
शमीच्या मंजिर्‍या आखूड, अंदाजे चार ते पाच सेंमी लांबीच्या. या लोंबत्या मंजिर्‍यात नगण्य आकारमानाची पिवळट रंगाची फुलं, फुलातून बाहेर डोकावणारे पुंकेसरही पिवळे. त्यांची संख्या दहा आणि प्रत्येक पुंकेसराच्या डोक्यावर एका सूक्ष्म ग्रंथीची शिरवा, अर्थात फूलच अतिशय लहान तेव्हा पुंकेसराचं सु-दर्शन केवळ भिंग वापरूनच घेता येईल. शमीची शेंग मात्र भरपूर मोठी, म्हणजे दहा ते वीस सेंमी.पर्यंत. लांब, टपोरी, फुगीर आणि सरळ. शेंगेत तपकिरी रंगाचा पिठुळ गर असतो आणि तो खाण्याजोगा. 

शमीभोवती अनेक कथांची वलयं आहेत. त्यातील सर्वात प्राचीन म्हणजे श्रीमत् भागवतातील कथा, पुरुरवा- ऊर्वशीची! राजाला सोडून जाताना ऊर्वशीनं त्याला एक स्थाली म्हणजे थाळी दिली. 'तुला माझ्या आठवणीचं दु:ख जेव्हा असह्य होईल, तेव्हा या थाळीचं दर्शन घे' असं ऊर्वशीनं राजाला सांगितलं. पुरुरवा-ऊर्वशीचा वियोग झाला तो एका अरण्यात. तिथेच पुरुरव्याने ती थाळी सोडून दिली आणि तो राजधानीत परत आला. जेव्हा पुढे कधी त्याला ऊर्वशीची आठवण झाली तेव्हा तो वनात आला. तेव्हा थाळीच्या जागी एक अश्‍वत्थ आणि शमीवृक्ष एकमेकांत गुरफटून वाढलेले त्याला दिसले. राजाने या दोन वृक्षांची अरणी तयार केली. त्यातून जो अग्नी निर्माण झाला तो 'पुरुरवस' अग्नी.